घरमुंबईप्रचाराचा सुपर संडे

प्रचाराचा सुपर संडे

Subscribe

लोकसभा निवडणुकीची देशभरात धामधूम सुरू आहे. दुसर्‍या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर आता दोन दिवसांनी अर्थात २३ एप्रिल रोजी होणार्‍या तिसर्‍या टप्प्यातील मतदानाचे वेध लागले आहेत. त्यानंतर मात्र अवघ्या राज्याचे लक्ष चौथ्या टप्प्यात अर्थात २९ एप्रिल रोजी होणार्‍या मुंबईमधील मतदानावर सर्वांचे लक्ष लागणार आहे. मुंबईतील एकूण सहा लोकसभा मतदारसंघात ज्या हिरीरीने शिवसेना-भाजप सक्रिय आहे, तितक्याच उत्साहात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचाही प्रचार सुरू आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी रविवारी प्रचार थांबवला जाणार असल्याने सर्व राजकीय पक्षांनी 21 एप्रिल रोजी रविवार हाच प्रचाराचा सुपरसंडे म्हणूनच साजरा केला. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी रविवारी घरोघरी जाऊन मतदारांना प्रत्यक्ष भेटण्याबरोबर रॅली, चौकसभांवर जोर दिला. प्रचारात शिवसेना-भाजपसह दोन्ही काँग्रेसने आघाडी घेतली आहे. मात्र २०१४ प्रमाणे यंदा मोदी लाट नसल्याने संपूर्ण देश आणि राज्यासह मुंबईतील चित्रही अस्पष्ट आहे. मोदी विरोधी सुप्त लाट जशी देशभर आहे, तशी मुंबईतही असल्याचे संकेत मिळत आहेत, मात्र त्याचा किती परिणाम महायुतीवर आणि किती फायदा महाआघाडीला होणार आहे, हे मात्र मतदारांवर अवलंबून असणार आहे.

चर्चमधून शेट्टी, मातोंडकरचा प्रचार

उत्तर मुंबई मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर निवडणूक रिंगणात आहेत. सुपर संडेनिमित्ताने या दोघांनी चौकसभा तथा ग्रुप मिटींगवरच अधिक भर दिला. त्यातच ईस्टर संडे असल्याने शेट्टी यांनी मालाड पश्चिम येथील खारोडी ब्लू हेवन हॉटेलमध्ये कॅथलिक समाजाच्या गेट टुगेदरमध्ये सहभाग घेतला होता. तर उर्मिला मातोंडकर यांनी मालाडमधील ऑर्लेम चर्चमध्ये जावून कॅथलिक समाजबांधवांच्या प्रार्थनेत सहभागी झाल्या. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी ख्रिश्चन बांधवांबाबत गोपाळ शेट्टी यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे ख्रिश्चन बांधवांमध्ये नाराजी पसरली होती. त्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी कॅथलिक समाजाच्या गेट टुगेदरमध्ये सहभागी होवून यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

शेट्टी यांनी कांदिवली महावीर नगर, डहाणूकरवाडी सोसायटी पदाधिकार्‍यांची मिटींग, रिबल वेली येथे चौकसभा व ग्रुप मिटींग, बोरिवली पै नगर येथे चौकसभा, बोरिवली पश्चिम सुयोगनंद-नवा गाव येथे चौकसभा, कांदिवली पश्चिम येथे एम.जी. रोड येथे मिटींग घेत प्रचार केला. तर उर्मिला मातोंडकर यांनी कांदिवली ठाकूर कॉम्प्लॅक्स, एव्हरशाईन क्लब येथे नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी दहिसर पूर्व एन.एल. कॉम्प्लेक्स ग्राऊंड आणि मालाड येथील लोखंडवाला सफायर क्लब येथेही हजेरी लावत ग्रुप मिटींग आटोपून घेतली.

शेट्टी यांनी वझीरा शिंपोली शांतीधाम प्रार्थनालयाला भेट देवून बह्मकुमारीज परिवाराच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर ओडिया समाजाचा मेळावा तसेच सोडावाला लेन समाज मैदानातील राणा समाज वार्षिक संमेलनातही उपस्थिती लावत याही व्यासपीठावरून प्रचार केला. तर उर्मिला मातोंडकर यांनीही बोरिवली पश्चिम येथील साईबाबा नगर येथे ‘माता की चौकी’ या कार्यक्रमात भाग घेत देवीचा आशिर्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील तसेच माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी उपस्थित होते.

- Advertisement -

दक्षिण मध्य मुंबईत रॅली, सभांचा धडाका

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपले आहे. मुंबईत उन्हाचा पारा चढलेला असला तरीही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मोठी मुसंडी मारत सुपर संडेचा पुरेपूर वापर करून घेतला. प्रचारसभांपासून ते बाईक रॅली असा जोरदार प्रचार उच्चभ्रू वस्तीपासून ते झोपडपट्ट्यांमध्ये आज दक्षिण मध्य मुंबईत पहायला मिळाला. मतदारसंघातील मतदारापर्यंत पोहचण्यासाठी लागोपाठ जोडून आलेल्या सुट्ट्या तसेच ईस्टरचा सण गाठून सर्व उमेदवारांनी रविवारी प्रचाराची सर्व कसर भरून काढली.

दक्षिण मुंबईतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी सुपर संडेच्या निमित्ताने बाईक रॅली आणि जाहीरसभांचा धडाका लावला होता. सायन प्रतिक्षा नगर येथे बाईक रॅलीला सुरूवात झाली. व्यापारी, कष्टकरी, मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू अशी संमिश्र वस्ती असलेल्या दक्षिण मतदारसंघात रविवारी एकनाथ गायकवाड यांनी विविध समाजाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. भंडारी, राजपूत अशा विविध समाजाच्या संघटनांच्या सदस्यांसोबत गायकवाड यांनी चर्चा केली. तसेच अ‍ॅन्टॉप हिल परिसरात राजीव गांधी नगर, धारावी रेस्टॉरन्ट, सायनच्या भारतीय कमला नगर येथेही सभांसाठी त्यांनी हजेरी लावली. सायन प्रतिक्षा नगर येथील तारामाता अभिषेक सोहळा आणि भंडार्‍यासाठीही गायकवाड उपस्थित होते.

शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा सुपर संडेचा प्रचार फेरीचा मार्ग हा चेंबूर विधानसभा क्षेत्रात होता. लालडोंगर, वाशीनाका, जिजामाता नगर, माहुलगाव, माहुल म्हाडा कॉलनी या भागात आज प्रचारफेरी आणि पदयात्रेच्या निमित्ताने राहुल शेवाळे नागरिकांपर्यंत पोहोचले. लाल डोंगर, चेंबूर येथे बाईक रॅलीमध्ये ते सहभागी झाले होते. छेडा नगरच्या सुब्रह्मण्यम मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर छेडा नगर रेसिडेन्ट वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठकीनंतर शेवाळे हे धारावीच्या सभेसाठी रवाना झाले. चेंबूरला महायुतीच्या पदाधिकार्‍यांसोबतच्या बैठकीसाठी ते उपस्थित होते.

चाय पें चर्चा आणि क्रिकेटने वेधले लक्ष

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकरता रविवार ही सुवर्ण संधी होती. या संधीचा पुरेपर फायदा उमेदवारांनी घेतल्याचे चित्र रविवारी मुंबईत दिसून आले. यात दक्षिण मुंबईतील शिवसेनेच्या उमेदवार अरविंद सावंत यांनी ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम आयोजित करून सगळ्यांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर आदित्य ठाकरेंनी चक्क मैदानात उतरून बॅट हातात घेतल्याने याठिकाणी युतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा जोरदार बॅटिंग केल्याचे चित्र रविवारी दिसून आले. त्याचबरोबर दुपारी अरविंद सावंत यांनी घरोघरी प्रचाराला महत्व दिले होते. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत यावेळी बाईक रॅली देखील काढण्यात आली होती. ज्यात मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी सहभाग नोंदविला होता. रविवारचा मुहूर्त साधत यावेळी अनेक दिग्गज दक्षिण मुंबईत प्रचारासाठी उतरल्याने सावंतासाठी हा प्रचाराचा सुपर संडेच ठरला.

दुसरीकडे महाआघाडीचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी देखील प्रचाराच्या सुपर संडेचा मुहूर्त साधत जोरदार प्रचार केल्याचे चित्र दक्षिण मुंबईत दिसून आले. देवरा यांनी आपल्या प्रचाराची सुरुवातच मार्निंग वॉकच्या निमित्ताने करून संडेच्या प्रचारास सुरुवात केली. रविवारी सकाळी देवरा यांनी मरिन ड्राईव्ह परिसरात मोठ्या संख्येने येणार्‍या नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर देवरा यांनी दिवसर घरोघरी प्रचाराला प्राधान्य देत कुलाबा येथील गीता नगर भागात प्रचाराला सुरुवात केली. ताडदेव परिसरातील भाटीया हॉस्पिटलजवळ, तुकाराम जावी रोड, गोकुल निवास यांसारख्या ठिकाणी भेट देत नागरिकांशी संवाद साधल्याचे चित्र रविवारी पहायला मिळाले.

घरगुती, स्थानिक पातळीवरील प्रचारात ‘दोघीही’ व्यस्त

उत्तर मध्य मतदारसंघात निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या दोन्ही महिला उमेदवारांसाठी हा रविवार प्रचाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरला. निवडणूक आणि उमेदवारांच्या नावांची घोषणा झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष प्रचाराला लागले. त्यामुळे, जेवढे लवकरात लवकर मतदारांपर्यंत पोहोचता येईल तितक्या प्रचाराच्या फेर्‍या पूर्ण होतील, म्हणून भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन आणि त्यांच्यासमोर पूर्ण ताकदीनिशी उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांनी रविवारी सकाळपासूनच प्रचाराला जोरदार सुरुवात केली.

उत्तर मध्य मतदारसंघातील ज्या ज्या ठिकाणी जाणे शक्य होईल अशा सर्व ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला. मात्र यातील असेही भाग आहेत, जिथे दोन्ही उमेदवार फिरकल्याच नाही, त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. रविवारी सकाळपासूनच पूनम महाजन यांनी त्यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात केली, पण, फक्त प्रचारापूरतेच जनतेशी संवाद न साधता ऐरव्हीदेखील त्यांनी स्थानिक प्रश्नांंवर तोडगा काढण्यासाठी मतदारांना भेटावे, अशी अपेक्षा मतदारांनी व्यक्त केल्या. तर, प्रिया दत्त यांनी संध्याकाळी आपल्या प्रचाराचा धडाका लावला आणि पुन्हा एकदा जनतेसाठी काम करण्याची संधी द्या असे आवाहन केले. आपली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वच उमेदवारांकडे काही दिवसच उरले आहेत. २९ एप्रिलला मुंबईसाठी मतदान केले जाणार आहे. त्याआधी या उमेदवारांना आपल्या जनतेला पुन्हा एकदा आश्वासने देऊन खूश करता येईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शेवटच्या रविवारीही थंड प्रतिसाद

शेवटच्या टप्प्यासाठी 29 एप्रिलला निवडणूक होत असून, मुंबईतील सहा मतदारसंघाचा देखील शेवटच्या टप्प्यात समावेश होत आहे. पुढच्या शनिवारी म्हणजे 27 एप्रिलला शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे २० एप्रिल, हा शेवटचा रविवार हा प्रचाराचा होता. रविवार असल्यामुळे मुंबईतील मतदारसंघात प्रचाराचा जोर असेल असे वाटत होते. पण उत्तर-पश्चिम मतदारसंघात नेहमीप्रमाणे आजही वातावरण थंड वाटत होते. दिवसभर शिवसेना आणि काँग्रेसच्याही उमेदवारांचा प्रचाराचा जोर दिसला नाही. शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांची सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत अंधेरी पूर्व विधानसभा आणि संध्याकाळी ५ ते ८ जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात प्रचार फेरी काढण्यात आली. तर काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांची सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत वर्सोवा येथे प्रचार फेरी काढण्यात आली तर 3 ते 5 यावेळेत गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनी येथे प्रचार फेरी काढण्यात आली. मात्र या प्रचार फेरीमध्ये शक्ती प्रदर्शन दिसलेच नाही. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मतदारसंघातील रहिवाशांमध्ये देखील उत्साह पहायला मिळाला नाही. दरम्यान गृह निर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे तिसर्‍या टप्प्याच्या मतदानासाठी त्यांचे लक्ष सध्या रत्नागिरी-सिधुदुर्ग मतदारसंघात आहे.

महत्वाचे कार्यकर्ते घेतायेत गुप्त बैठका –

दरम्यान आपलं महानगरने उत्तर पश्चिम मतदारसंघातील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारले असता या कार्यकर्त्यांनी प्रचार सभेपेक्षा आम्ही गुप्त बैठका घेऊन, चाळीचाळीमध्ये बैठका घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक कार्यकर्त्याला त्याचा त्याचा विभाग वाटून देण्यात आल्यामुळे जो तो आपापल्या विभागात काम करत आहेत. त्यामुळे प्रचार फेरीच्या गर्दीपेक्षा बैठकांकडे जास्त कार्यकर्त्यांचे लक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.

बाईक रली व बैठकांवर भर

मुंबईत होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा रविवार असल्याने उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी विविध क्लृप्या लढवल्या. ईशान्य मुंबईतील भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांनी रविवारी सकाळी विविध रहिवासी सोसायट्यांसोबत बैठका घेण्याचा धडाका लावला होता. तसेच दुपारनंतर त्यांनी घाटकोपरमधील पंत नगर ते मुलुंड पश्चिमेकडील बालराजेश्वर मंदिरापर्यंत भव्य बाईक रॅली काढली. यामध्ये कोटक यांनी त्यांचा पूर्ण मतदारसंघाच एकप्रकारे काबीज करण्याचा प्रयत्न केला. एकीकडे कोटक बैठका व बाईक रॅलीवर भर देत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटिल यांनी मुलुंड पश्चिमेला तांबे नगर येथे जाहीर सभा घेतली. या सभेच्या माध्यामातून त्यांनी मतदारांशी संवाद साधला. सभेच्या माध्यामातून त्यांनी विरोधकांच्या कामाचा समाचार घेत त्यांच्यावर टिका केली. तर दिवसभर पाटील व त्यांच्या कुटुंबाने विविध भागात प्रचार केला. एकीकडे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बैठक, रॅली व सभांमधून जोरदार प्रचार करत असताना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार निहारिका यांनी ही जोरदार प्रचार केला. त्यांनी भांडुप परिसरात भव्य रॅली काढली. या रॅलीला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन केले.

पोलिसांसाठी शेवटचा रविवारी ठरला खास दिवस

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईतील उमेदवारांसाठी आजचा रविवार हा खास ठरला. सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार प्रचारासाठी रस्त्यावर उतरले होते, या प्रचाराच्या दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून काळजी घेण्यात येत होती. कायदा व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले. मुंबईतील लोकसभा निवडणुकासाठी एक आठवडा उरलेला असून सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागलेले आहेत. प्रचारासाठी हा शेवटचा रविवारी असल्यामुळे मुंबईतील सर्वच उमेदवार सर्व ताकदीने प्रचारासाठी रस्त्यावर उतरले होते. या प्रचाराला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलिसांकडून देखील विशेष काळजी घेण्यात आली होती. मुंबईतील संवेदशील विभागात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती, तसेच जागोजागी नाकाबंदी लावण्यात आलेली होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील पोलिसांच्या साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्यामुळे रविवारच्या प्रचाराच्या दिवशी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील जागोजागी रस्त्यांवर गस्त घालताना दिसत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -