ईडीकडून वर्षा राऊत यांची एक दिवस आधीच चौकशी

साडेतीन तास कार्यालयात, राऊतांना माहीत नाही

चौकशीनंतर ईडी कार्यालयातून बाहेर पडताना वर्षा राऊत.

पंजाब, महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यातील लाभार्थी प्रवीण राऊत यांच्या पत्नीकडून १० वर्षांपूर्वी घेतलेल्या कर्जप्रकरणी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची साडेतीन तास चौकशी केली. सोमवारी दुपारनंतर त्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात पोहचल्या आणि चौकशीनंतर सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान त्यांना सोडण्यात आले. ५ जानेवारी म्हणजे मंगळवारी वर्षा राऊत यांची मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशी होणार होती. मात्र, सोमवारीच एक दिवस आधीच वर्षा राऊत या स्वत:हून ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. वर्षा राऊत ईडी कार्यालयात गेल्यात हे आपल्या माध्यमांतून समजले आहे. त्या गेल्या असतील आल्यावरती पाहू, नोटीस मला आलेली नाही. आता मी घरी गेल्यावर पाहतो, असे राऊत म्हणाले.

संजय राऊतांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय तपास यंत्रणा आहे. कार्य पद्धतीविषयी काही विषयांवर मतभेद असले तरी सरकारी कागद येतो तेव्हा त्याचा सन्मान राखला पाहिजे, या मताचे आम्ही सगळे आहोत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

वर्षा राऊतांकडे लपवण्यासारखे काही नसल्याने कोणत्या गोष्टीचा तपास कोणाला करायचा असल्यास त्यांनी जरूर करावा. एकदा तपास पूर्ण होऊ द्या, मग पाहू, असेही संजय राऊत म्हणालेत. तपास सुरू असताना ताकद दाखवण्याची गरज नाही. ताकद आमची आहेच. हे सगळे का आणि कोण करत आहे, याचीही माहिती जनतेला आहे. माझ्यासाठी गंभीर गोष्ट नाहीये, त्या समर्थ आहेत, त्या वर्षा संजय राऊत आहेत, असेही संजय राऊत यांनी अधोरेखित केले आहे.

वर्षा राऊत यांना ईडी नोटीस
पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर वर्षा राऊत यांनी 5 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. वर्षा राऊत यांना पीएमसी बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रे घेऊन कार्यालयात येण्यास सांगितले आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. मात्र, त्यांची जामिनावर सुटका झाली.