घरमुंबईभंगारातील बस चालविण्यास द्या; भाजपा नगरसेवकाची मागणी

भंगारातील बस चालविण्यास द्या; भाजपा नगरसेवकाची मागणी

Subscribe

निकामी झालेल्या काही बसेसची भंगारात विक्री करण्याचा परिवहन समितीने निर्णय घेतल्याने तोट्यात असलेल्या केडीएमटीला सावरण्यासाठी भाजप नगरसेवकाने भंगारातील बस चालविण्याचा पर्याय सुचवला आहे.

भंगारात काढण्यात येणाऱ्या बसेसपैकी एक बस आपल्याला ‘दत्तक’ तत्त्वावर चालवण्यास द्यावी, अशी मागणी भाजपा नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांनी महापालिका आयुक्त गोविंद बोडके आणि परिवहन व्यवस्थापक मारूती खोडके यांना एका पत्राद्वारे केली आहे. एकीकडे केडीएमटी दिवसेंदिवस तोट्यात चालली असून दुसरीकडे निकामी झालेल्या काही बसेसची भंगारात विक्री करण्याचा परिवहन समितीने निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक संदीप गायकर यांनी केलेल्या मागणीला महत्व प्राप्त झाले आहे.

sandip_gaikar

- Advertisement -

हेही वाचा – कॉ. पानसरे हत्या प्रकरण – मुंबई उच्च न्यायालयाने एसआयटीला फटकारले

उत्पन्न महापालिकेला देणार

केडीएमटीची ही बस दत्तक मिळाल्यास ती स्वखर्चाने सुस्थितीत आणून शहरातील विविध मार्गावर फिरवण्यात येईल. तसेच यातून येणारे जे काही उत्पन्न असेल ते सर्वच्या सर्व महापालिकेला देण्यात येईल. या संकल्पनेतून आपल्याला एक रुपयाचीही अपेक्षा नसून त्यासाठी महापालिकेने २ चालक, २ वाहक आणि आवश्यक ते इंधन उपलब्ध करून द्यावे, असे गायकर यांनी पत्रात नमुद केले आहे. तसेच या बसचा एक वर्षाचा देखभाल-दुरुस्तीचा खर्चही गायकर स्वतः करणार असून ही बस फायद्यामध्ये येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना करण्याचे अधिकारही आपल्याला देण्यात येण्याची विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे.

हा पथदर्शी उपक्रम राबवण्यासाठी मी इतर लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांना निश्चितपणे तयार करेन. जेणेकरून तोट्यात चाललेला परिवहन उपक्रम बाहेर येण्यास मदत होईल.
संदीप गायकर, भाजपा नगरसेवक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -