घरताज्या घडामोडीशिवभोजन थाळी केंद्रात कॅमेरे बसवण्याचे आदेश

शिवभोजन थाळी केंद्रात कॅमेरे बसवण्याचे आदेश

Subscribe

राज्य सरकारच्या शिवभोजन थाळी केंद्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने एक नवा आदेश जारी केला आहे. त्यानुसार, सर्व शिवभोजन केंद्र चालकांना स्वखर्चाने आपल्या केंद्रात कॅमेरे बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवभोजन थाळी योजनेत होणारे गैरव्यवहार टाळण्यासाठी हे आदेश वितरित करण्यात आले आहेत.

अन्न व नागरी पुरवठा विभागाने जारी केलेल्या या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२२ पर्यंत आपापल्या शिवभोजन थाळी केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश काढले आहेत. शिवभोजन केंद्र चालकांनी स्वखर्चाने हे कॅमेरे बसवायचे आहेत. केंद्राच्या क्षमतेनुसार त्यांची संख्या असावी. तसेच, प्रत्येक कॅमेर्‍यात शिवभोजन दिसायला हवे.

- Advertisement -

केंद्र चालकाने किमान ३० दिवसांचे फुटेज तपासणीसाठी उपलब्ध होईल, याची दक्षता घ्यावी. आवश्यकता भासेल तेव्हा सर्व डाटा तपासणीसाठी पेन ड्राइव्हमधून अधिकार्‍यांना द्यावा. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था करून अखंड फुटेज मिळेल, याची काळजी घेण्याची जबाबदारी केंद्र चालकाची राहील अशा सूचनाही या संचालकांना देण्यात आल्या आहेत.

केंद्र संचालकांप्रमाणेच राज्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी यांनाही विभागाने पत्र पाठविले आहे. या पत्रात विभागीय स्तरावरील अधिकार्‍यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शिवभोजन केंद्रावर ३१ जानेवारीपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत किंवा नाही, याची तपासणी करून कार्यवाही करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. शिवभोजन केंद्राचे देयक देताना तक्रार आल्यास सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात यावी. त्यात अनियमितता आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी. तसेच, तक्रारीवर अंतिम आदेश येईपर्यंत सीसीटीव्ही फुटेज गहाळ होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -