घरमुंबईमुंबई तुंबली... मुंबई थांबली...!

मुंबई तुंबली… मुंबई थांबली…!

Subscribe

मुंबईत २४ तासांत ३७५ मिमी पाऊस

मुंबईत सोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांसाठी डोकेदुखीचा ठरला. मुंबईत गेल्या ४० वर्षांतील सर्वाधिक पाऊस पडला असून मुंबईत गेल्या २४ तासांत सुमारे ३७५ मिमी पाऊस पडल्याची नोंद सांताक्रूझ वेधशाळेत नोंदविण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा पाऊस अधिक असून गेल्यावर्षी याच दिवशी केवळ ०.४ मिमी पाऊस पडला होता. मुंबई हवामान खात्याने मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला असताना ठाणे आणि पालघर याठिकाणी रेडअलर्ट जारी केला होता. त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून मुंबईकरांनी घरीच राहणे पसंत केले खरे. पण त्या तुलनेत पाऊस न पडल्याने मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

मुंबईत सोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने रात्री उशिरापर्यंत रौद्र रुप धारण केल्याने प्रशासनाने चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी उशीरा मुंबईतील शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर केली. तर राज्य सरकारने देखील रात्री उशीर मुंबईतील सार्वजनिक आणि खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली. त्यामुळे मुंबईकरांनी घराच्या बाहेर न पडणेच पसंत केले. मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मुंबई शहरांत ३५.२४ टक्के, पूर्व उपनगरात १४.३२ आणि पश्चिम उपनगरात १८.६८ टक्के पाऊस पडल्याचे मुंबई महापालिकेने जाहीर केले आहे. तर मुंबईत नेहमीप्रमाणे सायन, शिवाजी पार्क, लालबाग, रानडे रोड, वांद्रे, नॅशनल कॉलेज, चेंबूर कॅम्प, शिंदेवाडी, इनलॅक हॉस्पिटल याठिकाणी पाणी भरण्याच्या घटना घडल्याची माहिती पालिकेच्या आपतकालीन विभागाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

एकूण १७ ठिकाणी भिंत पडली

मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे मालाडप्रमाणे शहरात एकूण १७ ठिकाणी भिंती कोसळल्याच्या घटना नोंदविल्या आहेत. त्याअगोदर सोमवारी मुंबईत एकूण ३७ ठिकाणी इमारत आणि त्याच्या काही भाग पडण्याचा तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात शहरांत ६, पूर्व उपनगरात १४ आणि पश्चिम उपनगरात एकूण १७ अशा एकण ३७ ठिकाणांचा समावेश असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

अन् तो थोडक्यात वाचला

सोमवारी झालेल्या पावसात अंधेरी पूर्व येथील एल अ‍ॅण्ड टी कंपनीसमोरील फुटपाथवरच्या उघड्या मॅनहोलमध्ये ‘एबीपी माझा’चा आशिष घोरपडे हा कर्मचारी पडला. मॅनहोलमध्ये पडल्यानंतर गळ्यापर्यंत तो बुडला. सुदैवाने मॅनहोलचा कठडा हाती लागल्याने त्या आधाराने वर आला. पावसाचा जोर नव्हता नाही तर पाण्यात वाहून गेलो असतो, असे आशिषने सांगितले.

- Advertisement -

६१ ठिकाणी झाडे कोसळली

मंगळवारी सकाळी सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईत एकूण ६१ ठिकाणी झाड किंवा फांद्या कोसळल्याची घटना नोंदविण्यात आलेल्या आहेत. यात शहरात एकूण ७ ठिकाणी तर पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनुक्रमे २० आणि ३४ ठिकाणी या तक्रारी नोंदविण्यात आलेल्या आहेत.

१५ ठिकाणी वाहतूक मार्गात बदल

सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने खबरदारीचे उपाय म्हणून मुंबई महापलिकेने एकूण १५ ठिकाणी वाहतूक मार्गात बदल केला होता. त्यात प्रामुख्याने सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता, आरसीएफ कॉलनी, अ‍ॅण्टॉप हिल, मिलन सबवे आणि कुर्ला बस डेपो या ठिकाणांचा समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -