घरमुंबईग्रंथ दिंडीने दुमदुमले जुहू

ग्रंथ दिंडीने दुमदुमले जुहू

Subscribe

शिक्षण विभागाचा ग्रंथ महोत्सव सुरू

आजची मुले तंत्रसाक्षर झाली असून, त्यासोबतच विद्यार्थ्यांना ग्रंथ साक्षरही करा, असे आवाहन कवी व साहित्यिक प्रवीण दवणे यांनी मुंबईतील शिक्षकांना केले. शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम विभाग आयोजित समग्र शिक्षा अंतर्गत श्रीराम मंत्री ग्रंथ महोत्सवात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. संवेदना विस्तारण्याचे काम पुस्तक करीत असतात त्यासाठी आज सांस्कृतिक पालक हवे असून, शाळांनी त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत, असाही सल्ला दवणे यांनी उपस्थितांना दिला. महाराष्ट्र शासनाने भिलार येथे पुस्तकांचे गाव उभारले त्याच धर्तीवर पुस्तकांच्या शाळा उभारण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

जुहू येथील विद्यानिधी हायस्कूलमध्ये मंगळवारी ग्रंथमहोत्सवाचा उद्घाटन सोहळा शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी विशेष अतिथी म्हणून उपनगर शिक्षण मंडळाचे चेअरमन संजीव मंत्री, सचिव कीर्तिदा मेहता, शिक्षण निरीक्षक पश्चिम विभागाचे शिक्षण निरीक्षक अनिल साबळे, उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक डॉ. मुश्ताक शेख, स्वरूप संपत-रावल, मुख्याध्यापक प्रियांका रजानी आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक अनिल साबळे यांनी तर आभार डॉ.मुश्ताक शेख यांनी केले.

- Advertisement -

ग्रंथ महोत्सवाची सुरुवात मंगळवारी सकाळी ८ वाजता पश्चिम विभागातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या ग्रंथ दिंडीने झाली. ग्रंथ दिंडीमध्ये वाचन संस्कृती संवर्धनासाठीची घोषवाक्ये लक्ष वेधून घेत होती. दिंडीत शाळांमधील विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक व पालकही पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आजपर्यंत झालेले ९२ संमेलनाध्यक्षांचे माहितीच्या दालनाचे उद्घाटन प्रवीण दवणे यांच्या हस्ते झाले. खार येथील अनुयोग विद्यालयाच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना माहिती दिली जात होती. या ग्रंथ महोत्सवात २५ मान्यवर प्रकाशकांची दालने असून, त्यामध्ये सवलतीमध्ये पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. दुपारच्या सत्रात मुंबईतील तीनही शिक्षण निरीक्षक विभागातील शिक्षक व पत्रकार यांचे कवी संमेलन रंगले.

संजय गवांदे यांची स्वच्छता अभियान गीत, विजय सावंत यांची शब्द, संजय शिंदे यांची चला गड्यांनो, कविता मोरवणकर यांची बाप, मनीषा घेवडे यांची संक्रमण, सुरभी राऊत यांची ज्ञानरचनावाद, विठ्ठल कुसाळ यांची सुंदर मी होणार यासह पत्रकार कवी प्रशांत दळवी, यामिनी दळवी यांनी स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गदिमा, पु.ल. बाबूजी व स्नेहल भाटकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एकपात्री प्रयोग खार येथील अनुयोग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केला. बुधवारी २० मार्च रोजी ग्रंथ महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी कथाकथन, परिसंवाद, लेखक आपल्या भेटीला यासारखे कार्यक्रम होणार असून, अनेक मान्यवर या ग्रंथ महोत्सवास भेट देणार असल्याचे शिक्षण निरीक्षक अनिल साबळे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -