घरमुंबईविदेशी  नोकरीचा  भुलभुलैय्या

विदेशी  नोकरीचा  भुलभुलैय्या

Subscribe

‘मॅक्स कन्सल्टन्सी’च्या प्रियांका गडकर यांच्यावर गुन्हा 

नोकरी परवाना (रिक्रुटमेंट लायसन्स) नसताना अवैधरित्या भारतीयांना परदेशात नोकरीसाठी पाठवणार्‍या ‘मॅक्स कन्सल्टन्सी’ या कंपनीच्या मालकीण प्रियांका गडकर यांच्या विरोधात ताडदेव पोलीस ठाण्यात इमिग्रेशन अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. या कंपनीमार्फत नोकरीसाठी परदेशात जाऊन फसवणूक झालेल्यांची संख्या १०० पेक्षा अधिक असून हा आकडा वाढण्याची शक्यता अधिकार्‍यांकडून वर्तवण्यात येत आहे.
दक्षिण मुंबईतील ताडदेव परिसरात ‘मॅक्स कन्सल्टन्सी’ या कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीच्या मालकीण प्रियांका गडकर या असून त्यांनी मागील काही वर्षांत एजंटमार्फत रशिया, अझरबैजान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांमध्ये शेकडो भारतीयांना नोकरीसाठी पाठवले.
मात्र नोकरीसाठी विविध देशांमध्ये गेलेल्या भारतीय नागरिकांना नोकरी मिळाली नाही. त्यांची फसवणूूूक झाली असल्याचे त्यांनी लागलीच त्या त्या देशात असलेल्या भारतीय दूतावासात धाव घेऊन तक्रारी केल्या. प्रत्येक देशातील भारतीय दूतावास कार्यालयाकडून विदेश मंत्रालयात (भारत सरकार) याबाबत ई मेलद्वारे कळवण्यात आले आहे. विदेश मंत्रालय कार्याल-याकडून या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला. ज्या एजंटमार्फत परदेशात नोकरीसाठी पाठवण्यात आले त्या व्हिसा एजंटचे कार्यालय मुंबईतील ताडदेव परीसरात असल्याची माहिती मिळाली.
प्रियांका गडकर यांच्या मॅक्स कन्सल्टन्सी या कंपनीने रिक्रुटमेंट परवाना नसताना एजंटच्या मार्फत रशिया, अझरबैजान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, येथे इमिग्रेशन अ‍ॅक्टचे उल्लंघन केले. तसेच इमिग्रेशन क्लिअरन्स प्राप्त न करता नोकरीकरिता लोकांना एम्प्लायमेंट व्हिसा देऊन परदेशी पाठवित आहेत, अशी माहिती विदेश मंत्रालय विभागाचे अधिकारी वेकंटरामन राघवन यांच्या चौकशीत उघड झाली.
या प्रकरणी राघवन यांनी ताडदेव पोलिसांना ४ ऑगस्ट रोजी पत्रव्यवहार करून तक्रार केली होती. ८ ऑगस्ट रोजी ताडदेव पोलिसांनी राघवन यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची तक्रार दाखल करून मॅक्स कन्सल्टन्सीच्या मालकीण प्रियांका गडकर यांच्याविरुद्ध ताडदेव पोलिसांनी इमिग्रेशन अक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी प्रियांका गडकर यांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांनी दिली. मॅक्स कन्सल्टन्सी या कंपनीचे कार्यालय पूर्वी नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत होते.
काही महिन्यांपूर्वी हे कार्यालय ताडदेव या ठिकाणी हलविण्यात आले असल्याचे सुर्वे यांनी सांगितले. या कंपनीमार्फत परदेशात नोकरीसाठी जाऊन फसवणूक झालेल्यांची संख्या १०० पेक्षा जास्त असून तपासात हा आकडा वाढण्याची शक्यता अधिकार्‍यांनी वर्तवली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -