घरमुंबईटाटा मिल कंपाऊंड की गटाराच्या पाण्याचे तळे!

टाटा मिल कंपाऊंड की गटाराच्या पाण्याचे तळे!

Subscribe

दोन दिवसापासून पडलेल्या पाऊसामुळे टाटा मिल कंपाऊंडमधील रहिवाशांच्या घरात सांडपाणी शिरल्याने येथील रहिवासी हैराण झाले होते.

घरामध्ये गुडघाभर साचलेले पाणी आणि त्यामध्ये हतबल होऊन बसलेल्या आजीबाई, ही परिस्थिती मंगळवारी मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे परळच्या टाटा मिल कंपाऊंडमधील रहिवाशांची बनली. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे येथील रहिवाशांवर अशी बिकट परिस्थिती राहण्याची वेळ आली होती.

पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने येथील नागरिकांना पाण्यामध्ये रहावे लागले होते. पावसाच्या संततधारेमुळे तळघरात राहणार्‍यांच्या घरामध्ये पाणी साचत असून बाजूने वाहणारे नाले, गटाराचे पाणीही त्यांच्या घरामध्ये शिरत आहे. या घाण पाण्यासोबतच त्यातील कचरा, झुरळ, सांडपाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरल्याने येथील रहिवासी पुरते हैराण झाले आहेत.

- Advertisement -

नित्याचे बनले रडगाणे

परळ स्टेशनला लागूनच ११६ वर्षे जुनी टाटा मिल कंपाऊंडची चाळ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या चाळीत गिरणी कामगार त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. मात्र ही चाळ सखल भागात असल्यामुळे येथील रहिवाशांना दरवर्षी पावसाळ्यात त्रासाचा सामना करावा लागत आहे. तब्बल १५३ घरे असलेल्या या चाळीत १२०० हून अधिक लोक राहतात. त्यामध्ये १०० हून जास्त वयोवृद्ध रहिवासी राहतात. मात्र तरीही या चाळीचा विकास करण्याची तसदी ना येथील स्थानिक आमदारांनी घेतली ना प्रशासनाने.

लोकप्रतिनिधींची पोकळ आश्वासने

या परिसरातील लोकप्रतिनिधी केवळ निवडणुका जवळ आल्या की, येथील रहिवाशांना तुमच्या चाळीचा विकास करू, असे आश्वासने देतात. मात्र निवडणुका संपल्या की पुन्हा परिस्थिती जैसे थे असल्याची प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली. त्यामुळे या रहिवाशांचा प्रश्न नेमका कधी सुटणार, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -