घरमुंबईनातेवाईकानेच मारला पैशांवर डल्ला

नातेवाईकानेच मारला पैशांवर डल्ला

Subscribe

मुलाच्या ह्रदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी उत्तरप्रदेशवरून मुंबईत आलेल्या जोडप्याची त्यांच्याच नातेवाईकाने दीड लाख रुपयांची रक्कम पळवून फसवणूक केल्याची घटना कुर्ला रेल्वे स्थानकात घडली आहे. मोहम्मद राशीद अहमद साह हे उत्तरप्रदेशवरून त्यांच्या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी १५ दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. निवार्‍यासाठी ज्या नातेवाईकांच्या घरी राहायला जागा मिळाली त्याच नातेवाईकाने ते परत जाताना त्यांच्या दीड लाख रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी त्या नातेवाईक आरोपीला अटक केली आहे. अब्दुल शाहबान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मोहम्मद राशीद अहमद साह यांच्या अडीच वर्षांच्या मुलाच्या ह्रदयात बारीक छिद्र असल्याचे निदान झाले होते. चांगले उपचार मिळावेत यासाठी त्यांनी कसेबसे दीड लाख रुपये जमवून १५ दिवसांपुर्वी मुंबई गाठली. मुंबईत राहण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी त्यांच्या मुलुंडमधील मामाच्या मुलीच्या घरी आसरा मिळवला. ८ दिवस ते मुंबईत राहिले आणि उपचाराचे काम संपताच १९ जानेवारी रोजी ते त्यांच्या घरी परतण्यास निघाले. यावेळी त्यांच्या मामाच्या मुलीचा पती अब्दुल शाहबान हा त्यांना कुर्ला टर्मिनस येथे गाडीतून सोडण्यासाठी गेला होता. मुलाच्या उपचारादरम्यान शस्त्रक्रियेची गरज न पडल्याने दीड लाखांपैकी १ लाख ४३ हजार रुपये रक्कम उरली होती. त्यांनी ती रक्कम एका बॅगेत ठेवली होती. मात्र त्यांना सोडायला म्हणून गेलेला त्यांचा नातेवाईक अब्दुल शाहबान याने संधी साधत ते दीड लाख रुपये लंपास केले. मोहम्मद साह त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी यांना त्याने पैशांची बॅग गाडीतच ठेवून एक्स्प्रेस गाडीत जागा मिळवून दिली.

- Advertisement -

गाडीतील बॅग घेवून येतो असे सांगून तो परत गाडीकडे आला आणि आणि काही वेळानंतर त्याने ती बॅग एक्स्प्रेस गाडीत बसलेल्या मोहम्मद यांच्याकडे सोपवली आणि तो निघून गेला. मोहम्मद यांच्या पत्नीला बॅग फाटल्याचे निदर्शनास येताच त्यांनी बॅग उघडून पाहिली मात्र बॅगेत पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी तत्काळ कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेऊन अब्दुल शाहबान याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. कुर्ला रेल्वे पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरी धाड टाकून त्याला अटक केली असून आरोपी अब्दुल शाहबान याला २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून १ लाख ३७ हजार रुपये रोख रक्कम परत मिळवली आहे. कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ए.एम.इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आर.एस.संकपाळ, पोलीस हवालदार खरात आणि पथकाने ही कामगिरी केली .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -