घरमुंबईफॉरेन्सिक लॅब सहाय्यकांनाही ग्रामीण भागाची सेवा सक्ती

फॉरेन्सिक लॅब सहाय्यकांनाही ग्रामीण भागाची सेवा सक्ती

Subscribe

नियुक्तीदरम्यान अट घालण्याचा विचार

मुंबई:- ग्रामीण भागामध्ये सेवा देण्यास डॉक्टर तयार नसल्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांना ग्रामीण भागामध्ये सेवा देण्याची सरकारकडून सक्ती करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर फॉरेन्सिक लॅबमध्ये नव्याने भरती होणार्‍या कर्मचार्‍यांनाही ग्रामीण भागात सेवा देण्याची सक्ती करण्याचा निर्णय न्यायवैद्यक प्रयोगशाळा प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवण्यात आला आहे.

राज्यात न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिपत्याखाली मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नांदेड व कोल्हापूर या ठिाकणी फॉरेन्सिक लॅब आहेत. लॅबमध्ये तब्बल 1400 जागा मंजूर आहेत. परंतु भरतीसंदर्भात उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणामुळे व अन्य प्रकरणामुळे सध्या राज्यामध्ये फॉरेन्सिक लॅबमध्ये जवळपास 700 कर्मचारीच कार्यरत आहेत. त्यातच मुंबई व पुणे वगळता अन्य ठिकाणी असलेल्या फॉरेन्सिक लॅबमध्ये काम करण्यास फॉरेन्सिक लॅबमधील कर्मचारी तसेच नव्याने नियुक्त होणारे कर्मचारी तयार नसतात. यामुळे मुंबई व पुणे वगळता अन्य भागांमध्ये असलेल्या लॅबमध्ये खासगी कर्मचार्‍यांची नियुक्ती करून कामे करावी लागतात. परिणामी लॅबमधील प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत होती. राज्य सरकारने न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाला 140 पदे भरण्यास दिलेल्या मंजुरीनुसार महापरीक्षा अंतर्गत ही पदे भरण्यात येत आहेत. यामध्ये 80 संशोधक, 10 क्लर्क, 5 टायपिस्ट व 15 प्रयोगशाळा परिचर अशी तृतीय व चतुर्थी श्रेणीतील पदांचा समावेश आहे.

- Advertisement -

भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु उमेदवारांकडून मुंबई व पुण्यातील लॅबची मागणी होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे फॉरेन्सिक लॅबमध्ये नवनियुक्त होणार्‍या कर्मचार्‍यांना ग्रामीण भागामध्ये सेवा सक्ती करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार भरती होणार्‍या कर्मचार्‍यांना प्रथम सेवा औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नांदेड व कोल्हापूर या ठिकाणी द्यावी लागणार आहे. तशी तरतूद त्यांच्या नियुक्ती पत्रामध्ये करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील सेवा सक्तीमुळे औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नांदेड व कोल्हापूर येथील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यास मदत होणार आहे. तसेच येथील कामे पूर्ण करण्यासाठी खासगी कर्मचार्‍यांची करावी लागणारी नियुक्ती टाळता येणार आहे, अशी माहिती मुंबई फॉरेन्सिक लॅबचे प्रभारी संचालक के.व्ही. कुलकर्णी यांनी दिली.

राज्यात विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करण्यासाठी पाठवण्यात येतात. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल न्यायालयामध्ये वैज्ञानिक पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. त्यामुळे गुन्ह्यांची उकळ करण्यामध्ये लॅबची महत्त्वाची भूमिका असते. फॉरेन्सिक लॅबमध्ये बॉम्बस्फोट, खून, बलात्कार, आगीसारख्या दुर्घटना यासारख्या विविध घटनांमधील व्यक्तींचे अवशेष लॅबमध्ये तपासणीसाठी आणण्यात येतात. विश्लेषणासाठी येणार्‍या अवशेषांसाठी लॅबमध्ये जीवशास्त्र, डीएनएन तपासणी, सायबर फॉरेन्सिक असे विविध विभाग असतात.

- Advertisement -

ग्रामीण भागामध्ये सेवा सक्ती करण्यासंदर्भातील प्रस्ताव आम्ही तयार केला आहे. हा प्रस्ताव अप्पर पोलीस महासंचालक हेमंत नागराळे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला अप्पर महासंचालकांनी मंजूरी दिल्यानंतरच ही भरती करण्यात येणार आहे.
– के.व्ही. कुलकर्णी, प्रभारी संचालक, मुंबई फॉरेन्सिक लॅब

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -