घरमुंबईपाच खाणींचा कोळसा थेट वीजनिर्मिती प्रकल्पात

पाच खाणींचा कोळसा थेट वीजनिर्मिती प्रकल्पात

Subscribe

महानिर्मितीचा राज्यातील पहिलाच प्रयोग

कोळसा खाणींपासून ते वीजनिर्मिती प्रकल्पाच्या संचासाठी उपलब्ध होणार्‍या कोळसा वाहतुकीसाठी महानिर्मिती एक नवा पर्याय शोधू पाहत आहे. कन्व्हेयर बेल्टच्या माध्यमातून हा कोळसा आता महानिर्मितीच्या संचासाठी थेट उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीतून कोळसा वाहतूक केल्याने होणारे प्रदूषण कमी करणे हेदेखील शक्य होणार आहे. शिवाय कोळसा वाहतुकीदरम्यान कोळसा चोरीचे प्रकारही कमी होण्यास मदत होईल. महत्त्वाचे म्हणजे वीजनिर्मिती प्रकल्पासाठी कोळसा उपलब्धतेची हमी मिळणे शक्य होणार आहे.

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या नागपूर नजीकच्या खाणीतून महानिर्मितीच्या कोराडी, खापरखेडा आणि चंद्रपूर या तीन वीज प्रकल्पांसाठी हा कोळसा उपलब्ध होणार आहे. १२०० टन प्रति तास या वेगाने कोळसा खाणीपासून ते वीजनिर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी कोळसा उपलब्ध होणार आहे. एकूण ४२२ कोटी रुपयांचा हा संपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी डब्ल्यूसीएल आणि महानिर्मिती यांच्यात करार झाला आहे. प्रायोगिक तत्वावर या कन्व्हेयर बेल्टच्या प्रकल्पाची सुरुवात करण्याचा महानिर्मितीचा मानस आहे. लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. पाच कोळसा खाणींची कनेक्टिव्हिटी कोराडी आणि खापरखेडा या दोन संचासाठी करण्यासाठी हा कन्व्हेयर बेल्टचा प्रकल्प महत्त्वाचा आहे. इंदार, कांपटी, गोंडेगाव, भाणेगाव आणि शिंगोटी या पाच खाणीतून दोन्ही वीज प्रकल्पांना कोळसा उपलब्ध होणार आहे. अशा पद्धतीची कोळसा कनेव्हिटी करणारी महानिर्मिती ही पहिलीच कंपनी आहे.

- Advertisement -

थेट वाहतुकीचा प्रकल्प काही महिन्यांत पूर्णत्वास

कोळसा खाण ते वीजनिर्मिती प्रकल्प असे एकूण १६.५ किलोमीटरचे अंतर या कन्व्हेअर बेल्टसाठी तयार करण्यात येणार आहे. कन्व्हेअर बेल्ट उभारणीसाठी जागोजागी पिलर्स उभे करण्यासाठी डब्ल्यूसीएल मदत करणार आहे. आतापर्यंत रस्ते वाहतुकीने तसेच रेल्वे वाहतुकीने कोळसा आणताना अनेक अडचणी आणि आव्हानांना महानिर्मितीला सामोरे जावे लागत होते. त्यामध्ये कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे वॅगन्स उपलब्ध नसणे तसेच कोळसा वाहतुकीदरम्यान कोळशाची चोरी होणे यासारखे प्रकार महानिर्मितीला भेडसावत होते. या सगळ्याचा परिणाम हा वीजनिर्मिती क्षमतेवर होत असल्याचे आढळले होते. त्यामुळेच महानिर्मितीने उपाय म्हणून कोळसा वाहतुकीसाठी कन्व्हेयर बेल्टचा पर्याय आणला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये या संपूर्ण प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन कोळसा वाहतूक कन्व्हेयर बेल्टच्या माध्यमातून पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -