घरमुंबईतयारी अनंत चतुर्दशीची!

तयारी अनंत चतुर्दशीची!

Subscribe

अनंत चतुदर्शीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व भाविक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येतात. त्यामुळे गिरगाव, दादर, जुहू चौपाटी या महत्त्वाच्या विसर्जनस्थळांबरोबरच पालिकेकडून उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांवर भाविकांची गर्दी होते. गणरायाच्या विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई महापालिका, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस व सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि विविध सामाजिक संस्था व संघटना सज्ज झाल्या आहेत. विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा ‘आपलं महानगर’कडून घेण्यात आलेला आढावा

अकरावा दिवस गणपती विसर्जन
समुद्राची भरती व ओहोटी
गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर २०१९
ओहोटी – पहाटे ४.३८ वाजता, उंची १.०८ मीटर
भरती – सकाळी ११.२० वाजता, उंची ४.०० मीटर
ओहोटी-सायंकाळी १७.२५ वाजता,
उंची १.४७ मीटर
भरती- रात्रौ २३.२५ वाजता,
उंची ३.७० मीटर

पुलांवरील यंदा नाचगाणे बंद

अंधेरीतील पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे व महापालिका यांनी संयुक्तपणे आयआयटीमार्फत रेल्वे पुलांची तपासणी केली. यामध्ये काही पुलांवर अवजड वाहनांचा भार पेलणे शक्य नसल्याचा अहवाल दिला. भायखळा, आर्थर रोड अर्थात चिंचपोकळी, करीरोड तसेच जुहू तारा पुलांचा यामध्ये समावेश आहे. या पुलांवरूनच मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका निघतात, परंतु या पुलांवर १६ टनापेक्षा अधिक वजनाचा भार पेलला जाणे शक्य नसल्याने गणेश मिरवणुकांसाठी हे पूल बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता, परंतु समन्वय समितीने यामध्ये सुवर्ण मध्य काढत मिरवणुकीत गणेशमूर्तींचे वाहन आणि त्यासोबत मंडळाचे निवडक कार्यकर्ते पुलावरून पुढे जातील. मूर्तीची मिरवणूक पूल ओलांडून पुढे गेली की त्या लोकांना पुलांवर प्रवेश दिला जाईल. त्यामुळे याचे नियोजन करताना वाहतूक पोलिसांसह मुंबई पोलिसांची मोठी कसोटी लागणार आहे. अर्थातच बाप्पांच्या मिरवणुकीत पुलावर कोणतेही नाचगाणे किंवा वाद्ये वाजवता येणार नाही.

- Advertisement -

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी  २२ रस्ते पूर्णपणे बंद

गणपती बाप्पांच्या मिरवणुका सुरळीतपणे पार पाडाव्यात. तसेच नागरिकांची मिरवणुकांमध्ये वाहतूक कोंडीत अडकून कोणतीही अडचण होऊ नये म्हणून मुंबई शहरासह उपनगरांतील २२ रस्ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, तर काही मार्गांवरील वाहतूक ही एकमार्गी असणार आहे.

- Advertisement -

विसर्जन स्थळांवर चोख व्यवस्था

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन होत असल्याने महापालिका, पोलीस तसेच वाहतूक पोलीस याशिवाय सार्वजनिक गणेशोत्सव समिती या सर्वांच्या समन्वयाने विसर्जन स्थळांवर विशेष आणि चोख व्यवस्था राखली जाते. या सर्व यंत्रणांना खासगी स्वयंसेवी संस्था आणि संघटनांची मदत लाभली जाते. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध संस्थांचे स्वयंसेवक तसेच जीवरक्षक विसर्जन स्थळांवर तैनात असतात.

मुंबईतील कृत्रिम तलावांची व्यवस्था

शिवडी स्वान मिल मनोरंजन मैदान, प्रतीक्षा नगर अशोक पिसाळ मैदान, प्रभादेवी चवन्नी गल्ली, वरळी जांभोरी मैदान, शिवाजी पार्क क्रीडा भवन, वांद्रे शासकीय वसाहतीत महात्मा गांधी विद्यालय, सांताक्रूझ पश्चिम गजधर पार्क म्युन्सिपल शाळा, सांताक्रूझ पूर्व येथे कलिना गार्डन, अंधेरी पूर्व येथील डॉ. हेडगेवार मैदान, अंधेरी पश्चिम लोखंडवाला मैदान, चंदन सिनेमा, घाटकोपर पश्चिम डॉ. बळीराम हेडगेवार मैदान व बाबू गेनू मैदान, घाटकोपर पूर्व दत्ताजी साळवी मैदान, गोरेगाव पूर्व पांडुरंग वाडी व गणेश घाट, मालाड पूर्व रामलिला मैदान व बुवा साळवी मैदान तसेच एम.डब्ल्यू देसाई मैदान, कांदिवली पूर्व आकृती महापालिका चौकी व ठाकूर व्हिलेज तसेच लोखंडवाला तलाव, दहिसर येथे दहिसर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, दहिसर पूर्व युनिव्हर्सल तलाव व तावडेवाडी, बोरीवली पश्चिम अनंतराव भोसले क्रीडांगण, बोरीवली पूर्व कुलूपवाडी रवीशंकर स्कूल मैदान, सीटीआयआरसी अभिनय नगर व दत्तपाडा महापालिका मैदान, मुलुंड पश्चिम स्वप्ननगरी, मुलुंड पूर्व गव्हाणपाडा.

मेट्रो कामांमुळे मिरवणुकीसाठीच मार्ग खुले

मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात मेट्रो रेल्वेची कामे सुरू आहेत. दक्षिण मुंबईत गिरगाव चौपाटीकडे येणारा विसर्जन मार्ग म्हणजे डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी नवजीवन सोसायटी जंक्शन ते ग्रँट रोड जंक्शनपर्यंतचा मार्ग वाहतुकीस बंद राहणार आहे. या मार्गावरून केवळ विसर्जन मिरवणुकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

•महापालिकेच्या जीवरक्षकांसह ४०० जीवरक्षक
•एनएसएसचे ९०० विद्यार्थी
•एनसीसीचे ४०० विद्यार्थी
•नागरी संरक्षण दलाचे १५०० स्वयंसेवक
•स्काऊट व गाईडचे ३०० विद्यार्थी
•वाहतूक रक्षक १५००
•विविध सामाजिक व अध्यात्मिक संस्था व संघटनांचे स्वयंसेवक

मुंबईतील ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळांसह ३२ कृत्रिम तलावांच्या परिसरात सोयीसुविधा पुरवल्या आहेत. त्यामध्ये स्टील प्लेट, नियंत्रण कक्ष, जीवरक्षक, मोटरबोट, प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका, स्वागत कक्ष, तात्पुरती शौचालये, निर्माल्य कलश, निर्माल्य वाहन, डंपर्स, टेम्पो, फ्लड लाईट, सर्च लाईट, विद्युत व्यवस्था, संरक्षक कठडे, निरीक्षण मनोरे, जर्मन तराफा, मनुष्यबळ-कामगार व अधिकारी यांचा समावेश आहे. वाहतूक पोलिसांशी समन्वय राखून तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी विभागाच्या सहायक आयुक्तांच्या माध्यमातून कार्यवाही केली जात आहे. विसर्जन मार्गावरील सर्व खड्डे प्राधान्याने बुजवले जात आहेत.
– नरेंद्र बर्डे, उपायुक्त, परिमंडळ २
(सार्वजनिक उत्सव मंडळ समन्वय)

जी/उत्तर विभागात कृत्रिम तलावासह एकूण ९ विसर्जन स्थळे आहेत. यापैकी ८ ठिकाणे ही समुद्रावरील विसर्जनाची आहेत. यासर्व ठिकाणी प्रत्येकी १० जीवरक्षक, प्रत्येकी एक रुग्णवाहिका, प्रत्येकी एक निर्माल्य कलश बसवण्यात आले आहेत. यासर्व ९ विसर्जन स्थळांवर २८ सी.सी.टिव्ही कॅमेरा आदींसह विशेष व्यवस्था शिवाजीपार्क व दादर चौपाटीवर ठेवण्यात आली
– किरण दिघावकर, सहायक आयुक्त,जी/उत्तर विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -