घरमुंबईमनसेनंतर आता शिवसेनेचाही बुलेट ट्रेनला विरोध

मनसेनंतर आता शिवसेनेचाही बुलेट ट्रेनला विरोध

Subscribe

मनसेनंतर शिवसेनेनेही बुलेट ट्रेनला विरोध केला असून, आता पालघर पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने भाजपाला कोंडीत पकडले आहे. विशेष म्हणजे शिवसेना बुलेट ट्रेनच्या विरोधात आंदोलनकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती शिवसेना आमदार नीलम गोर्हे यांनी आज दिली.

३ जूनला पालघर येथे जनमंच आंदोलन

बुलेट ट्रेन विरोधात एकत्रित आवाज उठवण्यासाठी येत्या ३ जूनला पालघर येथे जनमंच आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. याच आंदोलनात सहभागी होण्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना आंदोलन कर्त्यांकडून निमंत्रण देण्यात आले. यावेळी भूमी अधिकार आंदोलन समिती आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली. शिवसेना या जनमंच आंदोलनात सहभागी होणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार निलम गोऱ्हे या बैठकीला उपस्थित होत्या. तसेच भूमी अधिकार आंदोलन समितीचे रमाकांत पाटील, उल्का महाजन बैठकीला उपस्थित होत्या.

- Advertisement -

शिवसेना शेतकऱ्यांसोबत

बुलेट ट्रेनला ७० ते ८० गावातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. आम्ही जसे नाणारला शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिलो आहोत तसेच आम्ही या देखील शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार आहोत. आमचा विरोध हा विकासाला नाही तर प्रकल्प हे शेतकऱ्यांच्या हिताचे असले पाहिजेत आणि जर शेतकऱ्यांचे हित त्यात नसेल तर आम्ही त्याला विरोध करू अशी प्रतिक्रिया आमदार नीलम गोऱ्हे यांनी दिली. तर बुलेट ट्रेन विरोधात पालघर-ठाणे जिल्ह्यासह गुजरातमध्ये विविध संघटना आंदोलन करत आहेत. या संघटनांनी आजवर बुलेट ट्रेनच्या अनुषंगाने सुरू असलेली सर्व्हेक्षण तसेच जमीन मोजणी कामे बंद पडली आहेत. आमचा शेवटपर्यत याला विरोध असणार आहे अशी प्रतिक्रिया भूमी अधिकार आंदोलन समितीचे रमाकांत पाटील यांनी दिली. तसेच जे जे पक्ष बुलेट ट्रेनला विरोध करत आहेत त्यांना आम्ही ३ जूनच्या जनमंचमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -