घरताज्या घडामोडीदेवनारमधील जनावरांचा बाजार बसला; यंदा प्रतिकात्मक कुर्बानी

देवनारमधील जनावरांचा बाजार बसला; यंदा प्रतिकात्मक कुर्बानी

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवाप्रमाणे बकरी ईदचा सणही साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने करत यावर्षी कुठेही जनावरांचा बाजार न भरवण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे यंदा ऑनलाईन पध्दतीने जनावरांची खरेदी करण्याच्या सूचना सरकारने केल्या आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा देवनार पशुवधगृहामध्ये जनावरांचा मोठा बाजार भरला जाणार नसून तशाप्रकारच्या कोणत्याही सुचना सरकारने न केल्याने जनावरांचा बाजार भरला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईत दरवर्षी देवनार पशुवधगृहात बकरी ईद निमित्त जनावरांचा बाजार भरला जातो. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहनिर्माण विभागाने १७ जुलै रोजी एक परिपत्रक जारी करून सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील, असे जाहीर केले आहे. नागरिकांना जनावरे खरेदी करायची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने किंवा दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करावी, असे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

देवनार पशुवधगृहात दरवर्षी भारताच्या विविध राज्यांमधून दोन ते अडीच लाख बकरे विक्रीसाठी आणले जातात आणि कुर्बानीसाठी मुस्लिम बांधव मोठ मोठ्या रकमेच्या बोली लावून या बकऱ्यांची खरेदी करतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवाप्रमाणे बकरी ईदचा सणही साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. देवनारला भरल्या जाणाऱ्या जनावारांच्या बाजाराला सर्व प्रथम मनसेचे सरचिटणीस राजा चौघुले यांनी आक्षेप घेतला होता. विविध राज्यातून जनावरांना घेवून येणाऱ्या आणि त्याठिकाणी खरेदी करणाऱ्या लोकांमुळे तिथे गर्दी होवून परिणामी कोरेानाचा संसर्ग अधिक पसरण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे अशाप्रकारचा जनावरांचा बाजार न भरवण्याची मागणी त्यांनी पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक योगेश शेट्ये यांना दिले होते. देवनारबरोबरच भायखळा बकरी अड्डा, कुर्ला, मालवणी आदी भागांमध्ये जनावरांचे छोटे बाजार भरवले जातात.

बकरी ईदच्या १२ दिवसांपूर्वी अशाप्रकारचा बाजार भरला जातो. त्यामुळे १ ऑगस्ट रोजी बकरी ईद असल्याने १८ जुलैपासून जनावरे येण्यास सुरुवात होतात. परंतु आता केवळ ८ दिवसच शिल्लक असून यंदा हा बाजार न भरल्याने मुस्लिम बांधवांना कुर्बानीसाठी ऑनलाईनच किंवा टेलिफोनवरून जनावरांची खरेदी करावी लागणार आहे.

- Advertisement -

देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थाप डॉ. योगेश शेट्ये यांनी याबाबत गृहविभागाने परिपत्रक काढल्याने सध्या तरी देवनार पशवधगृहात बाजार भरण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. महापालिकेचे याबाबत वेगळे काही धोरण नाही,असे त्यांनी स्पष्ट केले.

यंदा प्रतिकात्मक कुर्बानी द्या

बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता मुस्लिम बांधवांनी आपल्याच घरी करावी. नागरिकांनी यंदा प्रतिकात्मक कुर्बानी द्यावी,अशाप्रकारचे निर्देश परिपत्रकाद्वारे गृह विभगाने जारी केले आहेत.

लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा धंदा बसला

देशातील विविध राज्यांमधून बकरी ईद निमित्त जनावरांची विक्री करण्यासाठी त्यांना सदृढ बनवतात. जेणेकरून जेवढ्या मोठ्या उंचीचा बकरा असेल तेवढी जास्त किंमत मोजली जाते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा बाजार भरला जाणार नसल्याने अशाप्रकारे जनावरे बाजारात घेवून येणाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. वर्षभर या मुंबईतील बाजारासाठी त्यांनी बकऱ्यांचे पालनपोषण केलेले असते. पण हा बाजार भरला जाणार नसल्याने त्यांना मिळणारे चार पैसेही यंदाच्या बकरी ईदमध्ये मिळणार नाही. विशेष महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांबरोबरच गुजरात, कन्याकुमार, काश्मीर आदी भागांमधूनही याठिकाणी बकरे विक्रीला आणले जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -