घरमुंबईपालक व मुलांमधील संवाद महत्त्वाचा

पालक व मुलांमधील संवाद महत्त्वाचा

Subscribe

अकरावी प्रवेशाला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज भरले असून, दुसर्‍या टप्प्यातील अर्ज भरताना कोणत्या शाखेसाठी अर्ज भरायचा याबाबत संभ्रमात आहेत. काही विद्यार्थ्यांनी पालक किंवा मित्रमैत्रिणींच्या दबावाखाली येऊन शाखा निवडत आहेत. पण विद्यार्थ्यांना शाखा निवडता पालकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यास त्यांच्या मनातील शंका दूर होऊन त्यांना शाखा निवडण्यास मदत होईल, असा सल्ला विद्याविहार येथील एस. के. सोमय्या कॉलेजच्या प्राचार्य डॉ. मनाली लोंढे यांनी दिला.

विद्यार्थ्यांच्या करियरमध्ये संवादाची भूमिका किती महत्त्वाची आहे?
डॉ. लोंढे – विद्यार्थ्यांनी करियर निवडण्याची सुरुवात अकरावीपासून करण्याऐवजी ती आठवी व नववीपासून करण्यात यावी. आपल्याकडे अ‍ॅप्टिट्यूड टेस्टसारखी अद्ययावत साधने आहेत. पण मुलांशी संवाद साधणे फार महत्त्वाचे आहे. संवादातून खूप गोष्टी उलगडतात. त्याचा कल स्पष्ट होण्यास मदत होते. संवादामुळे विद्यार्थ्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. तसेच आपले आईवडील आपल्यासोबत आहेत ही भावना निर्माण होते. एवढे गुण मिळाले पाहिजेत किंवा आपल्या व्यवसायातच मुलांनी यायला पाहिजे असा कोणताही दबाव पालकांनी मुलांवर आणता कामा नये. याऐवजी त्याचा कल कशाकडे हे जाणून घेण्यासाठी संवाद महत्त्वाचे आहे. त्यानंतर त्याचा कल ज्यामध्ये आहे त्यामध्ये विद्यार्थ्याला प्रोत्साहन देणे हे पालकांचे कर्तव्य आहे.

- Advertisement -

करियरबाबत सध्या विद्यार्थी फार सजग असतात. त्याबाबत काय सांगाल
डॉ. लोंढे – सध्या विद्यार्थ्यांचा कल आर्ट्स शाखेकडे आहे. सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांपेक्षा विद्यार्थ्यांचा कल आर्ट्सकडे आहे. टीव्ही, सोशल मिडीया, कम्प्युटर यातून त्यांना बरीच माहिती मिळते. त्यातच मित्रपरिवारातील चर्चांमधून त्यांना फारच कमी वयात दिशा ठरवण्यासाठी मदत होते. त्यामुळे मुलांना काय करायचे हे पक्के माहिती होते. अनेक विद्यार्थी भविष्यात किती संधी आहे. त्यांच्यात नोकरीच्या संधी आहे का याचा विचार विद्यार्थ्यांकडून होताना सध्या दिसत आहे. यूपीएससी, आयपीएससी परीक्षांबाबत मुले खूप गंभीरपणे विचार करतात. त्यातूनच अनेक विद्यार्थी 90 टक्क्यांनतरही आर्ट्सकडे वळताना दिसत आहेत. अकरावीमध्ये आर्ट्स घेतल्याने स्पर्धा परीक्षा आहेतच तसेच मुंबई विद्यापीठातील सेल्फ फायनान्सच्या अभ्यासक्रमासाठी फारशा कोणत्याही अटी नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बीएमएम, बीएमएस, मॅनेजमेंटसारखे अभ्यासक्रम करण्याची मुभा आहे.

मित्रांच्या मदतीने निर्णय घेण्याबाबत विद्यार्थ्यांना कसे रोखता येईल
डॉ. लोंढे – पालकांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याबरोबरच त्यांच्या मित्रांशी चर्चा करावी. पाल्यांच्या मित्रांना वाढदिवसाला घरी बोलवण्याऐवजी त्यांना अधूनमधून घरी बोलवावे. त्यांच्याशी चर्चा करावी, मुलांच्या मित्रांची माहिती ठेवावी, जेणेकरून त्यांचा मित्रपरिवार कोण आहे हे समजू शकते. मित्र जातात म्हणून आपण त्या क्षेत्रात जाणे थांबावे यासाठी पालकांनी मुलांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत याची माहिती घेण्याबरोबरच त्यांच्याशी संवाद साधावा. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सोशल मिडीयापासून दूर ठेवावे. कारण सोशल मिडियामुळे माणूस जवळ येत असला तरी मुले एकलकोंडी होत आहेत. त्यांनी टाकलेल्या पोस्टला किती लाईक, कमेंटस आहेत याकडेच त्यांचे लक्ष अधिक असते. सोशल मिडियामुळे रोजच्या धकाधकीच्या जीवनात विसावा मिळतो असे म्हटले जात असले तरी सोशल मिडीयाऐवजी आपली आवड जोपसणे व ती पूर्ण करण्याकडे लक्ष दिल्यास योग्य ठरेल व आपल्या आयुष्याला दिशा देण्यास मदत मिळेल.

- Advertisement -

कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार्‍या स्वातंत्र्याबाबत काय सांगाल
डॉ. लोंढे – शाळेपेक्षा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना अधिक स्वातंत्र्य असते. पण स्वातंत्र्याबरोबरच जबाबदारी येत असते. कॉलेजमध्ये सेल्फस्टडीवर अधिक भर दिला जातो. विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये रोज हजेरी लावली, अभ्यासासाठी अभ्यासक्रमांच्या पुस्तकाबरोबरच अन्य पुस्तके वाचण्यावर भर दिला. वाचन, चिंतन व मनन करणे आवश्यक आहे. यावर विद्यार्थ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी मेहनत घेतल्यास त्यांनी हवे असलेला उद्दिष्ट्य साध्य करता येते. कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेतलात तरी सर्वांची परीक्षा एकच असते. त्यामुळे तुमच्या अभ्यासावर सर्व ठरते. त्यामुळे कॉलेजबरोबर मुलाचे योगदान महत्त्वाचे असते. हा एकत्रित परिणाम आहे.

– डॉ. मनाली लोंढे, प्राचार्य, एस. के. सोमय्या कॉलेज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -