घरमुंबईजी.टी. रुग्णालयात फक्त एकच भूलतज्ज्ञ

जी.टी. रुग्णालयात फक्त एकच भूलतज्ज्ञ

Subscribe

दिवसाला १५ शस्त्रक्रिया, शुक्रवारी एकही नाही

जी.टी. रुग्णालयात पाण्याअभावी ७० हून अधिक शस्त्रक्रिया रद्द झाल्या असतानाच आता भूलतज्ज्ञांच्या कमतरतेमुळे शुक्रवारी अनेक शस्त्रक्रिया रद्द झाल्या असल्याचे समोर आले आहे. त्यासोबतच जी.टी. या सरकारी आणि मोठ्या रुग्णालयात फक्त एकच भूलतज्ज्ञ डॉक्टर कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. सौमित्रा (नाव बदलेलेले) यांच्या कानाची शस्त्रक्रिया करायची होती. त्यामुळे त्यांचा मुलगा त्यांना घेऊन गावाहून मुंबईच्या जी.टी. रुग्णालयात दाखल झाला. त्यांच्या आईच्या कानाचा पडदा फाटला होता आणि कानातून रक्त आणि पू येत होता. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची होती; पण अर्ध्या तासाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना ऑपरेशन थिएटरमध्येच पूर्ण दिवस थांबावे लागले. त्यानंतर शुक्रवारी भूलतज्ज्ञ येणारच नाही, असे सांगत त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.

जी.टी. रुग्णालय सरकारी असून दर दिवशी जवळपास १० ते १५ वेगवेगळ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे या रुग्णांना शस्त्रक्रियेआधी भूल देण्यासाठी फक्त एकच भूलतज्ज्ञ सध्या कंत्राटी पद्धतीने कामावर आहे. पण, शुक्रवारी त्यांनी सुट्टी घेतल्यामुळे आणि जे.जे. रुग्णालयातून भूलतज्ज्ञ न पाठवता आल्याकारणाने या सर्व शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. याविषयी जी.टी. रुग्णालयाचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. संतोष गिते यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,‘आता सुट्ट्या सुरू झाल्या असल्याकारणाने भूलतज्ज्ञ उपलब्ध नाहीत. शिवाय, जे.जे. हून जे भूलतज्ज्ञ जी.टी.मध्ये येणार होते त्यांनाही व्हीआयपी ड्यूटी लागल्याने ते जी.टी.मध्ये येऊ शकले नाहीत. त्यामुळे ४ ते ५ शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या. दिवाळीची सुट्टी असल्यामुळे शस्त्रक्रिया जास्त प्लॅन केल्या नव्हत्या. आपत्कालीन शस्त्रक्रियांसाठी जे.जे. मध्ये पाठवले जाते. तर, दुपारी २ नंतरही जे.जे. लाच शस्त्रक्रियेसाठी पाठवले जाते.

- Advertisement -

संपूर्ण जे.जे. समूह म्हणजेच जे.जे., सेंट जॉर्ज, कामा आणि जी.टी. रुग्णालय मिळून फक्त १३ च भूलतज्ज्ञ आहेत. ज्यात ज्येष्ठ भूलतज्ज्ञ ९ आणि बाकी असिस्टंट प्रोफेसर आहेत, अशीही माहिती रुग्णालयातून मिळाली आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये जे.जे. तूनच भूलतज्ज्ञ पाठवले जातात. जी.टी. रुग्णालय हे ५२५ खाटांचं रुग्णालय असून वेगवेगळ्या ओपीडीला जवळपास १ हजारांहून जास्त रुग्ण येतात. तर, दिवसाला जी.टी. रुग्णालयात १० ते १२ शस्त्रक्रिया केल्या जातात.

आपत्कालीन परिस्थितीत जे.जे तूनच भूलतज्ज्ञ पाठवले जातात. तसेच, जीटीमध्ये असणाऱ्या भूलतज्ञांवर खूप ताण पडतो. त्यामुळे यावर लवकरच विचार केला जाईल. – डॉ. मुकुंद तायडे, अधीक्षक, जे.जे रुग्णालय.

- Advertisement -

जे.जे. रुग्णालय  १० शस्त्रक्रिया विभाग

जी.टी. रुग्णालय १ शस्त्रक्रिया विभाग

सेंट जॉर्ज रुग्णालय १ शस्त्रक्रिया विभाग

कामा रुग्णालय १ शस्त्रक्रिया विभाग

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -