अपूर्वी चंडेलाची अव्वल स्थानी झेप

 नेमबाजी जागतिक क्रमवारी

Apurvi Chandela

भारताची नेमबाज अपूर्वी चंडेलाने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. भारताच्याच अंजुम मुद्गिलने या क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले आहे. अपूर्वीने मागील काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे तिला २०२० ऑलिम्पिकमध्येही प्रवेश मिळाला आहे.

अपूर्वीला २०१६ रियो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, त्यानंतर तिने सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आहे. तिने यावर्षी फेब्रुवारीमध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या विश्वचषकात २५२.९ गुणांच्या विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले होते. तिने २०१८ मध्ये झालेल्या एशियाडमध्ये १० मीटर एअर रायफलच्या मिश्र सांघिक गटात कांस्यपदक मिळवले होते. तिने याआधी २०१४ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण तर २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. तिने बुधवारी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठल्यानंतर आपला आनंद ट्विटरवरून व्यक्त केला. ‘मी माझ्या नेमबाजी कारकिर्दीतील एक लक्ष्य आता गाठले आहे, असे तिने या ट्विटमध्ये लिहिले. नुकत्याच बीजिंगमध्ये पार पडलेल्या विश्वचषकात अपूर्वीला पदकाने हुलकावणी दिली. १० मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत २०७.८ गुणांसह तिचा चौथा क्रमांक आला. याच विश्वचषकात मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक मिळवणार्‍या अंजुम मुद्गिलने १० मीटर एअर रायफल प्रकारच्या जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले आहे. युवा नेमबाज मनू भाकर २५ मीटर एअर पिस्तूलच्या जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानी आहे.

पुरुषांमध्ये नुकत्याच झालेल्या विश्वचषकात अप्रतिम कामगिरी करणार्‍या दिव्यांश सिंह पन्वरने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारच्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. दिव्यांशने या विश्वचषकात १० मीटर एअर रायफल पुरुष आणि १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक अशी २ सुवर्णपदके मिळवली. या कामगिरीमुळे त्याने ऑलिम्पिकचा कोटाही मिळवला होता. या विश्वचषकात १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्ण मिळवणार्‍या अभिषेक वर्माने या प्रकारच्या जागतिक क्रमवारीत तिसरे स्थान मिळवले आहे, तर युवा नेमबाज सौरभ चौधरी सहाव्या स्थानी आहे. अनिश भानवाला २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये १० व्या स्थानी आहे.