घरमुंबईभाजपच्या जुमलेगिरीचा काँग्रेसकडून पोलखोल

भाजपच्या जुमलेगिरीचा काँग्रेसकडून पोलखोल

Subscribe

जाहीर केलेले कल्याण-डोंबिवलीकरांचे साडेसहा हजार कोटी कधी देणार ते सांगा?

शिर्डीमध्ये साईबाबांच्या समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलले, तीच परंपरा कल्याण येथे पंतप्रधानांनी पार पाडली. गेले चार वर्ष जुमलेबाजी आणि अतिरंजित आकडे दर्शवून खोट्या विकासाच्या वल्गना याहून वेगळे या सरकारने काहीही केले नाही. चार वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवलीसाठी जाहीर केलेल्या निधीचे काय झाले ते आधी जाहीर करा नंतर पुढच्या घोषणा करा, असा टोला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी लगावला. खोटे बोलून अवास्तव घोषणांचा पाऊस पाडायचा ही कार्यपद्धती पंतप्रधानांनी कल्याण येथील भूमीपूजनाच्या कार्यक्रमात ही सुरू ठेवली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये तेथील जनतेने केलेल्या जुमलेबाजीच्या अंताची जाणीव ठेवा अन्यथा लोकच तुम्हाला धडा शिकवतील, असा इशारा चव्हाण यांनी यानिमित्त दिला आहे.

नवी मुंबईत उभारायच्या घरांचे भूमिपूजन कल्याणमध्ये कसेकाय केले जाते, अशी विचारणा करत चव्हाण यांनी ज्या प्रकल्पाचे साधे टेंडरही निघाले नाहीत, त्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम कसाकाय योजण्यात आला, ते मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, असे आव्हान चव्हाण यांनी दिले. हा प्रकल्प इतर प्रस्तावित प्रकल्पांच्या राखीव जागांवर करण्यात येणार असल्याने जमिनीच्या वापरातही बदल होणार आहे. म्हणजे प्रकल्प नक्की कुठे आहे, हे निश्चित नसताना त्याचे भूमिपूजन म्हणजे केवळ फसवणूक असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. ज्या योजनेत लोकांना केवळ दोन लाख रुपये देणारे सरकार या लोकांच्या माथी २५ लाखांचे घर सोपवणार आहे, ही तर उघड बनवेगिरी असल्याचे चव्हाण म्हणाले.

- Advertisement -

ज्या पाचव्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले त्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे अधिग्रहणही झाले नाही आणि मेट्रोचा मार्गही निश्चित झालेला नाही. वन आणि पर्यावरण विभागाची परवानगीही या प्रकल्पाला नाही. असे असताना प्रकल्पाचे भूमिपूजन करणे हा सारा भपकेगिरीचा प्रकार असल्याचा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला. याआधी भूमिपूजन झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदूमिल स्मारकाचे, छत्रपती शिवरायांच्या मरीन ड्राईव्हमधील स्मारकाचे, भूमिपूजन होऊन वर्ष उलटलेल्या बुलेट ट्रेनचे काय झाले अशी विचारणा चव्हाण यांनी केली आहे.

निवडणुकीवेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी जाहीर केलेल्या निधीचे काय झाले, याची आठवण चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करून दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रचारात हा निधी देण्याचे जाहीर केले होते. त्यांना याचा सोयीस्करपणे विसर पडला असेल, असेही चव्हाण उपरोधिकपणे म्हणाले. शिर्डी येथे 16,000 गावे दुष्काळमुक्त केल्याच्या घोषणेची चव्हाण यांनी पोलखेल केली. जी गावे पंतप्रधानांनी दुष्काळमुक्त करून टाकली त्याच गावांचा समावेश आठवडाभरात दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत करण्यात आला, अशी आठवण चव्हाण यांनी करून दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -