घरताज्या घडामोडीकेंद्रीय अर्थमंत्रीपदाबद्दल देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा!

केंद्रीय अर्थमंत्रीपदाबद्दल देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा!

Subscribe

एकीकडे राज्यात नव्यानेच स्थापन झालेल्या महाविकासआघाडीच्या सरकारच्या प्रत्येक कामगिरीचं जनता, राजकीय विश्लेषक भिंग लावून परीक्षण करत असताना दुसरीकडे विरोधी पक्ष सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेच्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम मुंबईच्या वांद्रेमध्ये पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर परखड टीका केली. तसेच, आपल्या दिल्लीला जाण्याच्या चर्चांवर देखील फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. ‘मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो. मी मैदान सोडून पळून जाणाऱ्यातला नाही. महाराष्ट्रात जोपर्यंत भाजपचं सरकार पुन्हा येणार नाही, तोपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सोडणार नाही. भाजपचं सरकार राज्यात आणल्याशिवाय मी राहणार नाही. जनतेनं आपल्याला जागा दिल्या. पण यांनी राजकीय गणितं बिघडवून, राजकीय हाराकिरी करून सत्ता स्थापन केली. हाराकिरीने काही काळ काढता येतो’, असं देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

आमच्या कार्यकर्त्याला त्रास दिलात तर खबरदार…!

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना महाविकासआघाडीवर खरपूस शब्दांमध्ये टीका केली. ‘कर्जमाफी नेमकी कुणाला मिळणार आहे, हे काही दिसत नाही. सरकारने आल्याबरोबर विश्वासघाताची मालिका सुरू केली. २५ हजार रुपये दिले नाहीत, कर्जमुक्तीसाठी इतक्या अटी टाकल्या, त्या पूर्ण करता करता नाकी नऊ येणार आहेत. परभणीत एका गावातले फक्त १८ लोकं कर्जमाफीत बसतात. कोल्हापूर जिल्ह्यात फक्त ४८ हजार लोकं कर्जमाफीत बसतात. सरकारने गेल्या ३ महिन्यांत चालू कामांना स्थगिती देण्याचं काम प्रामाणिकपणे केलं. हे प्रगती सरकार नसून स्थगिती सरकार आहे. आम्ही सत्तेत आलो, तेव्हा गेल्या सरकारच्या कामांना स्थगिती दिलेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोकं देखील आमच्याकडे आले, तेव्हा त्यांना चांगली वागणूक मिळाली. आमच्या कार्यकर्त्याला त्रास दिलात तर खबरदार, रस्त्यावर उतरून संघर्ष करू. सत्तेचा माज इतक्यात डोक्यात जाऊ देऊ नका. नाहीतर त्याला खाली आणण्याचं काम आम्ही आणि जनता करेल’, असं ते म्हणाले.

- Advertisement -

‘हे तर ऑटोरिक्षा सरकार’

‘तीन पक्षांचं सरकार तयार झालं आहे. हे ऑटोरिक्षा सरकार आहे, तीन चाकांचं सरकार आहे. ऑटो तरी किमान एका दिशेने जाते, यांचं तीन पक्षांचं सरकार तीन दिशांनी चालत आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही. हे पडेल त्याकडे नजरा लावून आपण बसलेलो नाहीत. पण भविष्यात जेव्हा संधी मिळेल, तेव्हा आत्ता जे काही राहून गेलं आहे, त्याची भरपाई करण्याचा आपण प्रयत्न करू’, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -