घरमुंबईभावनिक आवाहन, विनंतीनंतर भाजपकडून 'त्या' प्रस्तावांना मंजुरी

भावनिक आवाहन, विनंतीनंतर भाजपकडून ‘त्या’ प्रस्तावांना मंजुरी

Subscribe

पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विभागात गरीब, गरजू लोकांना फळे, भाज्या यांची विक्री करण्यासाठी टाटा व्हॅनचा पुरवठा करणे, कचरा टाकण्यासाठी मोठे डबे पुरवणे, तरुणांसाठी व्यायाम साहित्याचा पुरवठा करणे, शाळांमधील विद्यार्थ्यांना स्टेनलेस स्टीलचे बेंचेस आणि कॉम्प्युटर पुरवणे, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि हाय मास्ट बसविणे आदी कामांच्या १२ कोटी रुपयांचे प्रस्ताव आज स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी सादर केल्याचे कारण देत भाजपने ते रोखून धरले होते.

मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षांच्या गटनेत्यांसह स्वतः यशवंत जाधव आदींनी भावनिक विनंती, आवाहन केल्यानंतर नरमलेल्या भाजपने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यास मंजुरी दिली. परंतु इतर पाच प्रस्ताव मंजूर न करता रोखून धरण्यात आले. आज स्थायी समितीची बैठक पालिकेत पार पडली. मात्र आज बैठकीच्या अगोदर पहाटेच्या सुमारास पालिका चिटणीस विभागाने क्रमांक ३३ ते ४४ हे १२ प्रस्ताव स्थायी समिती सदस्यांना घरी माहितीसाठी पाठवले. त्यामुळे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे व प्रभारी भालचंद्र शिरसाट यांनी, बैठकीपूर्वी आणि बैठकीतही सदर प्रस्ताव उशिराने मिळाल्याने अभ्यास करावयाचा असल्याचे कारण देत चर्चेला व मंजुरीला घेण्यास विरोध दर्शविला. वास्तविक, नियमानुसार स्थायी समितीच्या कामकाजासंदर्भातील अजेंडा हा बैठकीच्या तीन दिवस अगोदर सर्व सदस्यांना अभ्यास करण्यासाठी पाठवला जातो. तर मग हे प्रस्ताव ऐनवेळी मंजुरीसाठी आल्याने व त्यावर अभ्यास न करता आल्याने ते मंजुरीला घेऊ नये. तसे केल्यास ते नियमबाह्य होईल, असे सांगत भाजपचे प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट यांनी सदर प्रस्ताव रोखून धरले. तसेच, जर समिती अध्यक्ष आमच्या विरोधाला न जुमानता प्रस्ताव मंजूर करणार असतील तर आम्ही सभात्याग करतो, असा इशारा भाजपतर्फे देण्यात आला.

- Advertisement -

तत्पूर्वी, विरोधी पक्षनेते रवी राजा, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, राष्ट्रवादी पक्षाच्या गटनेत्या राखी जाधव यांनी, भाजपने सहानुभूती दाखवून सदर प्रस्ताव जनहिताचे असल्याने मंजूर करण्यास अनुकूलता दर्शवावी, अशी विनंती केली. तसेच, कोरोनामुळे विकास कामे, योजना राखडल्याचे भाजपने लक्षात घ्यावे आणि जनहिताच्या कामांबाबत राजकारण न करता आणि काही बाबतीत नियम बाजूला ठेऊन प्रस्ताव मंजूर करावेत, अशी विनंती केली.

मात्र भाजपने दाद न दिली नाही. यावेळी, भाजपचे शिरसाट, शिंदे यांची सभागृह नेत्या विशाखा राऊत, विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्याशी शाब्दिक चकमकही झाली. नंतर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, स्वतः भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट यांची समजूत काढत आणि त्यांना विकास कामांबाबतचे प्रस्ताव असल्याचे सांगत ते प्रस्ताव मंजूर करण्यासाठी विनंती केली. जर प्रस्ताव मंजूर न झाल्यास वेगळा संदेश जाईल व त्याचा अपलाभ प्रशासन घेईल आणि पुढे तुमच्या नगरसेवकांचे प्रस्ताव मंजुरीला आल्यास व ते जर कोणी अडवल्यास तीच प्रथा पडू शकते, असे सांगत गर्भित इशाराही देण्याचा प्रयत्न यशवंत जाधव यांनी दिला. अखेर पुन्हा एकदा जाधव यांनी भाजपचे शिंदे, शिरसाट यांना विनंती केल्यावर १२ पैकी ५ प्रस्ताव राखून ठेवत ७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

- Advertisement -

याबाबत बोलताना भालचंद्र शिरसाट म्हणाले की, सर्वपक्षीय गटनेते, स्थायी समिती अध्यक्ष यांनी वारंवार विनंती केल्याने भाजपने त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला व काही प्रस्तावाबाबत तडजोड न करता ते राखून ठेवले तर काही प्रस्ताव मंजूर करण्यास अनुकूलता दर्शवली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -