घरमुंबईआरेला धक्का लागू देणार नाही

आरेला धक्का लागू देणार नाही

Subscribe

अश्विनी भिडे यांच्या बदलीची मागणी -आदित्य ठाकरे

मी स्वतः अनेकदा मेट्रोने प्रवास करतो. प्रकल्प म्हणून मेट्रोला विरोध नाही. पण मुंबईकर म्हणून मी मेट्रोच्या आरे येथील कारशेडसाठी विरोध करत आहे. मेट्रोच्या कारशेडसाठी प्रस्तावित आरे कॉलनीतील जागेला थोडाही धक्का लागू देणार नाही असा इशारा आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. तसेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांच्या बदलीची मागणीही त्यांनी यावेळी केली.

‘शिवसेनेचा विकास कामांना कधीच विरोध नाही. शिवसेनेचा मेट्रोला विरोध नसून आरे येथे २६४६ झाडे तोडून जे कारशेड तयार केले जात आहे, त्याला शिवसेनेचा विरोध आहे’, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आरे कॉलनीतील केवळ वृक्ष हा चिंतेचा विषय नाही, तर त्याठिकाणची जैवविविधताही आपल्याला जपायला हवी.अधिकारी मुख्यमंत्र्यांना आरे संदर्भात चुकीची माहिती देत आहेत. आरेमध्ये फक्त उंदीर आहेत, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले जात आहे. मात्र, आरेमध्ये वन्यजीवन आहे’, असे आदित्य ठाकरे म्हणाले. म्हणून अशा अधिकार्‍यांची बदली करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मेट्रो आपल्या सर्वांनाच हवी आहे. मेट्रोसाठी आमचा विरोध नाही. एमएमआरसीएलचे म्हणणे आहे की या जागेवर जर कारशेड झाले नाही तर मेट्रो होणे शक्य नाही. हे कंपनीने शेवटच्या क्षणी का सांगितले ? मग यामध्ये काही घोटाळा आहे का ? असाही सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. वन्यप्राणी आपल्या जागेवर नाहीत तर आपण त्यांच्या जागेवर आहोत. कारशेडबाबत अत्यंत मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे, पण आम्ही यापुढे सहन करणार नाही. आरे कारशेडला एका माणसाचा विरोध असो किंवा एक हजार माणसांचा विरोध असेल तरी सरकारने तो विरोध का आहे? याचा विचार करायला हवा. पण कारशेडला विरोध म्हणजे मेट्रोला विरोध असा त्याचा अर्थ होत नाही. आरेच्या जागे शिवाय आम्ही कुठेही कारशेड करणार नाही, अशी धमकी एमएमआरसी कोर्टाला आणि मुंबईकरांना धमकी देत आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आता मेट्रो – ६ कास्टिंंग यार्ड वडाळ्यात
मेट्रो – ६ प्रकल्पासाठीचे कास्टिंग यार्ड हे सुरूवातीला आरे परिसरात प्रस्तावित होते. मात्र पर्यावरणवाद्यांचा वाढता विरोध पाहता आता त्या जागेसाठीची पर्यायी जागा देखील एमएमआरडीएने शोधली आहे. एमएमआरडीएचे कास्टिंग यार्ड हे वडाळा परिसरातच होणार आहे. जेव्हीएलआर आणि अदाणी इलेक्ट्रिसिटी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू झाले आहे. तसेच आगामी एक वर्षासाठी ही १५०० चौरस मीटरची जागा वापरण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याची आरेच्या जागेचा वापर हा कास्टिंग यार्डसाठी होणार नाही असा खुलासा एमएमआरडीएने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -