घरमुंबईउद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर ईशान्य मुंबईतील शिवसैनिक सक्रिय

उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर ईशान्य मुंबईतील शिवसैनिक सक्रिय

Subscribe

ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारात मनापासून काम न करणारे शिवसैनिक आता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानंतर जोमाने कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे आता खुद्द विभागप्रमुखही ज्या भागातील प्रचारफेरी असेल तिथे लक्ष ठेवून शिवसैनिकांना प्रचारात सहभागी करताना दिसत आहेत.

ईशान्य मुंबईत शिवसेनेच्या मागणीनुसार खासदार किरीट सोमय्या यांची उमेदवारी रद्द करून भाजपने मनोज कोटक यांना उमेदवारी दिली, परंतु त्यानंतर विभागप्रमुख, आमदार आदी पदाधिकारी वगळता कोटक यांच्या प्रचारात शिवसैनिक सहभागी होताना दिसत नव्हते. या नाराज शिवसैनिकांना आपल्याकडे हेरून घेण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी उमेदवार संजय दिना पाटील यांच्याकडून होत असल्याने अखेर या नाराजीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर बैठक बोलावली होती. आमदार, विभागप्रमुखासह नगरसेवक आणि शाखाप्रमुख, गटप्रमुखांसह ६० जणांची बैठक बोलावून त्यांची कानउघडणी करत कोटक हे महायुतीचे उमेदवार असून, त्यांचा प्रचार जोमाने करा, अशा सूचना केल्या. त्यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये कोटक यांच्या प्रचारात शिवसैनिक दोन दिवसांपासून अगदी मन लावून काम करताना दिसत आहेत.

- Advertisement -

कोटक यांच्या प्रचारावर सध्या विभागप्रमुख रमेश कोरगावकर आणि राजेंद्र राऊत हे लक्ष ठेवून आहे. त्यामुळे ज्या ज्या भागांमधून प्रचार फेरी किंवा सभा होणार आहेत, त्याठिकाणच्या शाखाप्रमुखांसह महिला शाखा संघटकांसह गटप्रमुखांवर प्रचारात सहभागी होवून कोटक यांना मतदान करण्याचे आवाहन केले जावे, अशा सूचना केल्या जात आहेत. या प्रचारफेरीत त्यानुसार शिवसैनिक मोठ्याप्रमाणात सहभागी होताना दिसत आहेत. मनोज कोटक हे महायुतीचे उमेदवार आहेत. महायुतीचा उमेदवार म्हणून कोटक यांना निवडून आणण्याची जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार ईशान्य मुंबईतील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक प्रचारात सहभागी होत असून आम्ही विभागप्रमुखही प्रत्येक प्रचार फेरीवर विशेष लक्ष ठेवून आहोत, असे शिवसेना विभागप्रमुख रमेश कोरगावकर यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -