Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई ११ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या,डॉ. करीर वित्त विभागात,म्हैसकर आरोग्य विभागात

११ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या,डॉ. करीर वित्त विभागात,म्हैसकर आरोग्य विभागात

Subscribe

राज्याच्या मुख्य सचिवपदाची धुरा मनोज सौनिक यांच्याकडे सोपविल्यानंतर राज्य सरकारने प्रशासनात फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मंगळवारी ११ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असून महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची मंत्रालयात वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर नागपूर येथील वस्त्रोद्योग विभागाचे संचालक पी. सीवा संकर यांची शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी, तर महापारेषणचे अध्यक्ष तथा मुख्य व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांची मंत्रालयात गृह विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली झाली आहे. राधिका रस्तोगी यांची मंत्रालयात अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिवपदी, मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची महापारेषणच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी, नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले श्रावण हर्डीकर यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी, तुकाराम मुंढे यांची मंत्रालयात पशुसंवर्धन, दुग्धविकास विभागाच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य कर विभागाचे सहआयुक्त जी. श्रीकांत यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्तपदी, तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची औरंगाबादमध्ये राज्य कर विभागाच्या सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

खारघर चौकशी अधांतरी?
दरम्यान, राज्य सरकारने खारघर येथे महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतर झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमली होती. या समितीला एक महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. ही चौकशी जाहीर केली तेव्हा डॉ. नितीन करीर हे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते, मात्र आता त्यांची महसूल विभागातून बदली झाल्याने खारघर घटनेची चौकशी नेमकी कोण करणार, असा प्रश्न केला जात आहे. तसेच महसूल विभागात नव्या अतिरिक्त मुख्य सचिवांची नियुक्ती होईपर्यंत ही चौकशी अधांतरी राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -