घरमुंबईपगार न मिळाल्यामुळे ड्रायव्हर वैतागला, उभ्या जागी ५ लक्झरी बसेस पेटवून दिल्या!

पगार न मिळाल्यामुळे ड्रायव्हर वैतागला, उभ्या जागी ५ लक्झरी बसेस पेटवून दिल्या!

Subscribe

कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचा पगार ही सगळ्यात महत्त्वाची बाब असते. त्याच पगारासाठी तो दिवसरात्र मेहनत करायला तयार असतो. पण जेव्हा हाच पगार देण्यात मालक वर्गाकडून दिरंगाई केली जाते, तेव्हा मात्र कर्मचारी वर्गाचा राग अनावर होतो. पण तो किती भयंकर असू शकतो, याचा प्रत्यय नुकताच बोरीवलीतल्या एका लक्झरी कंपनीच्या मालकाला आला. एका ड्रायव्हरला पगार न मिळाल्यामुळे त्यानं कंपनीच्या ५ लक्झरी बसेस उभ्या जागी जाळून टाकल्याचा प्रकार बोरीवलीमध्ये समोर आला आहे. सुरुवातीला ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, जेव्हा पोलिसांनी खोलात जाऊन चौकशी केली, तेव्हा या ड्रायव्हर महाशयांच्या क्रोधाग्नीमध्येच त्या ५ बसेस जळून खाक झाल्याचं समोर आलं.

सखोल तपास केला आणि…

बोरीवलीमध्ये ५ लक्झरी बसेस जळून खाक झाल्याची घटना घडली होती. प्रथमदर्शनी इतर कोणतं कारण दिसत नसल्यामुळे आग शॉर्ट सर्किटमुळेच लागली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. मात्र, बसेसमध्ये शॉर्टसर्किट होण्यासारखी परिस्थिती नव्हती, हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात दगाफटका झाल्याच्या दिशेने तपास सुरू केला. त्यासाठी बसचालक अजय रामपाल याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. अजयची सखोल चौकशी केल्यानंतर पोलिसांना खरा प्रकार लक्षात आला.

- Advertisement -

नेमकं झालं काय?

अजयने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याचा पगार मालकाने थकवला होता. त्यामुळे मालकावर त्याचा रोष होता. पगाराची वारंवार मागणी करून देखील पगार न मिळाल्यामुळे अजय अस्वस्थ झाला होता. हाच संताप अनावर झाल्यामुळे रागाच्या भरात आपण त्या पाचही बसेस पेटवल्याचं अजयने पोलिसांना सांगितलं. या पाचही बसेसची किंमत साधारण ३ कोटींच्या घरात असून त्यांचा विमा देखील काढण्यात आलेला नाही. त्यामुळे या प्रकारात लक्झरी बस कंपनीच्या मालकाला चांगलाच भुर्दंड बसला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -