घरमुंबईडीम्ड कनव्हेन्सच्या नावाखाली रहिवाशांची फसवणूक पैसे घेऊन दलाल पसार

डीम्ड कनव्हेन्सच्या नावाखाली रहिवाशांची फसवणूक पैसे घेऊन दलाल पसार

Subscribe

कामोठे वसाहतीमधील 20 ते 25 सोसायट्यांना फटका

कामोठे वसाहतीमधील जवळपास २० ते २५ सोसाट्यांना डीम्ड कनव्हेन्स करण्याचे आमिष दाखवून एका इसमाने लाखो रुपयांना फसवल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. संबंधित व्यक्तीने मी निबंधकांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून डीम्ड कनव्हेन्स करून देतो असे सांगून सोसायटीतील रहिवाशांकडून रक्कम घेतल्याचा आरोप होत आहे.

साडेबारा टक्के भूखंडांवर विकसित करण्यात आलेल्या कामोठा वसाहतीतील अनेक सोसायट्या आजही डिम्ड कनव्हेन्स विनाच आहेत. त्यामुळे संबंधित भूखंड बांधकाम व्यावसायिक किंवा जागा मालकाच्या नावावर असल्याने रहिवाशांना अडचणींना समोरे जावे लागत आहे. मध्यंतरी शासनाने डीम्ड कनव्हेन्स करण्याबाबत आदेश काढले होते. या आदेशाची अंमलबजावणीही कामोठेत होत नाही. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन काही दलाल आपले उखळ पांढरे करून घेत रहिवाशांची फसवणूक करत आहेत.

- Advertisement -

नवीन पनवेल नंतर कामोठे वसाहत विकसित करण्यात आली. विशेषकरून साडेबारा टक्के भूखंडावर हा नोड उभारला आहे. कामोठे वसाहतीला सुरुवातीला रस्ते, पाणी, गटारे, पथदिवे या सारख्या मूलभूत सुविधा मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे येथील रहिवाशांना याकरिता अनेक वर्षे लढा द्यावा लागला. या नोडमधील 80 टक्के सोसायट्यांचे अभिहस्तांतरण झालेले नाही. त्यामुळे इमारतीचा भूखंड हा सोसायटीच्या नावे होत नाही. त्यामुळे या ठिकाणी विकास करण्यासाठी तसेच इतर गोष्टींकरिता अनेक अडचणींना रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी वारंवार सिडको आणि संबंधित यंत्रणांकडे रहिवाशांनी पाठपुरावा केलेला आहे. साडेबारा टक्के तत्वावर असणारे काही भूखंड वादात अडकले आहेत. ज्यांना सिडकोकडून हे भूखंड मिळाले त्यांच्या वारसांमध्ये वाद सुरू आहेत. या व्यतिरिक्त बांधकाम व्यावसायिक, जागा मालक यांच्यातही काही ठिकाणी बिनसले असल्याने कनव्हेन्स डीडला अडचणी येत आहेत.

पोलीस तक्रार घेत नाहीत
कामोठे वसाहतीतील जुई गार्डन आणि अजिंक्यतारा या दोन सोसायट्यांनी संबंधित इसमाला डीम्ड कनव्हेन्ससाठी पैसे दिले आहेत. जुईगार्डनने तर 12 लाख रुपयांचा धनादेश त्याच्या खिशात टाकला आहे, तर अजिंक्यतारा सोसायटीकडून रोख तीन लाख रक्कम माने यांनी लाटली आहे. याकरिता आम्ही सदनिका धारकांकडून 15 हजार रुपये प्रत्येकी वर्गणी काढून पैसे जमा केले आणि सोसायटीने एका खाजगी माणसाच्या घशात ते पैसे घातले. सोसायटीचे संचालक मंडळ याबाबत उत्तरच द्यायला तयार नाही, पोलीस आमची तक्रार घेत नाहीत. आता करायचे काय? असा सवाल येथील रहिवासी मुकूंद शितोळे यांनी उपस्थित केलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -