घरमुंबईभिवंडीमध्ये जागोजागी नववर्ष स्वागताच्या शोभायात्रा

भिवंडीमध्ये जागोजागी नववर्ष स्वागताच्या शोभायात्रा

Subscribe

भिवंडी शहरात नववर्ष स्वागतासाठी शाळा, महाविद्यालय आणि सामाजिक मंडळांकडून स्वागत शोभायात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. भारतीय पारंपरिक वेशभूषेत शेकडो विद्यार्थी, नागरिक आणि महिलांनी सहभाग घेतला होता.

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी आदी गोष्टी केल्या जातात. प्रवेशद्वारासमोर उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे, असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो. या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारात उंचावर गुढी उभारतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यात स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो, उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते. सिंधी लोक ‘चेटीचंड’ नावाने या उत्सवाला संबोधतात. चैत्र पाडवा अर्थातच गुढी पाडवा, हिंदू नववर्षा उत्सव भिवंडी शहरात पारंपरिक पद्धतीने साजरा केला आहे.

शोभायात्रेत तरूणांसह वृद्धानीही घेतला सहभाग

भिवंडी शहरात विविध ठिकाणाहून निघालेल्या शोभायात्रांमध्ये ढोलताशा पथकांनी जोरदार नृत्याविष्कार केल्याने असंख्य स्त्री ,पुरुष, अबालवृद्ध पारंपारिक वेशभूषेत या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते. काही शोभायात्रांमध्ये टाळमृदूंगासह भजनाचा आवाज तर ढोलताशांचा गजर सुरु होता. धामणकर नाका परिसरात पद्मश्री अण्णासाहेब या शैक्षणिक संस्थेकडून काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये शेकडो विद्यार्थी ग्रंथ दिंडी, वृक्ष दिंडीसह मराठी शाळा वाचवा, अश्या घोषवाक्यांचे पोस्टर्स घेऊन सहभागी झाले होते. भिवंडी शहरातील सर्वात जुना भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राह्मण आळी येथील टिळक चौक मित्र मंडळाच्या पुढाकाराने आयोजित केलेली शोभायात्रा कासार आळी, वाणी आळी, मंडई ,बाजारपेठ मार्गे शिवाजी चौकपर्यंत आयोजित केली होती. एकनाथ महाराज मंदिर येथील जयवंत भाऊ समाधी स्थळी गुढीची पूजा करून विधिवतपणे या शोभायात्रेस सुरुवात झाली. यामध्ये महिलावर्ग,पुरुष मंडळी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने आणि उत्साहना सहभागी झाले होते. यंदा प्रथमच शहरातील ढोलताशा पथकांनी प्रायोजक मिळवून आकर्षक वेशभूषेत आपल्या पथकातील युवक युवतींना शृंगारात सहभागी केल्याने शोभायात्रा फुलून दिसत होती. तर सहभागी झालेले भजनी मंडळी टाळमृदूंगाच्या तालात किर्तनात रंगून गेले होते. ढोलताशा पथकातील युवतींनी आकर्षक असे लाठीकाठी चालविण्याचे प्रात्यक्षिक या शोभायात्रेत सादर केले.

- Advertisement -

शोभायात्रेत केली मतदान जनजागृती

यंदा नववर्षाच्या मुहूर्तावर लोकसभा निवडणूक असल्याने या शोभायात्रेत राजकीय पुढाऱ्यांना नागरिकांमध्ये जाण्याची नामी संधी उपलब्ध झाल्याने भाजपाचे कपिल पाटील, काँग्रेसचे सुरेश टावरे यांनी शोभायात्रांमध्ये हजेरी लावून नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या तर जायंट्स मेट्रो सहेली या संस्थेच्या महिलांकडून मतदान जनजागृती मोहीम राबविण्यासाठी सेल्फी पॉईंट बनवून नागरिकांचे फोटो ‘मी मतदान करणारच’ या टॅग लाइनसह काढले जात होते. तर शहरातील धामणकर नाका येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव शैक्षणिक संस्था संचालित विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, इंग्लिश मेडीयम स्कुल यांनी सुध्दा दरवर्षी प्रमाणे शोभायात्रेचे आयोजन केले होते. हि शोभा यात्रा कणेरी, पायल सिनेमा, पद्मानगर या परिसरातून काढण्यात आली होती. या शोभायात्रेत विद्यार्थ्यांच्या ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी, मराठी शाळा वाचवा, लेक वाचवा, लेझीम पथक, ढोल पथक यांने रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. या विद्यार्थ्यांच्या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत होत असताना पद्मानगर येथे संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान सेवा संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थंडगार फ्रुटीचे वाटप करण्यात आले.

विविध ठिकाणीच्या शोभायात्रा

अशोक नगर येथून सुधीर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दादासाहेब दांडेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता स्वागत पदयात्रा काढली होती. तसेच टेमघर येथे गुरुनाथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही शोभायात्रा काढून नववर्षाचे स्वागत केले. वेताळपाडा येथून राकेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रा पार पडली. पुर्णा येथे पूर्णेश्वर विद्या निकेतन मंडळाचे अध्यक्ष मनिष खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली शोभा यात्रा काढण्यात आली होती. राहनाळ येथे प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय एकात्मता व नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा काढून आनंद साजरा करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -