घरमुंबईपोलीस-पत्रकारांनी मानसिक छळ केला, मृत्यूपूर्वीच हिरेन यांची मुंबई सीपी, गृहमंत्र्यांकडेही तक्रार

पोलीस-पत्रकारांनी मानसिक छळ केला, मृत्यूपूर्वीच हिरेन यांची मुंबई सीपी, गृहमंत्र्यांकडेही तक्रार

Subscribe

रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली जी स्कॉर्पिओ गाडी सापडली, या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मृतदेह शुक्रवारी मुंब्रा खाडीत आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. मनसुख हिरेन यांची आत्महत्या की हत्या? अशा चर्चांना उधाण आले होते. परंतु ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केली असल्याची सुरूवातीला माहिती दिली. यानंतर मनसुख हिरेन यांनी मृत्यूपूर्वी पोलीस आयुक्त मुंबई, ठाणे आणि गृहमंत्री यांना लिहलेले पत्र समोर आलं आहे. यामध्ये पोलिसांच्या नावासह काही पत्रकारांच्या नावांचा उल्लेख देखील केला आहे. पोलीस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत मनसुख यांनी पोलीस आणि पत्रकारांकडून माझा मानसिक छळ झाला असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

अशी केली मनसुख हिरेन यांनी तक्रार

मनसुख हिरेन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता विक्रोळी पोलीस ठाण्यातून त्यांना एक फोन आला. त्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्यातूनही ३ वाजता फोन आला. १ मार्च रोजी संध्याकाळी ४ वाजता नागपाडा एटीएसमधून फोन आला. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या सीआययू ऑफिसमध्ये बराच वेळ चौकशी करण्यात आली. बराच वेळ सुरू असलेल्या चौकशीत सातत्याने परत परत प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर एनआयएने ही चौकशी केली. पुणे शाखेचे सहपोलिस आयुक्त मिलिंद भारांबे यांनीही या प्रकरणात चौकशी केली. विक्रोळी पोलिस, घाटकोपर पोलिस, नागपाड्याचा एटीएस विभाग, गुन्हे गुप्तवार्ता विभाग, गुन्हे शाखा आणि केंद्रीय संस्था एनआयएकडूनही वारंवार चौकशी करून मला तासनतास बसवून ठेवण्यात आले होते असेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

यासोबतच विविध तपास यंत्रणांकडून झालेल्या चौकशीमुळे मानसिक स्वास्थ बिघडल्याचे मनसुख हिरेन यांनी तक्रारीत नमूद केले आहे. कित्येक माध्यमांच्या पत्रकारांकडून सतत फोन येत आहेत. यावेळी एका पत्रकाराने कित्येक फोन करुन या प्रकरणातील संशयित असल्याचे देखील सांगितल्याचं मनसुख हिरेन यांनी या तक्रारीत म्हटले आहे.

- Advertisement -

या पुढे त्यांनी असेही म्हटले की, अनेक प्रसारमाध्यमांकडून मला वारंवार फोन येत असल्याने माझा मानसिक छळ होत असून या प्रकणात माझ्या कुटुंबियांना देखील त्रास होत आहे. तसेच, मला आरोपीला सारखी वागणूक दिली जात आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण आहे हे मला माहित नाही, पण माझा छळ होतोय. या प्रकरणात माझ्या स्कॉर्पिओ गाडीचा गैरवापर होत आहे, असे यापूर्वी देखील मी माझ्या जबाबात स्पष्ट केलं होतं.

मनसुख हिरेनच्या पत्नीची माध्यमांना पहिली प्रतिक्रिया

मनसुख हिरेन यांच्या पत्नींने पहिल्यांदा माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांना भेटायला जातो असे सांगून मनसुद हिरेन घरी परत आलेच नाहीत. त्यांना कांदीवलीच्या तावडे यांचा फोन आला होता. तावडे हे क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचा संशय आहे. मनसुख यांना तावडे यांचा शेवटचा फोन आला होता. आम्ही रात्रभर त्यांची वाट पाहत होतो मात्र ते घरी परत आले नाहीत, असे मनसुख हिरेन यांची पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांना सांगितले. माझ्या कुटुंबियांसोबत असे काही होऊ शकते असा विचारही मी कधी करु शकत नाही. माझे पती आत्महत्या करुच शकत नाहीत,अशा भावना विमल हिरेन यांनी व्यक्त केल्या. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, माझ्या पतीच्या मृत्यूमागचे सत्य समोर यायला हवे अशी मागणी विमल हिरेन यांनी केली आहे. तसेच अॅटॉप्सी रिपोर्ट, मृत्युचे कारण आणि शवविच्छेदनाचे छायाचित्रीकरण आम्हाला द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. जोपर्यंत शवविच्छेदन अहवाल सार्वजनिक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असेही त्यांनी सांगितले. भाजप नेते आशिष शेलार यांनीही विधिमंडळात बोलताना मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदनाच्या वेळी स्वतः सचिन वाझे हजर होते असा खळबळजनक आरोप केलो होता.

आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. याबाबत आम्ही पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. माझ्या पतीला चौकशीसाठी वारंवार बोलवले जात होते. त्यांना पूर्णवेळ बसवून ठेवले गेले होते. तरी माझ्या पतीने पोलिसांना पूर्ण सहकार्य केले. गुरुवारी त्यांना रात्री पोलिसांनी बोलावून घेतले. रात्री दहा नंतर त्यांना तावडे नामक व्यक्तीचा फोन आला आणि ते बाहेर गेले. सकाळीही ते परत आले नाहीत. म्हणून आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली अशी माहिती विमल हिरेन यांनी दिली.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -