मुंबई महापालिकेची निवडणूक लढविणार

खासदार असदुद्दीन ओवेसींची घोषणा

Asaduddin owaisi

आगामी महापालिकांच्या निवडणुकांचे जोरदार वारे वाहत असतानाच आता राजकारणात नवा ट्विस्ट आल्याचे पहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता एमआयएमचीही एण्ट्री होणार आहे. एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढविणार असल्याची घोषणा शनिवारी नवी मुंबईत एका कार्यक्रमात केली.

एमआयएम (ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल-मुस्लीमन) या पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन नवी मुंबईतील महापे येथे दोन दिवसीय अधिवेशन होत आहे. अधिवेशनाच्या प्रारंभानंतर ओवेसी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पक्षाचे सर्व खासदार, आमदार, प्रवक्ते, प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. यावेळी ओवेसी म्हणाले की, वंचित समाजावर अन्याय सुरूच आहे. भारतीय संविधानाची मोडतोड सध्या सुरू आहे. संविधान बचावासाठी आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे, असे सांगितले.

नाव बदलले तरी इतिहास बदलणार नाही
औरंगाबादच्या नामांतराविरोधात न्यायालयात लढा सुरू असताना केंद्र सरकारने नामांतरावर निर्णय घेणे हे चुकीचे आहे. नाव बदलल्यामुळे तेथील इतिहास बदलणार आहे का, असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. औरंगाबादचे नाव बदलल्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. वर्षानुवर्षे राहणार्‍या नागरिकांना कागदपत्रांच्या नावामध्ये बदल करावा लागणार आहे. सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचे ओवेसी म्हणाले.