घरमुंबईहंडीवर आयकर नजर

हंडीवर आयकर नजर

Subscribe

राज्यात विशेषत: मुंबई, ठाण्यात सोमवारी खेळल्या जाणार्‍या दहीहंडीवर आयकर विभागाची नजर राहणार आहे, अशी माहिती आयकर सूत्रांनी दिली आहे. मुंबई आणि ठाण्यात यासाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीमकडून मिळालेल्या माहितीनंतर दहीहंडी संयोजकांकडून तपशील मागवला जाणार आहे.

राज्यात विशेषत: मुंबई, ठाण्यात सोमवारी खेळल्या जाणार्‍या दहीहंडीवर आयकर विभागाची नजर राहणार आहे, अशी माहिती आयकर सूत्रांनी दिली आहे. मुंबई आणि ठाण्यात यासाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीमकडून मिळालेल्या माहितीनंतर दहीहंडी संयोजकांकडून तपशील मागवला जाणार आहे. मुंबईत आयकरचे गुप्तहेर विभाग हे काम करणार आहे. ठाण्यात तपास टीमकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. गोविंदा पथकांवर लाखोंची बक्षिसं लावणार्‍या संयोजकांना रितसर नोटीसा बजावल्या जाऊन त्यांनी जमा केलेल्या रकमांचा लेखाजोखा तपासला जाणार आहे, असे या अधिकार्‍याने स्पष्ट केले. यावर्षीच्या गोविंदासाठी गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक खर्च होत आहे, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे  त्यामुळे दोन विभागांना कामाला लावण्यात आलं आहे, असे हा अधिकारी म्हणाला.सर्वत्र दहीहंडी फोडणार्‍या पथकांची रेलचेल सुरू आहे. राज्यात विशेषत: मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात गोविंदाची धूम जोरात असते. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये शेकडोच्या संख्येने गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी बाहेर पडतात. या तयारीसाठी महिनाभर आधी त्यांचा सराव सुरू असतो.

मोठी बक्षिसं असल्याने उंच हंडी फोडण्याचा सराव करण्याचं खास प्रशिक्षण गोविंदांना दिलं जातं. मोठ्या बक्षिसांसाठी सरावांसाठी लाखोंचा खर्च केला जातो. तर उंच हंडी फोडण्यासाठी संयोजकांकडून लाखोंची बक्षिसं लावली जातात. यात ठाणे जिल्हा आघाडीवर असतो. शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या मानाच्या हंडीने राज्यातल्या गोविंदा पथकांना अक्षरश: वेड लावलं होतं. लांब लांबून गोविंदा दिघेंच्या आश्रमावर पोहोचत. लाखोंचं बक्षीस देणार्‍या या मंडळाचा बोलबालाही मोठा होता. दिघे गेल्यावर अनेक मंडळांनी तितकीच बक्षिसं लावून गोविंदांना आपलंसं केलं आहे. एकट्या ठाणे जिल्ह्यात मोठ्या पाच दहीहंड्या लावण्यात आल्या आहेत. मुंबईत अशा हंड्यांची संख्या १७ असल्याची माहिती देण्यात आली. मोठ्या रकमांच्या वाढत्या दहीहंडींची दखल घेत आयकर विभागाकडून संयोजकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.  गेल्यावर्षी जुलै महिन्यात आलेल्या वस्तू आणि सेवाकरामुळे (जीएसटी) मंडळांना मिळणार्‍या निधीवर मर्यादा आली होती. लाखांची बक्षिसं हजारात आली. पुढे नोव्हेंबरमध्ये नोटबंदीचा निर्णय झाला. यामुळे तर दहीहंडीवर अवकळा आली होती. यामुळे संयोजकांचा निधीही घटला. त्यातच न्यायालयाने हंडी फोडणार्‍या पथकांना उंचीची मर्यादा घालून दिल्याने चोहोबाजूने हा सण कोलमडला होता. मात्र यावेळी हा सण जीएसटीतून काहीसा सावरला आहेच.

- Advertisement -

शिवाय नोटाबंदीचीही झळ काही अंशी कमी झाली आहे. न्यायालयानेही उंचीची मर्यादा शिथिल केली आहे. यामुळे यावर्षी सण अधिकच जोमात आहे. यातून संयोजकांनी पुन्हा मोठ्या बक्षिसांची घोषणा केली आहे. ठाण्यात स्वामी प्रतिष्ठान या शिवाजी पाटील यांच्या संस्थेने हंडी फोडणार्‍या पथकाला २५ लाखांचं, तर ठाणे मनसेचे अविनाश जाधव यांनी २१ लाखांची दहीहंडी लावली आहे. आमदार राम कदम यांच्या संस्थेने दहीहंडी नाका, घाटकोपर इथे २५ लाखांच हंडी लावली आहे. ही हंडी देशातील सर्वात मोठी हंडी असल्याचं कदम यांनी जाहीर केलं आहे. मोठ्या रकमेच्या हंडी लावणार्‍या या संयोजकांनी इतके पैसे कुठून आणले याची खातरजमा आयकर विभागाने करायला घेतली आहे. यासाठी आज या विभागाच्या दोन टीम मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत लक्ष ठेवणार आहेत. यातील एक गुप्तहेर टीम आणि दुसरी तपास टीम असेल, असं सांगण्यात आलं. या टीमकडून बक्षिसांची माहिती घेऊन संबंधित संस्थांना आयकर विभागाकडून नोटीसा पाठवल्या जाणार आहेत. नोटीसा पाठवण्याचा अधिकार हा आयकर विभागाच्या उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना असतो. या टीम या दोन अधिकार्‍यांच्या निर्देशानुसार काम करतात. अनेकदा आयकर विभाग आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी अशा सणांचा आधार घेते. मोठ्या रकमांचा व्यवहार असल्याने तितक्याच रकमा आयकर विभागात जमा होऊन टार्गेट पूर्ण करता येऊ शकतं, असं गणित अधिकार्‍यांचं असतं.

दहीहंडीशी संबंधित अनेक संस्था राजकीय पुढार्‍यांच्या असतात. आजवर त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. पण आता तसे करता येणार नाही. मंडळांना इतक्या रकमा देतं कोण? आयकर चुकवण्यासाठी निधी दिला जात तर नाही ना? याकडे पाहणं गरजेचं असतं. हजारांपासून लाखांपर्यंत बक्षिसं असल्याने यासाठी मोठ्या रकमा दिल्या जातात. या रकमांची माहिती आमच्या गुप्तहेर टीमकडून घेतली जात आहे. याशिवाय तपास टीमकडूनही अधिक माहिती घेतली जात आहे. या माहितीच्या आधारे चौकशी करण्यात येईल. त्यानंतर पुढचे सोपस्कार सुरू होतील, अशी माहिती आयकर विभागाच्या एका उपायुक्ताने नाव न छापण्याच्या अटीवर ‘महानगर’ला दिली.

- Advertisement -

स्वामी प्रतिष्ठान, हिरानंदानी मिडोस चौक, ठाणे, आयोजक : शिवाजी पाटील, रु. २५ लाख
ठाणे मनसे,  आयोजक : अविनाश जाधव रु. २१ लाख 
संस्कृती प्रतिष्ठान, प्रतिष्ठान- प्रो. गोविंदा आयोजक : प्रताप सरनाईक 
ताडदेव, ममता चषक – आयोजक : अरुण दुधवडकर, रु. ४,४४,४४४ 
आनंद चॅरिटेबल ट्रस्ट – टेंभी नाका, ठाणे
जांभोरी मैदान, वरळी आयोजक : सुनील शिंदे
दक्षिण मुंबईत मानाची दहीहंडी
शिवसेना विभाग क्र. १२ ताडवाडी आयोजक : पांडुरंग सकपाळ रु. ३,३३,३३३

हिशोब न ठेवल्याचा परिणाम
अनेक संयोजक गोविंदांसाठी मोठ्या रकमा जमा करतात. पण त्याचा हिशोब ठेवत नाहीत. काळा पैसा अशा सणांमधून खेळवण्याचं काम अनेकजण करत असतात. त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी आयकर विभागाची असते. गोविंदा संयोजकांकडून मोठ्या रकमा जमा केल्या जातात, पण त्या बक्षिसांसाठी वापरल्या जातात, असं नाही. अशावेळी त्यांचा हिशोब देण्याची जबाबदारी ही संयोजकांचीच असते. ती त्यांनी योग्य प्रकारे हाताळली तर त्यांच्यावर चौकशीची आफत येणार नाही. पण मोठ्या रकमा जमा करून त्यांची परस्पर विल्हेवाट लावणार्‍यांना या चौकशा अडचणीत आणू शकतील.
-जे. डी. तांडेल, प्रवक्ते, आयकर लेखापरीक्षक संघटना

गोविंदा पथकांचा खर्चही मोठा
संयोजकांकडून देण्यात येणारी बक्षिसं गोविंदा पथकांना मिळतात. पण ही बक्षिसं मिळवण्याच्या तयारीचा खर्च न परवडणारा झाला आहे. गोविंदांचा सराव, त्यासाठी लागणारी साधनं, दहीहंडीच्या दिवशी वापरात आणायची वाहनं, जायबंदी होणार्‍या गोविंदांना मदत, गोविंदांच्या नावाने काढायचा विमा, त्यांच्याकरता गोविंदा गणवेश, गोविदांची जेवणावळ यात आमची बक्षिसं वळती होत असतात. शिवाय एकेका मंडळातील गोविंदांची संख्या लक्षात घेता संयोजकांकडून मिळणारी बक्षिसं ही आमच्या दृष्टीने नाममात्रच असतात.
– श्रीधर पांचाळ, प्रशिक्षक, संलग्न बाळगोपाळ गोविंदा पथक, घोडपदेव.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -