घरमुंबईमुंबई मनपा कर्मचाऱ्यांना नोकरीच्या शेवटच्या दिवशी मिळणार खास गिफ्ट

मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना नोकरीच्या शेवटच्या दिवशी मिळणार खास गिफ्ट

Subscribe

मुंबई महापालिकेतून निवृत्त होणाऱ्या कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आठवण म्हणून महापालिकेचे बोधचिन्ह असलेले स्मृतिचिन्ह भेट म्हणून दिले जाणार आहे.

महापालिकेची सेवा केल्यानंतर नियत वयोमानानुसार निवृत्त होणाऱ्या कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आठवण म्हणून महापालिकेचे बोधचिन्ह असलेले स्मृतिचिन्ह भेट म्हणून दिले जाणार आहे. निवृत्तीच्या दिवशी होणाऱ्या समारंभात माहापालिका सेवेतील आठवण म्हणून हे स्मृतिचिन्ह भेट म्हणून दिले जाणार आहे. महापलिका कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशीच भविष्य निर्वाह निधीसह सर्वच दाव्यांची रक्कम दिली जावीत, त्याबाबतची प्रमाणपत्रे दिली जावीत, अशी मागणी होत असताना, त्यांना महापालिकेचे स्मृतिचिन्ह भेट देण्याचा निर्णय घेत कर्मचाऱ्यांच्या मूळ मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका असा लौकिक असणारी बृहन्मुंबई महापालिका सव्वा कोटीपेक्षा अधिक नागरिकांना विविध नागरी सोयी-सुविधा अव्याहतपणे देत असते. या सेवा सुविधा देण्यात आपला खारीचा वाटा उचलणारे महापालिकेचे कर्मचारी हे सामान्यपणे आपल्या वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्त होतात. तर महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक कर्मचारी हे वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर निवृत्त होतात. यानुसार निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी संबंधित खाते किंवा विभागाच्या स्तरावर निरोप समारंभ आयोजित करण्याची प्रथा आहे. मात्र, यासाठी आजवर अधिकृत अशी कार्यपद्धती आणि आर्थिक तरतूद नव्हती. हे लक्षात घेऊन महापालिकेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महापालिकेचे बोधचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्याचा प्रस्ताव संचालक (अभियांत्रिकी सेवा प्रकल्प) यांच्या कार्यालयाद्वारे सादर करण्यात आला होता. या प्रशासकीय प्रस्तावाला महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नुकतीच मंजूरी दिली आहे, अशी माहिती ‘अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प’ संचालक विनोद चिठोरे यांनी दिली आहे.

- Advertisement -

या प्रस्तावानुसार नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेचे बोधचिन्ह असलेले सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. प्रति सन्मानचिन्ह रुपये २ हजार पाचशे रुपये पर्यंत खर्च करण्यास तत्वत: मंजूरी देण्यात आली आहे. तर सेवेचा गौरव करणाऱ्या प्रमाणपत्राचे आरेखन आणि मुद्रण हे महापालिकेच्याच भायखळा येथील छापखान्यात करण्यात येणार आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या प्रमुख लेखापाल यांनी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात आले आहे.

नोकरीतील ‘शेवटचा दिस गोड व्हावा’ अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यानुसार महापालिकेत प्रदीर्घ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा निवृत्तीचा क्षण अधिक ‘गोड’ व्हावा, यासाठी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते महापालिकेचे बोधचिन्ह असलेले सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांच्या सेवेचा गौरव करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे नियत वयोमानानुसार सामान्यपणे ५८ व्या वर्षी यानिमित्ताने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निरोप समारंभ अधिक ‘गोड’ होण्यासोबतच एका वेगळ्या अर्थाने महापालिकेची एक आठवण कर्मचाऱ्यांच्या घराघरात विराजमान होणार आहे. यामुळे महापालिका सेवेतून निवृत्त होणाऱ्या कामगार, कर्मचारी, अधिकारी यांच्या नोकरीचा ‘शेवटचा दिस अधिक गोड’ होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -