घरमुंबईभाईंदरमध्ये रस्ते खोदाईच्या कामामुळे शहरवासीय त्रस्त

भाईंदरमध्ये रस्ते खोदाईच्या कामामुळे शहरवासीय त्रस्त

Subscribe

मीरा-भाईंदर शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर सध्या अमृतजलवाहिनी, मे.अदानी पॉवर, महानगर गॅस, केबल वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे संबंधित ठेकेदाराच्या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. आधीच शहरातील रस्त्यांवर खड्डे, अतिक्रमण, वाहनतळाचा अभाव अशा समस्या असताना आता हे खड्डे खोदून ठेवल्यामुळे जीव मुठीत घेवून वाहन चालवण्याची वेळ आली आहे. खोदकामानंतर मातीचे ढिगारे तसेच असल्याने धुळीचा त्रासही होत आहे. तर रात्री अपरात्री मोठ्या मशिन लावून खोदाई केली जात असल्याने त्याच्या आवाजामुळे रहिवाशांची झोपही उडाली आहे.

शहरातील बहुसंख्य रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे खोदकाम करणारा ठेकेदार नंतर हे खड्डे अर्धवट बुजवून काढता पाय घेत आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस योग्य राहत नाही. गेल्या काही दिवसांपासून तर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांच्या कडेला असे खोदकाम जोरात सुरू आहे. अमृत योजनेतील मलवाहिनी व जलवाहिन्या यांच्यासह वीज पुरवठा, इंटरनेट पुरवठा करणार्‍या कंपन्याकडून टाकण्यात येणार्‍या केबल्ससाठी हे खोदकाम होत आहे. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका वाहनचालक व पायी चालणार्‍या नागरिकांना सोसावा लागत आहे.

- Advertisement -

सेव्हन इलेव्हन शाळेच्या बाजूला जवळजवळ 100 मीटरच्या आसपास रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. याठिकाणी दिवसरात्र हॅमर मशीन लावून खोदकाम केले जात असल्याने त्याच्या आवाजाने रहिवाशी त्रस्त झाले आहेत. मशीनच्या आवाजामुळे रहिवाशी त्रस्त झाले असून तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. शहरातील रस्त्यांवर असलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते आधीच अरुंद झाले आहेत. त्यात प्रमुख रस्त्यांवर दुभाजक टाकण्यात आल्याने रस्ते अजूनच अरुंद झालेत. छत्रपती परिसर रोड येथे रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी संकुल, दवाखाने, निवास असल्याने नेहमीच वाहनांची वर्दळ असते. सध्या सुरु असलेल्या खोदकामामुळे हे रस्ते एकाबाजूने बंद झाले आहेत. केबल टाकताना पाइप्सचे ढापे नीट वापरले जात नसल्याचे समोर आले आहे. पूनम सागर परिसरातील रस्ता तयार होवून काही वर्ष देखील झालेले नसल्याने रस्ता खोदकाम झाल्याने रस्ता पूर्ण खराब झाला आहे.

रस्ता खोदाई करणार्‍या कंपनीनेच तो दुुरुस्त करून द्यावयाचा असतो. पण, रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली तेच खोदलेले काम बुजवण्यासाठी पुन्हा रस्ते दुरुस्ती (पॅचवर्क) च्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग कोट्यवधी रुपये खर्च करून भ्रष्टाचार करीत आहे. यासाठी खोदलेल्या रस्त्यांचे मोजमाप घेऊन तातडीने दंड वसुलीची कारवाई करावी. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी. विनापरवानगी आतापर्यंत केलेल्या संपूर्ण कामांची चौकशी करून दंड वसूल करावा. त्याचबरोबर महापालिकेचा महसूल बुडवून विनापरवानगी संगनमताने काम करणार्‍यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -