घरमुंबईअमित शहांच्या स्वागताला काँग्रेसची पोश्टरबाजी

अमित शहांच्या स्वागताला काँग्रेसची पोश्टरबाजी

Subscribe

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा आज मुंबई दौरा आहे, मात्र या दौऱ्याला काँग्रेसकडूनच राहूल गांधी यांच्या मोदी मिठीचे पोश्टर लावून काँग्रेसने एकप्रकारे शहांचे स्वागतच केले आहे.

संसदेमध्ये अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेवेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अचानक मिठी मारल्याने एकच चर्चा रंगली. सोशल मीडियावर तर यावर विनोदाचा पाऊस पडला. आता तर चक्क काँग्रेसने मुंबईमध्ये बॅनर लावत राहुल गांधीच्या कृतीचे समर्थन केले आहे. भाजपवर पोस्टरद्वारे जोरदार टीका केली आहे. ‘नफरत से नहीं, प्यार से जीतेंगे,’ असा मजकूर लिहिलेले हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अमित शहांच्या मुंबई दौऱ्यानिमित्त पोस्टरबाजी

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी कालच ट्विटरवर हे पोस्टर ट्विट करुन याची माहिती दिली होती. आज मुंबईत सर्व ठिकाणी हे फलक लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. काँग्रेसने शहांच्या स्वागतासाठी ही जय्यत तयारी केली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपच्या स्वागताच्या बॅनरपेक्षा काँग्रेसचेच बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय आहे

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावादरम्यान केलेल्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारली होती. देशात सध्या जमावाकडून मारहाण करुन हत्या केल्या जात आहेत, धर्म आणि जातींमध्ये विद्वेषाचे बिज पेरले जात आहे, महिला, दलित, अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढले आहेत, असे सांगत राहुल गांधी यांनी मोदी यावर काहीच बोलत नसल्याचा आरोप केला होता. “मी हे सांगतोय यावर तुम्ही मला पप्पू म्हणून हिणवा किंवा काहीही म्हणा पण माझ्या मनात तुमच्याविषयी द्वेष नाही”, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींची गळाभेट घेतली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -