घरमुंबईआरटीई प्रवेश प्रक्रियेत पालकांना दिलासा

आरटीई प्रवेश प्रक्रियेत पालकांना दिलासा

Subscribe

यंदा एकच सोडत तर चार प्रतिक्षा यादी होणार प्रसिद्ध

गतवर्षी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) अंतर्गत चालणारी प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत सुरू होती. त्यामुळे शिक्षण विभागाला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर आरटीईची प्रवेश वेळेत पूर्ण व्हावी यासाठी यंदा प्रवेशाची केवळ एक सोडत व चार प्रतीक्षा यादी जाहीर करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रवेश मिळणार की नाही यासाठी पालकांना लागलेली चिंता दूर होण्यास मदत होऊन त्यांना दिलासा मिळणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी 11 फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.

दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येते. प्रवेशाच्या तीन फेर्‍या झाल्यानंतर विशेष फेरीही राबविण्यात येते. ही प्रक्रिया वेळखाऊ असून, सहामाही परीक्षा येईपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा प्रवेश मिळेल की नाही या भितीपोटी पालक अन्य शाळांमध्ये जादा पैसे भरून प्रवेश घेतात. त्यामुळे पालकांना दिलासा देण्यासाठी व प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी यंदा प्रवेशाची केवळ एकदाच सोडत काढण्यात येणार आहे. तसेच शाळेतील उपलब्ध जागांएवढी प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे. सोडतीमधील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर शिल्लक राहिलेल्या जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मेसेजद्वारे कळवण्यात येईल. अशा पद्धतीने आरटीई प्रवेश पात्र शाळांची प्रवेश क्षमता पूर्ण होईपर्यंत दुसर्‍या, तिसर्‍या व चौथ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मेसेज पाठवण्यात येतील.

- Advertisement -

प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 2020-21 या प्रवेश प्रक्रियेबाबत राज्यभरातील शिक्षणाधिकारी आणि गट शिक्षण अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे आरटीई प्रवेश पात्र शाळांनी इयत्ता पहिलीचा डेटा सरल पोर्टलवर अपडेट करावा. यंदा प्रवेशासाठी नव्याने समावेश करावयाच्या शाळांची नोंदणी पोर्टलवर करून घेण्यात यावी. विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासणीसाठी पडताळणी समिती गठीत करावी, अशा सुचना दिल्या आहेत.

संभाव्य वेळापत्रक
•पालकांनी ऑनलाईन अर्ज भरणे – 11 ते 19 फेब्रुवारी
•सोडत – 11 मार्च
• प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कागदपत्रांची पडताळणी – 16 मार्च ते 3 एप्रिल
• प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे टप्पा 1 – 13 ते 18 एप्रिल
• प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे टप्पा 2 – 24 ते 29 एप्रिल
• प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे टप्पा 3 – 6 ते 12 मे
• प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे टप्पा 4 – 18 ते 22 मे

- Advertisement -

प्रवेश अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे
निवासी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, जात प्रमाणपत्र पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -