महापालिकेत शिवसेना आणि भाजपात तू तू मै मै सुरुच

Allegations Against BJP and Shiv Sena continue in bmc

शिवसेनेने भाजपशी युती तोडून राज्यातील सत्ता विरोधकांना जवळ करून काबीज केली. याचा विलक्षण राग भाजपाच्या मनात कायम कोरला गेला आहे. आता मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने शिवसेना- भाजपात तू तू मै मै आणखीन वाढली आहे. आज पालिकेत स्थायी समितीची बैठक होती. मात्र त्याअगोदरच भाजपने, मुंबई महापालिकेत सत्ताधार्‍यांकडून लोकशाहीची पायमल्ली होत आहे. स्थायी समितीच्या बैठकीत कार्यक्रम पत्रिकेवरील मुंबई शहरासंबंधी असलेल्या विविध प्रश्नांवर बोलण्याची, मत व्यक्त करण्याची परवानगी विरोधकांना दिली जात नाही, असा आरोप केला.

भारतीय राज्य घटनेच्या कलम १९ अन्वये मूलभूत अधिकार म्हणून स्थायी समितीतील प्रत्येक विषयावर ज्या सदस्यांना बोलण्याची इच्छा आहे, त्यांना त्याबाबत परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी एका लिखित पत्राद्वारे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे केली.

मात्र प्रत्यक्षात आज स्थायी समितीच्या बैठकीत भाजपचे गटनेते, सदस्य यांसह सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक यांना बोलण्याची वारंवार संधी दिली. बैठक व्यवस्थित पार पडली. मात्र बैठक संपल्यावर, समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, गेल्या चार वर्षात मी भाजपच्या सदस्यांना जास्तीत जास्त बोलण्याची संधी दिली, मात्र ते उगाचच माझ्यावर आरोप करून राईचा पर्वत बनवीत असून भाजपची अवस्था, ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी टीका केली. वास्तविक, भाजपकडे बोलायला काहीच मुद्दे शिल्लक नसल्याने ते बेताल वक्तव्ये करतात, आरोप करतात. भाजपवाले फक्त स्टंटबाजी करतात. भाजप गटनेते हे आपल्या वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी पालिकेत शिवसेनेवर, स्थायी समितीवर वाटेल तसे आणि निराधार आरोप करतात, असे यशवंत जाधव म्हणाले.


हेही वाचा – ‘मुंबई पालिकेला कोट्यवधींचा चुना लावून लाकूडतोड-पुरवठादार कोट्यधीश!’