घरमुंबईनालासोपार्‍यात साडेनऊ लाखांची वीज चोरी

नालासोपार्‍यात साडेनऊ लाखांची वीज चोरी

Subscribe

महावितरणच्या भरारी पथकाची कारवाई

वसई-विरार महापालिका हद्दीतील नालासोपारा आचोळे येथे एकाच घरात साडेनऊ लाख रुपयांची वीज चोरी आढळून आली आहे. पालघर येथील महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकून ही वीजचोरी उघडकीस आणली असून संबंधित वीज ग्राहक सुदाम रामचंद्र पाटील यांना चोरीच्या विजेचे देयक भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

महावितरणच्या पालघर भरारी पथकाने आचोळे गाव परिसरातील चिमघर येथे सुदाम रामचंद्र पाटील यांच्या घरातील मीटरची तपासणी केली. वीज खांबावरून आलेली केबल वीज मीटरमधून जोडण्याऐवजी 4 कोअर केबलचा वापर करून घरात विजेचा परस्पर वापर सुरु असल्याचे निदर्शनास आले. टॅपिंगच्या माध्यमातून पाटील यांनी 42 हजार 812 युनिट वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदर कारवाई सुरु असताना पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी भरारी पथकातील कर्मचारी व अधिकार्‍यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. परंतु भरारी पथकाने पोलिसांची मदत घेऊन उर्वरित कार्यवाही पूर्ण केली.

- Advertisement -

चोरीच्या विजेचे साडेनऊ लाख रुपयांचे बिल भरण्याची नोटीस पाटील यांना बजावण्यात आली असून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया महावितरणकडून सुरु आहे. महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक दत्तात्रय शिंदे (भापोसे) व उपकार्यकारी संचालक सुमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय सिंह, सहायक अभियंता कुणाल पिंपळे, सहायक दक्षता अधिकारी प्रशांत भोये, विशाखा राजूरकर, कर्मचारी महेश कातखेडे यांनी ही कारवाई केली. वीज कायदा-2003 च्या कलम 135 अन्वये वीज चोरी हा अजामीनपात्र गुन्हा असून तीन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे विजेचा चोरटा किंवा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -