घरमुंबईअपघातग्रस्त प्रवीण पाच वर्षानंतर देणार सुरक्षा संदेश

अपघातग्रस्त प्रवीण पाच वर्षानंतर देणार सुरक्षा संदेश

Subscribe

सराव करताना पाच वर्षांपूर्वी जखमी झालेला आणि अंथरुणाला खिळलेला गोविंदा स्वतःच्या पायावर उभा राहिला असून यंदाच्या उत्सवात तो सहभागी होणार आहे. प्रवीण रहाटे असे या गोविंदाचे नाव आहे.

सराव करताना पाच वर्षांपूर्वी जखमी झालेला आणि अंथरुणाला खिळलेला गोविंदा स्वतःच्या पायावर उभा राहिला असून यंदाच्या उत्सवात तो सहभागी होणार आहे. प्रवीण रहाटे असे या गोविंदाचे नाव आहे. २० जुलै २०१३ रोजी थरांचा सराव करताना पडून तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला अपंगत्व आले होते.
कमावलेल्या शरीरामुळे प्रवीण सर्वात खालच्या थरात असायचा. त्याच्या मजबूत शरीरावर मनोरे रचले जायचे. प्रवीणचे शिवगणेश गोविंदा पथक उंचच उंच हंड्या फोडण्यात पटाईत होते.

या पथकाचा वसई तालुक्यात चांगलाच नावलौकीक होता. मात्र, २० जुलै २०१३ ची रात्र प्रवीणसाठी काळ रात्र ठरली. दहीहंडीचा सराव सुरू होता. त्यावेळी वरचे गोविंदा कोसळून प्रवीण त्याखाली दाबला गेला. या अपघातात प्रवीणच्या कमरेच्या हाडांचा भुगा झाला होता. त्यामुळे आई-वडिलांशिवाय पोरका असलेला प्रवीण शरीरानेही पोरका झाला होता.
दहीहंडीतून कमावलेले सर्व पैसे मंडळाने प्रवीणवर उपचार करण्यासाठी खर्च केले. तरीही प्रवीण अंथरुणालाच खिळून होता. कमरेखालचा भाग लुळा पडल्यामुळे तो अपंग झाला होता.

- Advertisement -

मावशीने केला संभाळ

त्यानंतर मंडळ आणि प्रवीणचा चायनीजचा धंदाही बंद झाला.जखमी प्रवीणचा भार त्याच्या मावशीवर पडला. मावशीनेही ‘माय मरो, मावशी जगो’ ही म्हण सार्थ ठरवत त्याची सुश्रुषा केली.वाढत्या वयातही घरकाम करून तिने प्रवीणचा सांभाळ केला.

वैद्य ट्रस्टकडून मदत

सण टिकून रहावे यासाठी कार्यरत असलेल्या कै.रमाकांत वैद्य चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अमित वैद्य यांनी दोन वर्षांपूर्वी प्रवीणवर उपचार करण्यास सुरवात केली. या उपचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे अंथरुणाला खिळलेला प्रवीण स्वतःच्या पायावर उभा राहू लागला आहे. यंदा तो वैद्य ट्रस्टच्या दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहे.

- Advertisement -

गेली 14 वर्षे आमच्या मंडळाकडून गोविंदा पथकाच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येते. अन्य मंडळांनी पथकांच्या प्रवासाचा,चहा-नाश्त्याचा खर्च उचलला तर फक्त हंडीला सलामी देवून स्मृती चिन्हांवरही पथके दहीहंडीचा आनंद लुटतील.
-अमित वैद्य, अध्यक्ष, कै. रमाकांत वैद्य चॅरिटेबल ट्रस्ट.

उंचच उंच मनोरे न रचताही या उत्सवाचा आनंद लुटता येऊ शकतो. नाच-गाणी, मनोरंजनाचे, सांस्कृतिक कार्यक्रमाने या उत्सवाची लज्जत वाढवता येऊ शकते. त्यासाठी दहीहंडीचे आयोजन करणार्‍या मंडळांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.सरावापासून हंडी फोडण्यापर्यंत येणारा खर्च काढण्यासाठी गोविंदा जीव धोक्यात घालून उंच मनोरे रचतात.त्यातून अपघात होतात. त्यामुळे आयोजकांनी रोख रक्कम न देता पथकांच्या जेवणाचा, चहा-नाश्त्याचा, प्रवासाचा खर्च केला तर गोविंदांना दहीहंडीचा आनंद वेगळ्या प्रकारे घेता येईल.- प्रवीण रहाटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -