घरमुंबईपालिका आयुक्तांकडून कर्मचार्‍यांचा विश्वासघात; मार्च २०२१ पर्यंत भत्ता बंद करण्यास विरोध

पालिका आयुक्तांकडून कर्मचार्‍यांचा विश्वासघात; मार्च २०२१ पर्यंत भत्ता बंद करण्यास विरोध

Subscribe

पालिका आयुक्तांचा हा निर्णय म्हणजे कर्मचार्‍यांचा विश्वासघात करण्याचा प्रकार असल्याचा आरोप पालिका कर्मचारी संघटनेकडून करण्यात आला आहे.

कोविड काळामध्ये सेवा देणारे पालिका कर्मचार्‍यांना देण्यात येणारा ३०० रुपये कोविड भत्ता १ जानेवारीपासून बंद करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. पालिका आयुक्तांचा हा निर्णय म्हणजे कर्मचार्‍यांचा विश्वासघात करण्याचा प्रकार असल्याचा आरोप पालिका कर्मचारी संघटनेकडून करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका कर्मचार्‍यांना २०२० मध्ये दिवाळीमध्ये सानुग्रह अनुदान गतवर्षीच्या तुलनेत कमी देण्यात आले. यावेळी मुंबई महापालिका कार्यालयीन कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून पालिकेच्या कर्मचार्‍यांनी २३ ऑक्टोबरला पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दैनंदिन भत्ता मार्च २०२१ पर्यंत देण्यात येणार असल्याने यंदा गेल्यावर्षीप्रमाणे बोनस देता येणार नसल्याचे संघटनेच्या पदाधिकार्‍यांना सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असता त्यावेळीही चहल यांनी मार्च २०२१ पर्यंत दैनंदिन भत्ता देण्यात येणार असल्याने बोनस किंवा सानुग्रह अनुदानामध्ये वाढ करणे शक्य नसल्याचे सांगितले. मात्र रेल्वेसेवा पूर्ववत सुरू झाल्याने कोविड दैनंदिन भत्ता १ जानेवारी २०२१ पासून बंद करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त चहल यांनी जाहीर केले. आयुक्तांच्या या निर्णयामुळे कर्मचार्‍यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अद्यापही सर्वांना रेल्वे प्रवास करण्यास अनुमती दिलेली नाही. त्यामुळे भत्ता बंद करणे चुकीचे ठरणार आहे. तसेच पालिका आयुक्त चहल यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मार्च २०२१ पर्यंत दैनंदिन भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे हा आदेश म्हणजे कर्मचार्‍यांचा विश्वासघात करण्यासारखे असल्याचे मुंबई महापालिका कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अ‍ॅड. प्रकाश देवदास यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -