घरमुंबईआरक्षणाच्या गोंधळात विधीची प्रवेश प्रक्रिया रखडली

आरक्षणाच्या गोंधळात विधीची प्रवेश प्रक्रिया रखडली

Subscribe

ईडब्लूूएसला बार काऊन्सिलचा विरोध

मराठा आरक्षणाच्या गोंधळाचा फटका यावर्षी सर्वच प्रवेश प्रक्रियांना बसला आहे. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेनंतर दहावी व एफवायच्या प्रवेश प्रक्रियेला मराठा आरक्षणाचा फटका बसला होता. मात्र केंद्र सरकारने लागू केलेल्या सवर्णातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा फटका विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला बसला आहे. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना आरक्षण लागू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग आग्रही असले तरी बार काऊन्सिलने त्याला नकार दिल्याने विधीचे तीन व पाच वषेर्र् अभ्यासक्रमांचे प्रवेश रखडले आहेत.

पाच वर्षे व तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलकडून घेण्यात आली होती. तीन वर्षे विधी अभ्यासक्रमासाठी राज्यभरातून तब्बल 36 हजार 513 तर पाच वर्षे अभ्यासक्रमासाठी 18 हजार 114 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील पाच वर्षे अभ्यासक्रमाचा निकाल 13 मे रोजी तर तीन वर्षे अभ्यासक्रमाचा निकाल 17 जूनला सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आला होता. मात्र निकाल जाहीर होऊन बराच कालावधी लोटला तरी प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत सवर्णातील आर्थिकदृष्ठ्या मागास उमेदवारांना 10 टक्के आरक्षण लागू केले आहे. परंतु यंदापासून हे आरक्षण विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशामध्ये लागू करू नये, असे बार काऊन्सिलने स्पष्ट केले आहे. तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सीईटी सेलला हे आरक्षण लागू करण्यास सांगितले आहे. बार काऊन्सिल व उच्च व तंत्र शिक्षण विभागामधील गोंधळामुळे सीईटी सेलने प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू केलेली नाही. याचा फटका विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना बसत आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू होत नसल्याने त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

आरक्षणाबाबत उच्च शिक्षण विभागाला सूचना
आरक्षण लागू करावयाचे झाल्यास वाढीव जागांसाठी राष्ट्रीय शिक्षा परिषद व भारतीय विधीज्ञ परिषद यांची मान्यता घ्यावी लागेल. त्यामुळे प्रवेशाच्या माहिती पुस्तिकेमध्ये दिलेल्या निकषाप्रमाणे ईडब्ल्युएस उमेदवारांना आरक्षण द्यावे किंवा नाही याबाबत मार्गदर्शन करावे, अशी विनंती सीईटी सेलने उच्च व तंत्रशिक्षण विभागाला केली आहे.

आता मुंबई विद्यापीठाच्या निकालाकडे लक्ष
राज्यातील इतर विद्यापीठांनी त्यांनी घेतलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. मात्र, मुंबई विद्यापीठाचे निकाल अद्यापही जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे जोवर मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर होत नाहीत, तोवर प्रवेश प्रक्रिया सुरू करायची नाही, असे सीईटी सेलने ठरविले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -