घरमुंबईनाशिकमधील तरुणांनी बनवली एअर टॅक्सी

नाशिकमधील तरुणांनी बनवली एअर टॅक्सी

Subscribe

मुंबईतील वाहतूक कोंडीवर पर्याय

2008 मध्ये आलेल्या ‘लव्ह स्टोरी 2050’ या चित्रपटामध्ये आकाशातून उडणार्‍या गाड्या दाखवण्यात आल्या होत्या. त्यामुळे गाड्या हवेत उडू लागल्यास वाहतूक कोंडीतून सुटका होईल, अशी आशा सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली. सर्वसामान्यांचा हा विश्वास आता लवकरच नाशिककर प्रत्यक्षात आणणार आहेत. नाशिकमधील सहाजणांनी एकत्र येऊन हवेत उडणारी टॅक्सी बनवली आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची असलेल्या या टॅक्सीसाठी आवश्यक चाचण्या सध्या सुरू असून, आगामी दोन ते तीन वर्षांत ही गाडी नागरिकांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

देशातील सर्वच मोठ्या शहरांमधील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना अनेक शारीरिक, मानसिक आजारांचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सरकारकडून उड्डाणपुल व मेट्रो, मोनो यासारखे प्रकल्प राबवण्यात येत असले तरी ते प्रत्यक्षात यायला बराच कालावधी लागणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन नाशिकमधील सहाजणांनी एकत्र येऊन यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच संपूर्ण भारतीय बनावटीच्या एअर टॅक्सीचा जन्म झाला. चार आसनी असलेली ही टॅक्सी ताशी 120 किमी या वेगाने प्रवास करते. त्यामुळे सध्या लागणार्‍या एक ते दीड तासांचा प्रवास हा अवघ्या 15 ते 20 मिनिटांत होणार आहे. या प्रवासासाठी सध्या साधारण टॅक्सी किंवा खासगी टॅक्सीसाठी किमान 500 ते 600 रुपये मोजावे लागतात. मात्र या एअर टॅक्सीमुळे प्रवाशांना फक्त 50 ते 75 रूपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या परवडण्याबरोबरच वाहतूक कोंडीपासूनही एअर टॅक्सीमुळे सुटका होणार आहे. एअर टॅक्सी बनवण्यासाठी नाशिकमधील सहा जणांनी एअरोहंस नावाची कंपनी स्थापन केली आहे. आयआयटी मुंबईमध्ये सुरू असलेल्या टेकफेस्टमध्ये एअर टॅक्सी प्रदर्शनला ठेवण्यात आली आहे.

- Advertisement -

नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या (डीजीसीए) नियमानुसार एअर टॅक्सीची निर्मिती करण्यात आली आहे. ही टॅक्सी विजेवर चालणारी असल्याने इंधन बचतीच्यादृष्टीने ती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. टॅक्सी विजेवर चालणार असल्याने यामध्ये त्रिस्तरीय बॅटरी सिस्टिम बसवण्यात आली आहे. ज्यामुळे प्रवासादरम्यान हवेत टॅक्सीमधील एका सिस्टिममधील चार्जिंग संपल्यानंतरही एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणे सहज सोपे होणार आहे, अशी माहिती एअरोहंसचे सीएमओ सौरभ जोशी यांनी दिली.

टॅक्सीमध्ये वापरण्यात आले इव्हिटॉल तंत्रज्ञान
हवेमध्ये उड्डाण घेण्यासाठी विमानाला धावपट्टीची आवश्यकता असते. धावपट्टीवरून वेग घेऊनच विमानाला हवेत उड्डाण करता येते. परंतु जागेची उपलब्धता लक्षात घेत एअर टॅक्सीमध्ये इव्हिटॉल तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ लँडिंग तंत्रज्ञान (इव्हिटॉल) म्हणजे एकाच जागेवरून हेलिकॉप्टरप्रमाणे हवेमध्ये उड्डाण घेता येणे. दोन हजार फुटांपर्यंत आकाशात वर जाण्याची या टॅक्सीची क्षमता आहे.

- Advertisement -

प्रवासाप्रमाणेच संकटकाळातही उपयोगी
पूरपरिस्थितीच्या वेळी अनेक ठिकाणी हवाई दलाला पोहचणे शक्य होत नाही. तसेच हेलिकॉप्टरलाही अनेक ठिकाणी उतरणे शक्य होत नाही. त्यामुळे मदतीमध्ये अडचणी निर्माण होतात. एअर टॅक्सीमुळे अशा ठिकाणी पोहचणेही शक्य होणार आहे. त्यामुळे संकटात अडकलेल्यांना तेथून वेगाने बाहेर काढणे सहज शक्य होणार आहे. तसेच टॅक्सीमध्ये काही संकटकालिन स्थिती निर्माण झाल्यास टॅक्सीला पॅराशूटच्या माध्यमातून खाली उतरवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

एअर टॅक्सी चालणार विनापायलट
सर्वसाधारण टॅक्सी चालवण्यासाठी ड्रायव्हर तसेच हेलिकॉप्टर व विमानासाठी पायलटची आवश्यकता असते. परंतु ही टॅक्सी विनापायलट चालणार आहे. टॅक्सी हवेत उडण्यासाठी उभारण्यात येणार्‍या ड्रोन पोर्टवरून टॅक्सीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्णत: भारतीय बनावटीचे लाईट कंट्रोल तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -