घरमुंबईकुलाबा- वांद्रे- सिप्झ दरम्यान ३२ ब्रेकथ्रू

कुलाबा- वांद्रे- सिप्झ दरम्यान ३२ ब्रेकथ्रू

Subscribe

मेट्रो ३ प्रकल्पात ७ स्टेशन्समध्ये विशेष तंत्रज्ञानाचा वापर

कुलाबा-वांद्रे- सिप्झ या मुंबई मेट्रो- ३ या भुयारी मार्ग प्रकल्पाच्या मिशन २०२१ अंतर्गत एकूण ३२ ब्रेकथ्रू होणार आहेत. सर्वात पहिला ब्रेकथ्रू छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठिकाणी झाला. यापुढचा दुसरा ब्रेकथ्रूदेखील याचठिकाणी होणार आहे. मेट्रो ३ च्या कामांतर्गत १७ टनेल बोरिंगच्या माध्यमातून ५२ किलोमीटरचे टनेल खोदण्याचे काम होणार आहे. आतापर्यंत १२ किलोमीटरचे काम झाले असून डिसेंबर २०१९ अखेरीस ८० टक्के टनेलिंगचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) ने ठेवले आहे. मुंबईतील अरूंद रस्ते हे मेट्रो ३ च्या कामातील सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळेच मेट्रोच्या सात स्टेशनच्या ठिकाणी एनएटीएम आणि कट एण्ड कव्हर पद्धतीने होणार आहे.

३२ ब्रेकथ्रू

किमान २ ब्रेकथ्रू प्रत्येक मेट्रो प्रकल्पाच्या ठिकाणी अपेक्षित आहेत. सर्वाधिक ब्रेकथ्रू हे पॅकेज ४ मध्ये नया नगर ते दादर या टप्प्यात एकूण ८ इतक्या मोठ्या प्रमाणात होणार आहेत. तर सर्वाधिक अंतराचा टनेल बोरिंगचा टप्पा हा सीएसटी स्टेशन ते मुंबई सेंट्रल दरम्यानचा ३.८१७ किलोमीटर इतका असणार आहे.

- Advertisement -

दोन तंत्रज्ञानांचा वापर

मुंबईतील अरूंद रस्त्यांमुळे एकूण ७ स्टेशनच्या ठिकाणी दोन तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. त्यामध्ये न्यू ऑस्ट्रीयन टनेलिंग मेथड (एनएटीएम) आणि कट एण्ड कव्हर मेथडचा समावेश आहे. मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाअंतर्गत साकीनाका, ग्रँट रोड, गिरगाव, काळबादेवी, हुतात्मा चौक, शितलादेवी या स्टेशनचा समावेश आहे. या परिसरात रस्ते अरूंद असल्यानेच या दोन पद्धतीचा वापर करण्यात येईल. शहरातील रस्त्यांच्या मर्यादा पाहूनच या दोन तंत्रज्ञानाने या स्टेशनचा विकास करण्याचे ठरले होते. त्यामुळे भूगर्भातील परिस्थिती अभ्यासूनच या दोन पद्धतीने स्टेशनचा विकास करण्याचे उद्दिष्ट प्रकल्पांतर्गत ठेवण्यात आले आहे. मेट्रो ३ प्रकल्पांतर्गत १३ स्टेशनचा विकास कट अ‍ॅण्ड कव्हर पद्धतीने होईल. तर एकच स्टेशन जमिनीवर असेल ते म्हणजे आरे स्टेशन. इतर ठिकाणी टीबीएम, एनएटीएम पद्धतीचा वापर करून स्टेशन उभारण्यात येतील.

१० मिलिमीटरची अचुकता

भुयारी प्रकल्पांतर्गत प्रत्येकवेळी रिअल टाईम पद्धतीवर आधारीत असे निर्णय घ्यावे लागतात. टनेल बोरिंगच्या कामात भूगर्भातील खडक कोणत्या पद्धतीचा आहे, त्याची क्षमता काय आहे यानुसार कटरचा स्पीड ठरतो. प्रत्येकवेळी टीबीएम मशीनवर काम करणार्‍या ऑपरेटरचा निर्णय महत्वाचा तर असतोच. पण त्यासोबतच प्रत्येक पॅकेजच्या ठिकाणी असणार्‍या सेंट्रलाईज मॉनिटरिंग सिस्टिममधून या सगळ्या भूगर्भातील घडामोडींवर लक्ष ठेवले जाते. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठिकाणी झालेल्या पहिल्या ब्रेकथ्रूमध्ये अवघ्या १० मिलीमीटर इतक्या अचुकपणे पहिला ब्रेकथ्रू झाला. मुंबईतल्या भूगर्भात बेसाल्ट, ब्रिशिया आणि टफ याप्रकारचा थर आहे. त्यामुळे प्रत्येकठिकाणी परिस्थितीनिहाय निर्णय घ्यावा लागतो, अशी माहिती एमएमआरसीएलचे संचालक (प्रकल्प) एस. के . गुप्ता यांनी दिली. प्रत्येक पॅकेजअंतर्गत वेगवेगळी आव्हाने असतात. अशावेळी भूगर्भातील स्थिती तसेच इंजिनिअरींग यांची सांगड घालावी लागते असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

ब्रेकथ्रू म्हणजे काय ?

मुंबई मेट्रो ३ प्रकल्पांतर्गत अप आणि डाऊन अशा दोन मार्गांचा समावेश आहे. सध्या १७ टनेल बोरिंग मशीनच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईत भुयारीकरणाचे काम सुरू आहे. टीबीएम मशीनचे टनेल बोरिंगचे काम एका बाजुला सुरू झाल्यापासून ती मशीन दुसर्‍या बाजून बाहेर निघण्याची प्रक्रिया म्हणजे ब्रेकथ्रू असतो. मुंबईत अनेक ठिकाणी या मशीन ब्रेकथ्रूनंतर दुसर्‍या ठिकाणी शिफ्ट करून टनेल बोरिंग करण्यात येणार आहे. २०१९ अखेरीपर्यंत ८० टक्के टीबीएमचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएमआरसीने ठेवले आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -