घरमुंबईभाईंदरमध्ये महिलेवर रसायन टाकून हल्ला

भाईंदरमध्ये महिलेवर रसायन टाकून हल्ला

Subscribe

आरोपी इशरत अलीला अटक

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार देणार्‍या एका महिलेवर आरोपीने ज्वलनशील रसायन टाकून हल्ला केल्याची घटना भाईंदर परिसरात गेल्या शुक्रवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी काशिमीरा पोलिसांनी आरोपीला गुजरातच्या अहमदाबाद येथून मंगळवारी अटक केली आहे. इशरत अली उर्फ सोनू असे आरोपीचे नाव आहे. सोनूविरोधात काशीमिरा येथे बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्याचा साथीदार तौफिक शेख फरार झाला आहे.

सोनूचा मित्र तौफिक शेखने 13 डिसेंबर 2019 रोजी पीडित महिलेच्या घरी जाऊन तिच्या 13 वर्षीय भाचीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात तौफिक शेखविरोधात पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही तक्रार मागे घेण्यासाठी सोनू या महिलेच्या मागे लागला होता. सोनूने 19 जानेवारीला तिच्या घरी जाऊन तिला समजावण्याचा प्रयत्न केला. माझ्या मित्राच्या विरोधातील तक्रार मागे घे, अशी त्याने तिला गळही घातली. पण, ती ऐकत नसल्याने संतापलेल्या सोनूने मारहाण करून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेच्या तक्रारीवरून काशिमीरा पोलीस ठाण्यात सोनूविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

तेव्हापासून सोनू फरार होता. यानंतर सोनू दोन्ही गुन्हे मागे घेण्यासाठी पीडितेवर दबाब आणत होता. तिला धमक्याही देत होता. वेगवेगळ्या नंबरवरून सोनू फोन करून तिला धमक्या देत होता. याप्रकरणी तिने पोलिसांकडे तक्रारही केली होती. शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही महिला मुलांसाठी खाऊ आणि औषधे आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. अदानी पॉवर सब स्टेशनकडून एकटीच चालली असताना सोनू आपल्या एका मित्रसोबत दुचाकीवरून आला. यावेळी तिला एकटी गाठून काशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा मागे घे. तसे स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यास धमकावले. पण, तिने तक्रार मागे घेण्यास नकार देत सही करण्याचेही नाकारले. तेव्हा संतापलेल्या आरोपीने तुला पाहून घेईन अशी धमकीही दिली.

ही महिला पुढे चालत असताना त्याने पाठीमागून तिच्या अंगावर ज्वलनशील रसायने फेकले. रसायनामुळे डोळे आणि अंगावर जळजळ होऊ लागल्याने तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर हल्लेखोर हाटकेशच्या दिशेने पळून गेले. रस्त्यावरून जात असलेल्या काही जणांनी तिला काशिमीरा पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी उपचारासाठी तिला भाईंदरमधील भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी पेट्रोल अथवा रॉकेलसारखा ज्वलनशील पदार्थ असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

- Advertisement -

महिलेच्या तक्रारीवरून काशिमीरा पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीला पकडण्यासाठी पथक तयार करुन तपास सुरु केला होता. घटनेनंतर आरोपी भाईंदरमधून गायब झाला होता. अखेर पोलिसांनी त्याला गुजरातमधील अहमदाबाद शहरातून ताब्यात घेतले. त्याचा साथीदार मात्र फरार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -