घरमुंबईस्काऊट गाईड, एनसीसी, खेळाडूंना वाढीव गुणांची सवलत

स्काऊट गाईड, एनसीसी, खेळाडूंना वाढीव गुणांची सवलत

Subscribe

इयत्ता १०वी, १२वीमध्ये १० गुण मिळणार

दहावी, बारावीच्या परीक्षेला बसणारे खेळाडू, स्काऊट गाईड आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) विद्यार्थ्यांना मार्च 2019 मध्ये होणार्‍या परीक्षेपासून वाढीव गुण मिळणार आहेत. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणार्‍या खेळाडूंना तसेच एनसीसी व स्काऊट-गाईड शिबिरांमध्ये प्रतिनिधीत्व करणार्‍या किंवा प्राविण्य संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांना सवलतीचे 10 ते 20 गुण देण्यात येणार आहे.

स्काऊट गाईड, एनसीसीसोबतच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची कार्यपद्धती बुधवारी शिक्षण विभागाने जाहीर केली. यामध्ये 14 ते 16 वयोगटातील म्हणजेच सहावीपासून पुढे जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत तसेच स्काऊड गाईड आणि एनसीसीमध्ये चमकलेल्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार आहे. संबंधित प्रमाणपत्रावर विद्यार्थी कोणत्या इयत्तेत असताना कोणत्या क्रीडा प्रकारात अथवा संचलनात सहभागी झाला आहे त्याचा उल्लेख असणे महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

दहावी व बारावीमध्ये शिकत असलेला खेळाडू विद्यार्थी हा एकापेक्षा अधिक खेळात, एनसीसी तसेच स्काऊट गाईडच्या शिबिरात सहभागी झाला असेल तर त्याला सर्वात्तम असलेल्या एकाच प्रकाराचे गुण मिळणार आहेत. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू, एनसीसी, स्काऊट, गाईड व राष्ट्रपती पदक विजेत्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव 5 एप्रिलपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांकडे सादर करायचे आहेत. या अर्जांची छाननी करून शिक्षणाधिकार्‍यांनी ते 30 एप्रिलपर्यंत विभागीय मंडळाकडे शिफारशींसह पाठवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. सरकारने निश्चित केलेल्या 11 खेळ प्रकारांसाठीच हे वाढीव गुण मिळणार आहेत. मात्र क्लबकडून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणार्‍या विद्यार्थ्याला हे गुण मिळणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

स्काऊट गाईड, एनसीसीला मिळणारी वाढीव गुणांची सवलत
एनसीसी – प्रजासत्ताक दिन संचलन राष्ट्रीय स्तर – 10 गुण
प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय शिबीर, स्पर्धा पदक विजेते – 15 गुण
आंतरराष्ट्रीय युथ एक्सचेंज कार्यक्रम सहभाग – 20 गुण
स्काऊट गाईड – राष्ट्रपती पदक अथवा आंतरराष्ट्रीय जांबोरी शिबीर सहभाग – 10 गुण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -