घरमुंबईकोरोना, मंदीचा आर्थिक फटका; मुंबई महापालिकेचा ११.५१ कोटी शिलकीचा अर्थसंकल्प

कोरोना, मंदीचा आर्थिक फटका; मुंबई महापालिकेचा ११.५१ कोटी शिलकीचा अर्थसंकल्प

Subscribe

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई पालिकेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ३९,०३८.८३ कोटी रुपयांचा आणि ११ कोटी ५१ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना बुधवारी सादर केला. गतवर्षी ३३४४१.०२ कोटींचा पालिकेचा अर्थसंकल्प होता, त्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात ५,५९७.८१ कोटी रुपयांची वाढ झाली.

मुंबई शहराला २०३० पर्यंत ‘आनंदी व विकसित शहर’ बनविणे, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि विकासकामे देण्याचे उद्दिष्ट आणि कोरोनाचे संकट, त्यावरील खर्च, उत्पन्नावरील परिणाम आदी बाबी डोळ्यासमोर ठेऊन यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचे पालिका आयुक्त चहल यांनी म्हटले आहे.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे मुंबई महापालिकेला सर्वात जास्त मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात कोरोनाला रोखण्यात जास्त लक्ष द्यावे लागले. त्यामुळे विकासकामांवर काहीसा परिणाम झाला आहे. मात्र, कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. मात्र, विविध उपाययोजना केल्याने सध्या कोरोनाला रोखण्यात यश आल्याचा दावा आयुक्त चहल यांनी केला आहे.

- Advertisement -

मालमत्ता कराची थकबाकी १५ हजार कोटींपेक्षाही जास्त झाली आहे. तर विकास शुल्क वसुलीतही घट आली आहे. त्यामुळे पालिकेला मिळणार्‍या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आयुक्तांनी, उत्पन्न वाढीसाठी नवीन स्त्रोत निर्माण करणे, पालिकेकडून देण्यात येणार्‍या सेवांसाठी करण्यात येणार्‍या शुल्कात काही वाढ करणे, शासनाकडील ५ हजार कोटी रुपयांची थकबाकी वसुली करणे, मालमत्ता कर वसुली करणे आदी उपाययोजनांद्वारे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.या अर्थसंकल्पात काही जुन्या योजनेवर आणि काही नवीन योजनांवर भर देण्यात आला आहे.

पालिकेची आर्थिक स्थिती
कोरोना महामारीमुळे मुंबईच्या विकासकामांवर, आर्थिक उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे, अशी कबुली पालिका आयुक्त चहल यांनी अर्थसंकल्प वाचन करताना दिली. पालिकेचा भांडवली खर्च २०१८-१९ ला जो ५४३२.२४ कोटी रुपये, २०२०-२१ मध्ये १०,९०३.५८ कोटी रुपये होता तो आता २०२१-२२ मध्ये थेट १८, ७५०.९९ कोटी रुपयांवर जाणार असल्याची भीती आयुक्त यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

दुसरीकडे, सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे आस्थापना खर्चात सुद्धा मोठी वाढ झाली आहे. २०२०-२१ मध्ये आस्थापना खर्च २१,९१२.८४ कोटी रुपये होता तो आता २०२१-२२ मध्ये थेट १४,०२१.७४ कोटी रुपयांवर जाणार असल्याचा अंदाज आयुक्तांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील वर्षात महसुली वर्ताळा खूपच कमी होणार असल्याचे भाकीत आयुक्तांनी वर्तवले आहे.त्यामुळे आता पायाभूत सुविधांवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे.

अंतर्गत कर्ज उभारणार
पालिकेची आर्थिक स्थिती पाहता, पायाभूत सुविधांवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. रस्ते, मिठी नदी विकास कामे, पर्जन्य जलवाहिन्यांची कामे, आरोग्य सुविधा, शाळांची पायाभूत कामे, कोस्टल रोड आदी जी सुरू आहेत त्यासाठी पतपुरवठा सुरूच राहील. मात्र, येत्या आर्थिक वर्षात भांडवली कामांसाठी वाढीव अंतर्गत कर्ज उभारण्याची गरज भासणार आहे. तसेच, नवीन आर्थिक स्त्रोत निर्माण करावे लागतील, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

महसुली उत्पन्नात ६३६.७३ कोटी रुपयांची घट

 महापालिकेचे सन २०२०-२१ चे महसुली उत्पन्न हे २८,४४८.३० कोटी रुपयांवरून २२५७२.१३ असे सुधारित करण्यात आले आहे. यामुळे पालिकेला महसुली उत्पन्नात ५,८७६.१७ कोटीने घट येणार आहे. सन २०२१-२२ मध्ये महसुली उत्पन्नाचा अंदाज २७,८११.५७ कोटी एवढा प्रस्तावित केला आहे. त्यामुळे २०२०-२१ च्या तुलनेत महसुली उत्पन्नात ६३६.७३ कोटी रुपयांची घट येणार आहे.

२०२०-२१ मध्ये मालमत्ता करापोटी मिळणारे उत्पन्न ६,७६८.५८ कोटी रुपये अंदाजित होते. ते आता ४५०० कोटी रुपये इतके सुधारित केल्याने महसूल उत्पन्नात २,२६८.५८ कोटी रुपयांची घट होणार असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
तसेच, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे छोटे व मोठे उद्योगधंदे बंद झाले. त्याचा परिणाम मालमत्ता कर संकलनावर झाला , असे आयुक्तांनी म्हटले आहे.

विकास नियोजन उत्पन्नावर परिणाम
कोरोनाचा विपरीत परिणाम हा विकास नियोजन उत्पन्नावर झाला आहे. त्यामुळे २६७९.५२ कोटी रुपयांची घट येणार आहे. कोरोनामुळे मुंबईतील मालमत्ता क्षेत्रात मंदी आली. त्यामुळे हजारो इमारतींमधील फ्लॅट विक्रीविना पडून राहिले. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाला, असे आयुक्तांचे म्हणणे आहे.

प्रमुख उत्पन्नाचे स्रोत

मुंबई महापालिकेला २०२१-२२ या आर्थिक वर्षात प्रमुख उत्पन्न स्त्रोतापासून प्राप्त होणारे उत्पन्न म्हणून जकातीपोटी नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून दरमहा ८४६ कोटींचा हप्ता मिळतो. त्यामुळे पालिकेला वर्षभरात शासनाकडून यापोटी तब्बल १०,५८४.०८ कोटी रुपये येणार आहेत. तसेच, मालमत्ता करापोटी ७ हजार कोटी रुपये, विकास नियोजन खात्याकडून २ हजार कोटी रुपये, गुंतवणुकीवरील व्याजापोटी ९७५.५६ कोटी आणि जल व मलनि: सारण आकारापोटी १५९८.०८ कोटी रुपये येणार आहेत.

अर्थसंकल्प आकडेवारी
या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न २७,८११.५७ कोटी रुपये, तर खर्च २०,२७६.३३ कोटी रुपये दाखविण्यात आलेला आहे. तसेच, भांडवली उत्पन्न ६६२.९६ कोटी रुपये तर खर्च १४,१११.०५ कोटी रुपये , कोस्टल रोड व अन्य प्रकल्प खर्च ४,६३९.९४ कोटी रुपये

अंतर्गत कर्ज उभारणी ५,८७६.८३ कोटी रुपये, दाखविण्यात आले आहे. अशाप्रकारे एकूण उत्पन्न ३९,०३८.८३ कोटी रुपये तर एकूण खर्च ३९,०२७.३२ कोटी रुपये दाखविण्यात आले असून शिल्लक वर्ताळा ११.५१ कोटी रुपये दाखविण्यात आला आहे.

करवाढ आणि दरवाढीचे संकेत

मुंबई महापालिकेला आर्थिक मंदीचा फटका बसला असल्याचे मान्य करताना पालिका आयुक्त चहल यांनी, अर्थसंकल्पात उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी विविध उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात हजारो कोटी रुपयांची वाढ होण्यासाठी सेवाशुल्क, नवीन कर, भूभाडे वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. शुल्क सुधारणा करण्यासाठी एक प्राधिकरण नेमण्यात येणार आहे.

तसेच, भांडवली खर्च भागविण्यासाठी नवीन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्यात येणार आहेत म्हणजेच की नवीन कर रचना लागू करण्याची शक्यता आहे.

तसेच, पालिकेने मक्ता तत्वावर दिलेल्या भूभागावरील अनधिकृत बांधकामे दंड रक्कम आकारून नियमित करणे, रिक्त भूभाग मकत्याने देणे, मक्ता नूतनीकरण धोरण, भांडवली मूल्य धोरण आदी बाबींची अंमलबजावणी करून उत्पन्न वाढवण्यात येईल, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

विशेष तरतुदी

रस्ते, वाहतूक , कोस्टल रोड -: ६५११.७० कोटी

घनकचरा व्यवस्थापन – ४०५०.३० कोटी

आरोग्य – ४७२८.५३ कोटी

पर्जन्य जलवाहिन्या – १६९९.१३ कोटी

प्राथमिक शिक्षण – २९४५.७८ कोटी

इतर तरतुदी

सागरी किनारा प्रकल्प – २००० कोटी

गोरेगाव मुलुंड लिंक रोड – १३०० कोटी

विकास नियोजन खाते – २५४६.६० कोटी

मुंबईचे सौंदर्यीकरण – २०० कोटी

कोविड संबंधी माहिती व्यवस्थापन आणि विश्लेषण प्रणाली – ५१.८९ कोटी

सामुदायिक शौचालये – ३२३.२० कोटी

पूरप्रवण क्षेत्राचे निवारण – १५० कोटी

रेल्वेला पुलांसाठी – ९६१.६० कोटी

नद्यांचे पुनरुज्जीवन – ११४९.७४ कोटी

उद्याने – १२६.५३ कोटी

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग) – ४९.६७ कोटी

मुंबई अग्निशमन दल – १९९.४७ कोटी

महापालिका मंडया – १२१.६३ कोटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -