घरमुंबईडॉ. अश्विनी जोशींना ठाकरे सरकार का घाबरतंय? १३ दिवसांत तीनवेळा बदली!

डॉ. अश्विनी जोशींना ठाकरे सरकार का घाबरतंय? १३ दिवसांत तीनवेळा बदली!

Subscribe

डॅशिंग, अतिशय कडक शिस्तीच्या आणि धडाकेबाज निर्णयासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सनदी अधिकारी डॉ अश्विनी जोशी यांची बुधवारी रात्री पुन्हा एकदा ठाकरे सरकारकडून बदली करण्यात आली आहे. मागील तेरा दिवसात यांची तिसरी बदली असून डॉ जोशी यांना नागपुरला पाठवण्यात मुख्यमंत्री कार्यालय यशस्वी झाल्याचे समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन एक वर्ष झाले आणि या वर्षभरात डॉ जोशी यांच्या चार बदल्या झाल्या. काही महिने त्यांना पोस्टिंगही देण्यात आलेली नव्हती हे विशेष.

बुधवारी रात्री उशिरा विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, नागपूर येथे त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ अश्विनी जोशी यांची कार्यपद्धती ही ठाकरे सरकारला कोंडीत आणणारी ठरेल याचा धसका मुख्यमंत्री कार्यालयाने घेतल्याचे यावरून दिसते. मुळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू अधिकारी असल्याचा डॉ अश्विनी जोशी यांना फटका बसत असल्याचे मंत्रालयात बोलले जात आहे. मात्र फडणवीस यांच्या विश्वासू असलेले माजी मुख्य सचिव आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, भूषण गगराणी, मनोज सौनिक,
एस व्ही आर श्रीनिवासन असे डझनभर अधिकारी आजही ठाकरे सरकारचे विश्वासू अधिकारी आहेत, याकडे एका अतिरिक्त मुख्य सचिवाने लक्ष वेधले. जोशी यांच्या कार्यपद्धतीवर तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आणि मुख्य सचिव अजोय मेहता हे नाराज होते आणि त्याचाच फटका अजुनही जोशी यांना बसत असल्याचे तो अधिकारी म्हणाला. मात्र केवळ तेरा दिवसात तीन बदल्या यावरूनच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे सामान्य प्रशासन विभागावर नियंत्रण नसल्याचेही त्यांनी अधोरेखीत केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वास अधिकारी असलेल्या मनिषा पाटणकर म्हैसकर, मिलिंद म्हैसकर, प्रवीण दराडे, पल्लवी दराडे, मनुकुमार श्रीवास्तव आणि डॉ अश्विनी जोशी यांना महत्वाच्या पदावर न ठेवता साईड पोस्टिंगच्या पदावर नेमणुका केल्या हे यावरून दिसते.

- Advertisement -

भारतीय सनदी सेवेतील २००६ च्या बॅचच्या अधिकारी असलेल्या डॉ अश्विनी जोशी यांचा महाविकास आघाडी सरकारने एकुणच धसका घेतल्याचेच चित्र त्यांच्या होणाऱ्या बदल्यामुळे दिसून येत आहे. मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी असल्यापासूनच त्यांनी सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या नापसंतीच्या अधिकारी म्हणून चर्चेला आल्या. मुंबई महापालिकेतील आरोग्य विभाग, नगरअभियंता, घनकचरा व्यवस्थापन अशा महत्वाच्या खात्यांचा कारभार त्यांच्याकडे होता. पण महापालिकेत सायन रूग्णालयाची पुर्नविकासाची रखडवलेली फाइल, महालक्ष्मी येथील कचरा प्रकल्पातील वाहतुकीची रद्द केलेली निविदा, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत केलेली इंजिनिअर भरती, या भरतीला मुदतवाढीस दिलेला नकार यामुळे त्या सर्वपक्षीय नगरसेवकांच्या नापसंतीच्या झाल्या होत्या. डॉ अश्विनी जोशी मनमर्जीने कारभार करतात म्हणूनच त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणण्याचीही तयारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सुरू केली होती. त्यांच्या बेधडक वर्कींग स्टाईलमुळे त्यांचे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याशी ट्युनिंग जमत नाही अशीही चर्चा एकायला मिळाली होती. पण त्याचवेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच त्यांची उचलबांगडी ही शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानात करण्यात आली. त्यानंतर आणखी एकदा त्यांची बदली करत महाराष्ट्र पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी त्यांना ऑक्टोबर महिन्यात देण्यात आली. ही बदली होऊन त्या पदाचा चार्ज घेताच तोच पुन्हा एकदा त्यांची बदली ही राज्य महिला आयोगात सदस्य सचिवपदी करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांची बदली ही विदर्भ वैधानिक विकास मंडळावर करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकापदी अतिरिक्त आयुक्तपदी त्यांना नेमणुक मिळण्याआधी त्यांच्याकडे फडणवीस यांच्या सरकारच्या राज्य उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून जबाबदारी होती. पण त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीवर भाजपमधील मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याने त्यांची बदली मुंबई जिल्हा एड्स कंट्रोल सोसायटीवर प्रकल्प अधिकारी म्हणून करण्यात आली होती. पण या पदाचा चार्ज त्यांनी स्विकारली नाही. म्हणून त्यांची बदली मुंबई महापालिकेत करण्यात आली होती. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करताना त्यांचे पद डाऊनग्रेडेड करण्यात आले होते. त्याआधी राज्य उत्पादन शुल्क आयुक्तपदाची जबाबदारी मिळण्याआधी त्यांची बदली ही मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली होती.

- Advertisement -

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्याकडे मे २०१६ ते एप्रिल २०१७ या कालावधीत वर्षभर जिल्हाधिकारी आणि उपसचिव म्हणून जबाबदारी होती. त्याआधी ठाणे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी नोव्हेंबर २०१४ ते एप्रिल २०१६ या कालावधीत जबाबदारी सांभाळली. तर ठाणे जिल्हाधिकारी होण्याआधी त्यांच्याकडे २०११ ते २०१४ या कालावधीत मुंबई शिधा नियंत्रक पदाची जबाबदारी होती.

फडणवीस यांच्या सरकार पाठोपाठच महाविकास आघाडीतही त्यांच्या बदल्याचे सत्र सातत्याने सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार त्यांना इतक का घाबरतय ज्यामुळे एकाच वर्षात त्यांची चारवेळा बदली झाली ? अशी चर्चा यानिमित्ताने आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे. त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीमुळेच सत्ताधाऱ्यांना त्या इतक्या अडचणीच्या झाल्या का ? त्यांच्या कामाच्या पद्धतीने कंटाळूनच सत्ताधाऱ्यांसाठी त्या अडचणीच्या ठरत असल्यानेच त्यांची इतक्यांदा बदली होत असल्याचे बोलले जात आहे. एका महिला अधिकाऱ्याच्या बाबतीत ही बाब घडत असल्याने इतर महिला सनदी अधिकाऱ्यांनीही राज्य सरकारच्या अशा कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे डॉ अश्विनी जोशी यांच्या बदल्यांचे सत्र सुरू ठेवणारा ठाकरे सरकारमधील झारीतला शुक्राचार्य कोण असा सवाल यानिमित्ताने आता विचारण्यात येत आहे.

आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या या साधारणपणे सामान्य प्रशासन विभागाकडून केल्या जातात. या खात्याचे मंत्री स्वतः उद्धव ठाकरे आहेत. मात्र असे असतानाही मागील वर्षभरात सनदी अधिकाऱ्यांच्या अंदाधुंद पद्धतीने बदल्या करण्यात आल्या. त्या बदल्यांबाबत काही प्रमाणात मुख्यमंत्री कार्यालयही अनभिज्ञ असल्याचे समजते. त्यामुळे सीएम उद्धव ठाकरेंपेक्षा सुपर सीएम सरकारमध्ये कोण आहे अशी चर्चा आता सनदी अधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -