घरमुंबईभातसा कालवा फुटला लाखो लिटर पाणी वाया

भातसा कालवा फुटला लाखो लिटर पाणी वाया

Subscribe

मुंबईवर पाणी टंचाईच्या संकटाची शक्यता

मुंबई महानगरला पाणीपुरवठा करणार्‍या भातसा जलाशयाच्या उजव्या तीर कालव्याला मंगळवारी मध्यरात्री रात्री एक भले मोठे भगदाड पडून कालवा अचानक फुटला. या कालव्यातून शेतकर्‍यांच्या शेतीसाठी मिळणारे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. अगोदरच भातसा धरणाची पाण्याची पातळी कमालीची खालावली असताना आणि मुंबईची पाणी कपात सुरू असताना आता कालवा फुटून लाखो लिटर पाणी अक्षरशः वाया गेले. या भातसा जलाशयाला जोडलेल्या या कालव्यातून सिंचनासाठी पाणी पुरवले जात होते. या पाण्यावर या परिसरातील शेतीला पाणी उपलब्ध होते. मात्र, कालवा फुटल्याने शेतीच्या पाण्यावर उपलब्धतेवर विपरित परिणाम होणार आहे. शेतीला पाण्याची आवश्यकता असल्याने वाहून गेलेल्या पाण्याची कमतरता धरणातील शिल्लक पाण्यातून भरली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास धरणातील मुंबईला होणार्‍या पाणीपुरवठ्याच्या साठ्यातून वाया गेलेल्या पाण्याची कमतरता भरून काढली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुरवल्या जाणार्‍या पाण्यावर त्याचा परिणाम होणार आहे.

भातसा जलाशयाला जोडलेल्या उजव्या तीर कालव्यातून शेतीसाठी दरवर्षी हिवाळा आणि उन्हाळ्यात सिंचन म्हणून पाणी सोडले जाते. या पाण्याचा फायदा भातसा, शहापूर, पच्छापूर, जांभिवली, अंबाडी या परिसरातील शेतकर्‍यांना होत असतो. या कालव्याच्या पाण्यावर भाजीपाला लागवड व भात शेती करतात याच मुख्य उजव्या तीर कालव्याला मध्यरात्री वासिंद जवळील किलोमीटर 29 साकळी क्रमांक 29/000 किमी क्षेत्रात एक भले मोठे भगदाड पडले. अचानक पाण्याचा वाहता प्रवाह कालव्याच्या बाहेरील ओहळात तसेच इतरत्र वाहू लागला. वेगाने आलेले पाणी, माती दगडगोट्यांसह हे पाणी परिसरात पसरले. त्यामुळे कालव्यात 250 क्युसेसने सोडलेले हे पाणी लाखो लिटरने वाया गेले.

- Advertisement -

कालव्याचे पाणी लगतच असलेल्या खातिवली जवळच्या शुभवास्तु गृहसंकूल प्रकल्पात शिरले या पाण्याचा वाहता प्रवाह रस्त्यावर येऊन परिसर जलमय झाला. वासिंद पूर्व पश्चिम जोडणार्‍या एकमेव रेल्वेपुलाच्या बोगद्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने वाहतूक, दळणवळण सेवा पण पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. कालवा फुटल्याचे परिसरातील शेतकर्‍यांना समजताच झोपेत असलेल्या शेतकर्‍यांनी आपल्या शेतांमध्ये धाव घेऊन कालव्यातील पाणी शेतात शिरेल व शेतीचे व भाजीपाला लागवडीचे नुकसान होईल या भितीपोटी रात्रीच दगडमातीचे बांध बांधण्यास सुरुवात केली. 1979 ते 80 च्या काळामध्ये बांधण्यात आलेल्या कालव्याचे काम फार जुने असल्याने ते जीर्ण झाले होते. येथील साखळी क्रमांक 29/000 येथे बसवलेले पाईप ढासळले होते. बांधकामातील सळया पूर्णपणे गंजलेल्या होत्या. येथून पाण्याची काही दिवसांपासून गळती देखील सुरू होती. या कामाची दुरुस्ती योग्य वेळी जर झाली असती तर कालवा फुटला नसता व लाखो लिटर पाणी असे वाया गेले नसते. केवळ जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे, असे शेतकर्‍यांनी सांगितले.

धरणाच्या गळतीमुळे पाणी पातळी खालावली

प्रतिदीन 2000 एमएलडी पाणी भातसा धरणातून मुंबई व ठाणे महानगराला दिले जाते. या धरणाची लांबी 959 मीटर असून तळपायापासून उंची 89 मीटर आहे. तसेच एकुण जलसंचय 976 .10 दशलक्षघनमीटर आहे. तसेच धरणाचे पाणलोट क्षेत्र 388.50 चोरस किलोमीटर आहे. भातसा धरणाला जोडलेला उजवा तीर कालवा 67 किलोमीटर आहे. तर डावा कालवा 50 किलोमीटर आहे. भातसाधरणाच्या पाण्यावरती जलविद्युत केंद्राद्वारे 15 मेगावॅट एवढी वीजनिर्मिती केली जाते. मात्र यंदा पुुुरेेेसा पाऊस धरण क्षेत्रात झाला नाही. त्याातच धरणाला गळती सुरू असल्यााने धरणाची पाण्याची पातळी प्रचंड घसली आहे. गेेल्या वर्षी धरणात 128.56 मीटर पाण्याची पातळी होती. तीच पाण्याची पातळी यावर्षी 124.54 मीटर इतकी आहे. ही पाणी पातळी 5 मीटरने कमी आहे.

- Advertisement -

कालव्याचा मातीचा भरावाला भगदाड पडून कालवा फुटल्याचे समजताच लागलीच भातसा धरणातील उजव्या तीर कालव्याचे पाणी बंद करण्यात आले. कालव्यातील पाणी तातडीने इतरत्र लघु चार्‍या व पोटचार्‍यामध्ये या पाण्याचा विसर्ग वळवण्यात आला. कालव्याचे मुख्य गेट बंद करण्यात आले आहेत. एकूण 3 लाख लिटर पाणी वाया गेल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी फुटलेल्या कालवा दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. लवकरच कालवा दुरुतीचे काम पूर्ण केले जाईल.
आनंद उदमले, उपविभागीय अभियंता, भातसा कालवा, उपविभाग शहापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -