घरमुंबईमुंबईकरांमध्ये वाढतंय उच्च रक्तदाबाचं प्रमाण!

मुंबईकरांमध्ये वाढतंय उच्च रक्तदाबाचं प्रमाण!

Subscribe

मुंबईत उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे प्रजा फाऊंडेशनने सादर केलेल्या आरोग्य अहवालानुसार समोर आले आहे.

मुंबईकरांमध्ये दिवसेंदिवस आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यात ही जे सायलेंट किलर आजार असतात, त्यांची भीती सर्वात जास्त मुंबईकरांना अनुभवायला मिळत आहे. सध्या मुंबईकरांची जीवनशैली धावपळीची बनली आहे. यात सर्व आजार सहज जडतात. पण, वाढत्या महागाईच्या काळात उपचारही महागला असल्याचे दिसून येत आहे. या उपचारांचा खर्च सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्याजोगा नसल्याने बहुतांश रुग्ण उपचाराविनाच राहतात. त्याचप्रमाणे सर्वाधिक मुंबईकरांमध्ये उच्चरक्तदाबाचं प्रमाण वाढल्याचे एका अहवानुसार समोर आले आहे.

प्रजा फाऊंडेशनने सादर केलेल्या आरोग्य अहवालानुसार, मुंबईत उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे समोर आहे. त्यात ही मुंबईतील डी वॉर्डमध्ये गेल्या ५ वर्षांच्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय, के पश्चिम वॉर्ड आणि एल या भागात सर्वात जास्त उच्च रक्तदाब रुग्णांची संख्या आहे.

- Advertisement -

डी वॉर्डमध्ये सर्वात जास्त उच्चरक्तदाबाचे रुग्ण

२०१७ – १८ या चालू वर्षात पालिका आणि राज्य सरकारच्या रुग्णालयात मिळून एकूण ३४ हजार १२८ डाय उच्च रक्तदाबाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी, २०१७ – १८ या वर्षात डी वॉर्डमध्ये २ हजार २५८ उच्च रक्तदाबाचे रुग्ण आढळले आहेत. जे इतर वॉर्डच्या तुलनेत सर्वात जास्त आहेत. त्या खालोखाल के पश्चिम या वॉर्डमध्ये १ हजार ६४६ उच्च रक्तदाबाचे रुग्ण आढळले आहेत. तर, एल या वॉर्डमध्ये १ हजार ७२३ एवढे रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी डी वॉर्डमध्ये २ हजार ३२६ रुग्ण आढळले होते. त्यामुळे, डायबिटीसपाठोपाठ आता डी वॉर्डमध्ये उच्चरक्तदाबाचे रुग्ण ही आढळले आहेत.

पाच वर्षांच्या आकडेवारी खालीलप्रमाणे

२०१३ – १४ या वर्षात उच्च रक्तदाबाचे ३५ हजार ६३७ तर, २०१४ – १५ या वर्षात ३८ हजार ६७०, २०१५ – १६ या वर्षात ३५ हजार ९६१, २०१६ – १७ या वर्षात ३६ हजार ७५७ आणि २०१७ – १८ या वर्षात ३४ हजार १२८ उच्च रक्तदाबाचे रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

३० ते ६० या वयोगटातील ३० टक्के व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. तर, तब्बल ४३% तरुणांना रक्तदाबाची सामान्य पातळी (रेंज) माहीतच नसते. त्यामुळे तरुणांनी आपल्या रक्तदाबाची पातळी वेळीच ओळखली पाहीजे, असा सल्ला तज्ञ डॉक्टर देतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार

वेळेआधी मृत्यू होण्यासाठी उच्च रक्तदाब हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. २००५ साली करण्यात आलेल्या विश्लेषणानुसार २०.६% भारतीय पुरुष आणि २०.९% भारतीय महिलांना उच्च रक्तदाब आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या २००८ सालच्या आकडेवारीनुसार भारतीयांमध्ये उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींच्या संख्येत ३२.५% (पुरुषांमध्ये ३३.२% तर महिलांमध्ये ३१.७%) वाढ झाली आहे. तर, ऑनलाईन सर्वेक्षणामध्ये २० ते ३० या वयोगटातील ५०० व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यापैकी २१८ जणांना, रक्तदाबाची सामान्य पातळी ९० ते १४० असते हे माहीतच नव्हते.

पालिका रुग्णालयाच्या सर्वेक्षणानुसार

तर, पालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबईत रक्तदाब असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या दोन वर्षाच्या कालावधी दरम्यान तब्बल ७३ लाख ७४ हजार ६०२ रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील २३ टक्के लोक हे उच्चरक्तदाबाचे रुग्ण आढळले आहेत.

रक्तदाब म्हणजे काय?

हृदय हा एक स्नायूंनी बनलेला पोकळ अवयव आहे. त्याच्या तालबद्ध हालचालीमुळे (आकुंचन पावणे (Systole) आणि प्रसरण पावणे (Diastole) रक्त शरीरभर फिरत असते. शरीरात रक्त वाहताना रक्तवाहिन्यांवर जो दाब पडतो किंबहुना ज्या दाबाने रक्त सर्व शरीरातील रक्तवाहिन्यांतून फिरत असते त्या दाबाला ‘रक्तदाब’ (Blood Pressure) असे म्हणतात.

अति रक्तदाबाची लक्षणे

  • सतत डोके दुखणे, जड वाटणे.
  • चक्कर येणे, आसपासच्या वस्तू हलत असल्याचा भास होणे, कामात लक्ष केंद्रित न होणे, एकाग्रता न होणे,
  • आकडेमोड चुकणे, घटनाक्रम विसरणे, थकवा जाणवणे, चिडचिड करणे.
  • छातीत धडधड होणे, छातीत दुखणे.
  • लैंगिक सामथ्र्य कमी होणे.

उच्च रक्‍तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठीचे उपाय

  • वजन कमी करा
  • आहारात मीठाचे प्रमाण कमी करा
  • पोटॅशियमची अधिक मात्रा असलेले अन्‍न खा
  • मद्यसेवन कमी करा
  • नियमित व्यायाम करा
  • धूम्रपान थांबवणे
  • कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे
  • मधुमेहावर नियंत्रण ठेवणे
  • रक्‍तदाब वाढवणारी औषधे टाळणे

आजच्या विकसनशील देशांमध्ये जीवनशैली, ताण, प्रदूषण, कामाच्या ठिकाणी असलेले वातावरण आणि खानपानाच्या सवयी यामुळे दर पाचपैकी एका व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. भारतीय आकडेवारीनुसार २०२५ सालापर्यंत दोनपैकी एका व्यक्तीला उच्च रक्तदाब असेल. निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत थोडी तरी शिस्त पाळणे आवश्यक आहे.  – डॉ. प्रतीक सोनी , हृदयविकार तज्ज्ञ ,वोक्हार्ट रुग्णालय

वाचा – तरुणांनो…रक्तदाबाची पातळी वेळीच ओळखा!

वाचा – उच्च रक्तदाब टाळण्यासाठी करावे ‘हे’ उपाय

वाचा – योग जुळवा आणि रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह पळवा !

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -