घरमुंबईBEST संप : आज तरी निकाल लागणार का?

BEST संप : आज तरी निकाल लागणार का?

Subscribe

उच्चस्तरीय समितीची बैठक आयोजित करून त्यासंबंधीचा अहवाल महाधिवक्त्यांनी एका बंद लिफाफ्यामध्ये आज दुपारी ३ पर्यंत सादर करावा असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

मुंबईकरांच्या अक्षरश: नाकीनऊ आणणाऱ्या बेस्ट कर्मचारी संपाचा आज आठवा दिवस आहे. गेल्या ७ दिवसांपासून सुरु असलेल्या या संपाने सर्वसामान्य प्रवाशांचे पुरते हाल केले आहेत. दरम्यान, आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये या बेस्ट संपाबाबत अंतिम तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांचा भूमिकेवर उच्च न्यायालयाने आक्षेप घेत, संपाविषयी अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीकडे सोपवली आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (आज) उच्चस्तरीय समितीकडून संपाबाबतची अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. गेल्या ७ दिवसांपासून सुरु असलेल्या बेस्ट संपामुळे राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरु झाला होता. त्यातच काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संपाला पाठिंबा दर्शवत आक्रमक भूमिका घेतली होती. मनसेने रस्त्यावर उतरत वरळी येथे सुरु असलेले कोस्टल रोडचे काम थांबवले. ‘जोपर्यंत संपावर तोडगा निघत नाही तोपर्यंत कोस्टल रोडचे काम सुरु होऊ देणार नाही’, अशी रोखठोक भूमिका मनसेने घेतली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज उच्च न्यायालय बे्स्ट संपाबाबत अंतिम सुनावणी करणार का? आणि सुनावणी झाल्यास घेण्यात आलेला निर्णय हा कर्मचाऱ्यांच्या बाजूने असणार की विरोधात ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

‘संप’ हा तोडगा नाही

दरम्यान, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती  नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठाने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘संप’ हा कुठल्याच समस्येवरील उपाय होऊ शकत नाही, संप करण्याऐवजी सनदशीर मार्गानेही मागण्यांठी  लढा दिला जाऊ शकतो,असे मतंही त्यांनी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे ‘स्वत:च्या मागण्यांसाठी एखाद्या संघटनेने अशाप्रकारे सामान्य जनतेला वेठीस धरणे साफ चुकीचे आहे’, असं मत हायकोर्टाने व्यक्त केलं आहे. हेच मत व्यक्त करत हायकोर्टाने संपाचा निर्णय राज्य सरकारच्या उच्च स्तरीय कमिटीने घ्यावा असे निर्देश दिले. सर्वप्रथम बेस्ट कामगार कृती समितीने बैठक घेऊन सोमवार संध्याकाळपर्यंत आपला अंतिम निर्णय घ्यावा आणि त्यानंतर उच्चस्तरीय समितीची बैठक आयोजित करून त्यासंबंधीचा अहवाल महाधिवक्त्यांनी एका बंद लिफाफ्यामध्ये आज दुपारी ३ पर्यंत सादर करावा असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. त्यानंतर याचिकेची सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब ठेवण्यात आली.

- Advertisement -

सामान्यांचे हाल

बेस्ट संपाबाबतच्या अंतिम निर्णायाची सर्वसामान्य लोक आतुरतेने वाट पाहत असणार यात काहीच शंका नाही. कारण गेल्या ७ दिवसांपासून बेस्ट बसने प्रवास करणाऱ्यांचे खूप हाल होत आहेत. बसने नियमीत प्रवास करणारे हजारो प्रवासी या संपाच्या कचाट्यात सापडले आहे. एकीकडे बस नसल्यामुळे लोकांना कामाच्या ठिकाणी पोहाचयला उशीर होत आहे, तर दुसरीकडे याच परिस्थीतचा गैरफायदा खासगी टॅक्सी आणि रिक्षाचालक घेत आहेत. टॅक्सी, रिक्षावाले मनाला येईल तो भाव आकारत असल्यामुळे सामान्य नागरिकांची अधिकच कोंडी होत आहे. त्यामुळे आज दुपारी ३ वाजता संपाचा काय निकाल लागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -