घरमुंबईफेसबुकची मैत्री पडली पावणेचार लाखाला

फेसबुकची मैत्री पडली पावणेचार लाखाला

Subscribe

सायबर गुन्हेगारी रोखणे पोलिसांसमोर आव्हान बनत चालले असून, लोकांमध्ये याविषयी जागरुकता निर्माण करण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेक जण सायबर गुन्हेगारीचे शिकार झाल्याचे समोर येत असतानाच चक्क बँकेत मॅनेजर म्हणून काम करणार्‍या पवईतील एका महिलेला दिल्लीतील एका सायबर गुन्हेगाराने तब्बल पावणे चार लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. डिसेंबर महिन्यात घडलेल्या या गुन्ह्याची उकल करून पोलिसांनी आरोपी भामट्याला दोन महिन्यानंतर दिल्लीतून अटक केली आहे. भुपेन सोहरन सिंग (२०) असे या आरोपीचे नाव आहे.

पवईमध्ये राहणार्‍या अनिता वाघेला या चांदिवली येथील आयसीआय बँकेत मॅनेजर म्हणून काम करतात. ऑक्टोबर २०१८ मध्ये फेसबुकवर त्यांची मॅनसन रॉड्रीग्ज या तरुणाशी ओळख झाली. त्यानंतर दोघांच्यात संपर्क वाढत गेला आणि त्यांच्यात चांगली मैत्री झाली. रॉड्रीग्ज हा मूळचा इटलीचा असून, फिनलँड या देशात वास्तव्याला असल्याची खोटी माहिती त्याने वाघेला यांना दिली होती. दोघांच्यात मैत्री वाढल्यानंतर एक दिवस रॉड्रीग्जने वाघेला यांच्यासाठी शॉपिंग केली असून, त्याने घेतलेले गिप्ट आणि २५०० डॉलर इतकी रक्कम पाठवणार असल्याचे सांगितले. त्यासाठी साहित्य पाठवतो असे सांगून त्याने त्यांचा पूर्ण पत्ता मागवून घेतला आणि त्यानुसार साहित्य पाठवले.

- Advertisement -

मात्र, हे साहित्य विदेशातून पाठवले असल्याने त्यासाठी कस्टम ड्युटी, विदेशी चलन असल्याने त्यासाठी लागणारा चार्ज अशी वेगवेगळी कारणे सांगून एका महिलेने त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने जवळपास ३ लाख ७१ हजार एका खात्यात भरण्यास सांगितले. यादरम्यान, ते पैसे न भरल्यास त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई होण्याची भीती दाखवण्यात आली होती म्हणून घाबरून अनिता वाघेला यांनी पलीकडून सांगतील ती रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केली. यानंतर अनिता वाघेला यांनी पवई पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहितीचा आधार घेत दिल्लीतून हे रॅकेट चालवणार्‍या एका आरोपीला बुधवारी अटक केली.

बारावीपर्यंत शिकला आहे आरोपी
आरोपी भुपेन सोहरन सिंग हा फेसबूकवर सूंंदर दिसणार्‍या तरुणांचे फोटो ठेवून तो आपले सावज हेरत होता. भुपेन सिंग याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून, मुंबईमध्ये त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंद असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस शिपाई जाधव, पोलीस शिपाई पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -