घरमुंबई'पावसाच्या उपायोजनेत अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा'

‘पावसाच्या उपायोजनेत अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा’

Subscribe

पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. विधानसभेत स्थगत प्रस्तावावर बोलताना ते बोलत होते.

मुंबई महानगरपालिका पावसाळी उपाययोजना करण्यात फोल ठरल्याने मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तसेच अनेक नागरिकांना पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे.  याअगोदर घडलेल्या घटनांमधून धडा न घेता उपाययोजना करण्यामध्ये टाळाटाळ करणाऱ्या सबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी  विधानसभेच्या सभागृहात केली. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्तीबाबतच्या स्थगन प्रस्तावावरील चर्चेमध्ये ते सभागृहात बोलत होते.

नेमके काय म्हणाले छगन भुजबळ?

छगन भुजबळ म्हणाले की, ‘केवळ मुंबई शहरातच नव्हे तर राज्यातील अनेक महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात देखील पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा केवळ पावसाळ्यात नाही तर वर्षभर काम करत राहिली, तर अशा संकटाना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही.’ त्यादृष्टीने वर्षभर अशा प्रकाराची कामे करण्याची गरज असल्याचे सांगून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा ठिकाणावर आहे का ? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला. यापुढे भुजबळ म्हणाले की,  कालच पुण्यात भिंत कोसळून काही लोक मृत्युमुखी पडले. पाऊस सुरू झाला की मुंबईतून पहिल्या बातम्या येतात. आता पुण्यातून देखील अशा बातम्या यायला लागल्या आहे. पूर्वी एकच आयुक्त असायचे तेव्हा मुंबई सुरळीत चालायची. आता अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त असे १५ ते १६ आयुक्त आहेत. तरी देखील मुंबईची ही अवस्था निर्माण झाली आहे. या मुंबईचे नैसर्गिक पाणी वाहून जाण्याचे मार्ग होते. ते नवीन इमारती बांधल्यामुळे बंद झाले आहे. त्यामुळे आपल्याला आता फक्त ड्रेनेजवर अवलंबून रहावे लागते. म्हणून पाणी मुंबईत तुंबत आहे. परंतु, महापालिकेचे अधिकारी करतात तरी काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच पावसात काम करणाऱ्या पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे मात्र कौतुक करायला हवे, असे ते म्हणाले.

मिठी नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न प्रलंबित आहे – भुजबळ

मुंबईच्या मिठी नदीमध्ये आमदार, खासदार, महापौर जातात पाहणी करतात. मात्र, तिची अवस्था जशी आहे तशीच आहे. तिचे पाणी थेट लोकांच्या घरात जात आहे. आजवर या नदीच्या स्वच्छतेवर हजारो कोटी रुपये खर्च झाले आहे. मात्र अद्याप मिठी नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न प्रलंबित आहे. याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष देऊन विविध सामाजिक संस्थाना निधी उपलब्ध करून या नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाऊ शकतो का? यावरही विचार विनियम करून त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भुजबळ यांनी केली. यापुढे ते म्हणाले की, मुंबई शहरात एसआरएचे अनेक प्रकल्प उभे राहत असतांना झोपडपट्टीचे क्षेत्र मात्र वाढतच आहे. वसाहती उभ्या राहत असतांना तेथील पाण्याचा निचरा कसा होईल? यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. वाढीव एफएसआय दिल्याने अनेक ठिकाणी पाणी जिरायला देखील जागा नाही. त्यामुळे हे सर्व पाणी झोपडपट्टीत जात आहे. हे सर्व नागरिक रस्त्यावर येतात. याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच २६ जुलैचे दाखले आपण देतो तेवढा पाऊस पुन्हा पडला तर मुंबईचे काय होईल, काही सांगता येत नाही. त्यामुळे मुंबई शहरात हे काम फक्त पावसाळ्याचे वेळेस करण्याचे काम नाही. हे काम वर्षभर चालले पाहिजे, असे भुजबळांनी यावेळी सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -