घरमुंबईबहिणीची हत्या करून भाऊ फरार

बहिणीची हत्या करून भाऊ फरार

Subscribe

पत्नीच्या प्रियकराचा काटा काढताना मध्येच बहीण आली असता तिची हत्या झाल्याची घटना बुधवारी सकाळी 5 च्या सुमारास नेरुळमधील नेरुळ गावात घडली. या प्रकारानंतर बहिणीची हत्या करणारा भाऊ फरार झाला असून नेरुळ पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश बाबू लाड (26) असे हत्या करणार्‍याचे नाव असून त्याची पत्नीही या प्रकरणात गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर डी.वाय.पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुनीता अजय जर्मन सिंग (30) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून ती नेरुळ सेक्टर 20 मध्ये राहत होती. नागेशचे सन 2015 मध्ये लग्न झाल्यानंतर तो नेरुळ गावात राहणार्‍या बहीण सुनीता सिंग हिच्याकडे राहायला गेला होता. सुनिता सिंग हिचा पती अजय उर्फ जर्मन सिंग रिक्षा चालवत असल्याने तो दिवसभर बाहेरच असायचा. नागेश व सिंग एकाच घरात राहत असल्याने गेल्या दोन वर्षात सिंगचे नागेशच्या पत्नीबरोबर अनैतिक संबंध सुरू झाले. ही बाब नागेशच्या लक्षात आली असता त्याने प्रथम पत्नीला समज दिली. त्यानंतरही हा प्रकार सुरू असल्याने नागेशच्या मनात राग होता.

- Advertisement -

बुधवारी सकाळी सर्वजण गाढ झोपेत असताना नागेशने जर्मन सिंहचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्याने सिंहला मारण्याचा प्रयत्न केला असता घरातील इतर मंडळी जागी झाली आणि त्याच वेळी जर्मन सिंहची पत्नी सुनीता पतीला वाचवण्यास मध्ये आली आणि जर्मन सिंहला मारण्यासाठी उगारलेला चाकू नागेशची बहीण सुनिताच्या पोटात घुसला. सुनीताला वाचवण्यासाठी नागेशची पत्नी ज्योत्स्ना मध्ये आली असता नागेशने तिच्यावरही वार केले. त्यामुळे ती सुद्धा गंभीर जखमी झाली. त्यानंतर जर्मन सिंहने पळ काढत सरळ पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला. तर इतरांनी नागेशची पत्नी व बहीण यांना उपचारासाठी डी.वाय.पाटील हॉस्पीटलमध्ये दाखल केले. त्यावेळी उपचाराअंती सुनीता सिंग यांचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -